विठ्ठल लक्ष्मण तथा भाई कोतवाल याचं नाव आजच्या पिढीला माहिती असण्याची शक्यता नाही.कारण इतिहासातील ज्या घटना सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारख्या आहेत त्यावर कमी चर्चा होते आणि ज्या घटनांमुळे समाजमन दुभंगू शकते अशा घटनांचीच चर्चा होताना दिसते.त्यामुळं स्वातंत्र्य लढयातील अनेक अभिमान वाटाव्या अशा घटना आजच्या पिढीसमोर येतच नाहीत.भाई कोतवाल यांच्याबाबतीत असंच झालेलं आहे.कट्टर देशप्रेमी,अत्यंत बुध्दीमान,उत्कृष्ट संघटक,मितभाषी भाई कोतवाल यांचा जन्म 1 डिसेंबर 1912 चा..अवघें 31 वर्षाचं आयुष्य लाभलेल्या भाई कोतवालांनी अल्पायुषात असा काही पराक्रम गाजविला की,त्यामुळं इंग्रजांनाही तोंडात बोटं घालावी लागली होती.1942 च्या चळवळीत भाई कोतवाल आणि त्यांच्या साथीदारांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते.र्रेल्वेचे रूळ उखडणे,विजेच्या तारा तोडणे,यासारख्या घातपाती कारवाया करून जंगलात पसार होण्याच्या पध्दतीनेमुळे इंग्रज त्रस्त झाले होते.त्यामुळंच इंग्रजांनी भाई कोतवाल आणि गोमाजी रामा पाटील यांना पकडून देणार्‍यास किंवा त्यांचा ठावठिकाणा सांगणार्‍यास प्रत्येकी पाच हजार रूपयांचे बक्षीस देण्याचे जाहीर केले होते.पैश्याच्या लालसेनं काही गद्दारांनी जंगलात लपलेल्या भाईंचा ठावठिकाण पोलिसांना सांगितला.त्यानुसार हॉल नावाचा पोलीस अधिकारी 100 पोलिसांचा ताफा घेऊन जंगलात घुसला.प्रारंभी हिराजी पाटील हुतात्मा झाले.त्यानंतर भाई कोतवाल यांच्यावर गोळ्यांचा पाऊस पाडला गेला.सिध्दगडच्या पवित्र भूमीत भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांना हौतात्म्य प्राप्त झाले.तो दिवस होता 2 जानेवारी 1943 चा…इंग्रजांच्या गोपनीय अहवालात भाई कोतवाल यांचा उल्लेख मॅन ऑफ दि पीपल असा केलेला होता.हा सारा इतिहास तसा जगाला माहितीच नव्हता..नाही.

भाई कोतवालांचा हा सारा इतिहास सांगण्याचं कारण असं की,त्यांच्यावर शहीद भाई कोतवाल नावाचा चित्रपट येत आहे.येत्या 24 जानेवारी रोजी हा चित्रपट आपल्याला पडद्यावर पहायला मिळणार आहे.निर्माते प्रवीण पाटील आणि दिग्दर्शक एकनाथ देसले यांना धन्यवाद यासाठी दिले पाहिजेत की,इतिहासात फारशी दखल न घेतल्या गेलेल्या गेलेल्या महत्वाच्या घटनेवर प्रकाशझोत पडणार आहे.हा चित्रपट गुणवत्तेच्या निकषावर उतरतो की नाही यापेक्षा एका दुर्लक्षित विषयावरचा चित्रपट आहे हे महत्वाचे आहे.भाई कोतवालांचा इतिहास या चित्रपटाच्या निमित्तानं जगासमोर येत आहे त्याचं स्वागत केलं पाहिजे.प्रत्येकांनं हा चित्रपट आवर्जुन पाहिला पाहिजे.रायगडात असताना भाई कोतवाल यांच्यी जीवनचरित्राचा अभ्यास कऱण्याची संधी मिळाली होती.जेथे भाई कोतवाल हुतात्मा झाले ते स्थळही अनेकदा पाहिलेलं आहे.अंगावर शहारे आणणारा,धगधगता हा सारा इतिहास रूपेरी पडद्यावर यावा असं मनोमन वाटायचं..पण उशिरा का होईना आता भाईंचा संघर्ष पडद्यावर येत आहे याचा नक्कीच आनंद आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here