सकाळ’च्या बातमीदारावर चारा छावणी ठेकेदाराचा भ्याड हल्ला

0
1103

माडग्याळमधील घटना – दत्ता सावंत यांच्यासह पत्नीसही मारहाण, ठेकेदारासह दोघांवर गुन्हा
सांगली/जत – ‘सकाळ‘चे माडग्याळ (ता. जत) येथील बातमीदार दत्ता शंकर सावंत (वय 46) यांच्यावर गावातीलच चारा छावणीचा ठेकेदार आणि शिवसेनेचा तालुका उपप्रमुख प्रदीप करगणीकर याने आज भ्याड हल्ला केला. चारा छावणीत निकृष्ट चाऱ्यामुळे तेरा जनावरांचा मृत्यू झाल्याचे प्रकरण उघडकीस आणून चौकशीचा ससेमिरा मागे लावल्याच्या रागातून करगणीकरसह ग्रामपंचायत सदस्य अशोक माळी यांनी आज दुपारी अडीचच्या सुमारास हा हल्ला केला.

दरम्यान, याप्रकरणी जिल्हाभरातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. दोषींवर कडक कारवाईची सूचना जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी दिली आहे. जखमी श्री. सावंत यांनी दोघांविरुद्ध फिर्याद दिली. त्यानुसार करगणीकर आणि माळी यांच्या विरुद्ध सावंत यांच्या पत्नीचा विनयभंग केल्याचा, तसेच श्री. सावंत यांना ढकलून देऊन मारहाण करून शिवीगाळ, दमदाटी केल्याबद्दल गुन्हा दाखल झाला.

दत्ता सावंत हे गेली वीस वर्षे “सकाळ‘चे माडग्याळचे बातमीदार म्हणून काम करीत आहेत. त्यांनी माडग्याळ येथील दूध संस्थेच्या माध्यमातून चालवल्या जात असलेल्या चारा छावणीतील निकृष्ट चाऱ्याचे प्रकरण उघडकीस आणले. गेल्या चार दिवसांपासून “सकाळ‘मध्ये त्या बाबतचे वृत्त प्रसिद्ध होत आहे. सातत्याने ऊस खाऊन बारा जनावरांचा मृत्यू झाल्याची पहिली बातमी 4 जुलै रोजी प्रसिद्ध झाली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले. काल आणखी एका बैलाचा मृत्यू झाल्याची बातमी आजच्या “सकाळ‘मध्ये प्रसिद्ध झाली. दुष्काळाची दाहकता लक्षात घेऊन गोरगरीब शेतकऱ्यांच्या हिताच्या बाजूने दत्ता सावंत यांनी हा विषय लावून धरला. ही छावणी चालवण्यात प्रदीप करगणीकरचा पुढाकार आहे. तो या प्रकरणात चिडून होता. त्याचा राग मनात धरून त्याने हल्ला केला.

माडग्याळ येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत दुपारी करगणीकर आणि माळी गेले होते. तेथे मुख्याध्यापकांना सांगून दत्ता सावंत यांना शाळेत बोलावून घेतले. दत्ता यांच्या पत्नी निर्मला यांचा सहभाग असलेल्या बचत गटाकडे शाळेच्या पोषण आहाराचा ठेका आहे. त्यामुळे दत्ता यांचे शाळेत नियमित येणे-जाणे असते. काही कामानिमित्त बोलावले असेल, अशा समजातून ते शाळेत गेले. तेथे या दोघांनी दत्ता यांना दमबाजी सुरू केली. दत्ता यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, ‘तुला चारा छावणीची बातमी थांबव, असा निरोप दिला होता की नाही? तरी तू का बातमी छापलीस. आता तुला बघून घेतो. तुला मस्ती आली आहे,‘‘ असे म्हणत अर्वाच्च शिवीगाळ केली.

दत्ता यांच्या पत्नीकडे पोषण आहाराची जबाबदारी आहे, याची माहिती त्याला होती. त्यामुळे त्याने मुख्याध्यापकांना “ठेका कोणाकडे आहे. बोलवा त्यांना…,‘ असा दम भरला. दत्ता यांची पत्नी तेथे आली. त्या दोघांनी त्यांनाही शिवीगाळ केली. त्यांना दत्ता यांनी रोखण्याचा प्रयत्न केल्यानंतर बेदम मारहाण सुरू केली. निर्मला यांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांच्याशीही झटापट केली. त्यांनी दत्ता यांना गेटवर ढकलून दिले. तेथे ते बेशुद्ध पडले. त्यानंतर सगळे पळून गेले.

या प्रकारानंतर दत्ता यांच्यावर स्थानिक रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी जत येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. डोक्‍याला जबर मार लागल्याने त्यांना सांगलीला हलविण्याचा सल्ला डॉक्‍टरांनी दिला आहे.

सोशल साईटवर निषेध
‘सकाळ‘च्या पत्रकारावर हल्ला झाल्याचे वृत्त कळताच वॉटस्‌ ऍप आणि फेसबुक या “सोशल साईट‘वर निषेध सुरू झाला. स्वयंसेवी संस्थांसह सर्व स्तरांतून या प्रकाराचा निषेध करण्यात आला. दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी सोशल साईटवरून केली जातेय.

पत्रकार एकजुटीने आज पोलिस अधीक्षकांना भेटणार
बातमीदार दत्ता सावंत यांच्यावर हल्ला करणाऱ्यांवर तत्काळ व कडक कारवाई केली जावी, या मागणीसाठी उद्या (ता. 8) सकाळी 11 वाजता पोलिस मुख्यालयात विविध पत्रकार संघटना एकजुटीने जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांची भेट घेणार आहेत. त्यात वृत्तवाहिनीचे पत्रकार, छायाचित्रकार सहभागी होणार आहेत. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे, सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष जालिंदर हुलवान यांनी या प्रकरणाचा निषेध नोंदवत तत्काळ कारवाईची मागणी केली.

एसपींकडून गंभीर दखल
दत्ता सावंत यांच्यावरील हल्ल्याची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी त्याची गंभीर दखल घेतली. जतचे पोलिस उपाधीक्षक नागनाथ वाकुडे, उमदीचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश वाघमोडे यांना तत्काळ चौकशी करून कारवाईचे आदेश दिले. सावंत यांच्या घरासमोर पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.

‘या प्रकरणाची संपूर्ण चौकशी केली जाईल. त्यात दोषींची गय केली जाणार नाही. बातमीदार दत्ता सावंत यांना संरक्षण दिले आहे.‘‘
– नागनाथ वाकुडे, पोलिस उपाधीक्षक, जत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here