पुणे – विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात अधिकारी, कर्मचाऱ्यांना धमकावणे, बनावट मान्यता, दंगलसदृश परिस्थिती निर्माण करून कागदपत्रे पळविणे, असे गुन्हे केल्याच्या बातम्या दिल्या म्हणून संभाजी शिरसाट याने ‘सकाळ’चे बातमीदार, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे उपाध्यक्ष संतोष शाळिग्राम यांच्यावर शिक्षण आयुक्त कार्यालयातच हल्ला केला.
शाळिग्राम हे शिक्षण विभागाचे बातमीदार असल्याने नियमितपणे बातमी घेण्यासाठी बालभारतीच्या आवारातील शिक्षण आयुक्त कार्यालयात गेले होते. त्यांच्याबरोबर इतर वृत्तपत्रांचे दोन बातमीदारही होते. आयुक्त हे दौऱ्यावर असताना, त्यांचे स्वीय सहायक पावरा यांच्याशी चर्चा करीत असताना शिरसाट हा तिथे आला आणि त्याने, माझ्या विरोधात बातम्या छापतो, असे म्हणत अर्वाच्च भाषेत शिवागाळ करण्यास सुरवात केली. अन्य दोन गुंड त्याच्याबरोबर होते. 
 
‘‘माझ्या विरोधात बातमी दिली, तर कायमचा संपवून टाकीन,’’ अशा भाषेत त्याने जीवे मारण्याची धमकी त्याने दिली. त्याचे धमकावणे आणि शिवीगाळ सुरू असतानाच शिक्षण आयुक्तांचे स्वीय सहाय्यक पावरा यांनी, आयुक्तांच्या कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. येथे कोणतेही गैरकृत्य, दमदाटी करू नका, असे शिरसाट याला सांगितल्यानंतर त्याने तेथून पळ काढला. या प्रकरणी शाळिग्राम यांनी डेक्‍कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. शिरसाट हा प्राणघातक हल्ला करण्याचा तसेच त्याच्यापासून जीवाला धोका असल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. 
 
कोण आहे शिरसाट? 
संभाजी शिरसाट हा आकुर्डीतील शिक्षक असून, शैक्षणिक कामे करून घेण्यासाठी मध्यस्थीचे काम तो करतो. दररोज शिक्षण आयुक्त, उपसंचालक कार्यालयात येऊन कामे घेण्यासाठी कर्मचाऱ्यांना धमकावणे, अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करणे, मारण्याची धमकी देणे, कर्मचाऱ्यांविरुद्ध खोटे तक्रार अर्ज देणे आदी तक्रारी आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांनी त्याच्याविषयी शिक्षण आयुक्त पुरुषोत्तम भापकर, उपसंचालक रामचंद्र जाधव यांच्याकडेही दिल्या आहेत. कनिष्ठ प्रशासन अधिकारी बी. एम. बोरनारे यांनाही शिरसाट याने शिवीगाळ केली होती. तसेच त्यांच्या कार्यालयात दंगलसदृश परिस्थिती निर्माण करून कागदपत्रे पळविली होती. या विषयी बोरनारे यांनी वरिष्ठ आणि बंडगार्डन पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज केला आहे.(सकाळवरून साभार )

LEAVE A REPLY