साखळी आणि भांडवलदारी वर्तमानपत्रांचे मोठ्या प्रमाणावर आक्रमण झालेलं असताना आणि त्यांच्या जिल्हावार आवृत्यांनी स्थानिक वर्तमानपत्रांची दमछाक केलेली असताना देखील महाराष्ट्रात आजही अशी अनेक वर्तमानपत्रं आहेत की ती आपला आब आणि दबदबा तर टिकवून आहेतच त्याच बरोबर लोकमनातील त्यांच्या स्थानालाही अजिबात धक्का लागलेला नाही.साधनसामग्रीचा अभाव,भांडवलाची कमतरता,कुशल कर्मचारी वर्गाची टंचाई यासारख्या अनेक समस्यांना तोंड देत ही वर्तमानपत्रं टिकून आहेत , याचं कारण त्यांची जनहिताची भूमिका हेच आहे.लोकसेवा हाच उद्देश आणि केवळ पत्रकारितेवरील निष्ठेतून सुरू झालेली ही वर्तमानपत्रं आजही स्थानिक जनतेला आपला आधार वाटतात.अशा दैनिकांमध्ये नांदेडचा प्रजावाणी,अमरावतीचा हिंदुस्थान,साताऱ्याचा ऐक्य, जळगावचा जनशक्ति, नागपूरचा तरूण भारत,मुंबईचा नवाकाळ,चिपळूणचा सागर,नाशिवकचा गावकरी,ठाण्याचा सन्मित्र,ललकार,प्रभात मातृभूमी,धुळ्याचा आपला महाराष्ट्र आदि दैनिकांचा आवर्जुन उल्लेख करावा लागले.याच परंपरेतल्या सोलापूरच्या संचारचाही विसर पडू देता येणार नाही.नानासाहेब परुळेकरांनी वेगवेगळे प्रयोग करीत सकाळला जनतेचा पेपर अशी ओळख करून दिली.रंगा अण्णा वैद्य यांनी ंदेखील असेच प्रयोग करीत संचारला सोलापूरकरांच्या जीवनाचं एक अविभाज्य अंग अशा सन्मान मिळवून दिला.मराठवाडयात अनंत भालेराव यांच्या मराठवाडाचे जे स्थान होतं तेच स्थान सोलापूरात संचारचं होतं. सोलापूरकरांी चादरी आणि सोलापूरचा संचार ही त्याकाळी सोलापूरची ओळख होती. सामांन्य माणसाशी संचारशी अशी नाळ जुळलेली होती की,पेपर म्हणजे संचार असंच तेव्हा बोललं जायचं. प्रश्न मग गिरणी कामगारांचा असो,बिडी कामगारांचा असो,चादरीच्या कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांचा असो,अक्कलकोटच्या पाण्याचा असो नाही तर शहरातील रस्तयाचा संचारनं हे प्रश्न हिरीरिनं मांडले.केवळ मांडलेच नाही तर अनेक लढ्यांचं नेतृत्व संचारनं केलं.जनमत संघटीत केलं. त्यांच समर्थपणे नेतृत्व केलं आणि जनतेला न्याय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली.1984 ते 86 या काळात मी सोलापूर तरूण भारतमध्ये होतो.तभा नव्यानंच सुरू झाला होता.त्या अगोदर केसरीही सोलापुरात आला होता.कालांतरानं लोकमत,सकाळ,दिव्य मराठी अशी वर्तमानपत्रं आली.मात्र काळाची पाऊलं ओळखून संचारनं स्पर्धेला तोंड देण्याची सिध्दता केली होती.संचार रंगीत झाला होता.उत्तम लेआऊट,आकर्षक मांडणी आणि लोकांच्या जिवाभावाची भूमिका घेऊन चालणारा संचार भांडवली वर्तमानपत्राच्या स्पर्धेथही टिकून राहिला.रंग-रूपात बदल झाले असले तरी अण्णांनी संचारला सामाजिक बांधिलकीची जी शिकवण दिली होती ती संचारची धुरा वाहनारी आजची पिढीही विसरली नाही हे संचारचं यश आहे.विश्व समाचार असेल किंवा संचार असेल या दैनिकांनी पत्रकारांची नवी पिढी घडविली.आज सोलापूरमध्ये जी नावाजलेली पत्रकार मंडळी आहे ती कधी तरी विश्व समाचार किंवा संचारमध्येच कार्यरत होती.त्यामुळे पत्रकारितेची शाळा अशा अर्थानं या दानिकांनी केलेलं कामही महत्वाचं आहे.रंगाअण्णांनी पत्रकाराचे संघटन करून पत्रकारांचा आवाजही बुलंद कऱण्याचा प्रय़त्न केला ते मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्षही होते.सोलापूर जिल्हा मराठी पत्रकार संघाची उभारणी आणि वाटचालीतही त्यांचा आणि संचारचा मोठा वाटा होता.अशा प्रकारे सोलापुरच्या सामाजिक,सांस्कृतिक,राजकीय चळवळींचा आधार राहिलेला संचार आज 54 वर्षांचा झाला आहे.संचारला मनःपूर्वक शुभेच्छा.संचारनं लोकसेवचे व्रत अविरतपणे सुरू ठेवावे एवढीच अपेक्षा ( SM)