साधारणतः सहा वर्षांपुर्वी इसाकभाईंच्या एक बातमी वाचनात आली.’गडचिरली भागातल्या असंख्या आदिवासींना दिवाळी कशी असते हे देखील माहिती नाही.दिवाळीचा फराळही त्यांना मिळत नसल्याचा’ उल्लेख बातमीत होता.आपण त्यांच्यासाठी काय करू शकतो याचं विचारचक्र मग इसाकभाईंच्या डोक्यात सुरू झालं.त्यातून गडचिरोलीतील आदिवांसींच्या बरोबर दिवाळी साजरी करण्याची एक विलक्षण कल्पना त्यांना सूचली.कुठं माढा,कु़ठं गडचिरोली ? माढ्ावरून तिकडं जायलाच तीन दिवस लागतात.तरीही इसाकभाईंनी निर्धाऱ केला आणि सहा वर्षांपूर्वी दिवाळीचे गोड पदार्थ घेऊन ते गडचिरोलीला पोहोचलेही.मग हा उपक्रम त्यांच्या आयुष्याचाच भाग बनला.पहिली एक दोन वर्षे लोकांनाही थोडं विचित्र वाटलं.नंतर मात्र हा उपक्रम केवळ इसाकभाईंपुरताच सीमित राहिला नाही.सार्या वडशिंगे आणि सभोवतालच्या गावचा तो उपक्रम बनला.दिवाळी आली की,गडचिरोलीच्या आदिवासींसाठी पदार्थ कऱण्याची धावपळ गावात सुरू होते.गावातील महिला,आचारी आणि सारं गावचं मग त्यात हातभार लावतं.कुणी साखर देतं,कुणी डाळ, कुणी तेल तर कुणी रोख रक्कम.त्यातून शेकडो आदिवासींना पुरतील एवढे पदार्थ तयार होतात.मग हे सारे पदार्थ व्यवस्थित पॅक करून ट्रक मधून गडचिरोलीकडं रवाना होतात .दोन वर्षांपासून गोड पदार्थांबरोबरच आदिवासी महिलांना भाऊबीज म्हणून साडयाही दिल्या जात आहेत.मागच्या वर्षी मुलांसाठी वह्या आणि पुस्तकंही दिली जाऊ लागली आहेत.ही आता वडशिंगे गावातील एक चळवळ बनली आहे.सामांन्य माणसं जेव्हा एकत्र येतात तेव्हा काय चमत्कार होऊ शकतो हे वडशिंगेत दिसलं.परिसरात काही धनिक आहेत नाही असं नाही पण ते सारे या चळवळीपासून चार हात दूर असतात. “इसाकभाईंच्या या सामाजिक कार्यामागं त्यांची काही राजकीय महत्वाकांक्षा तर नाही ना ?” अशा प्रश्नाचा किडा त्यांच्या डोक्यात वळवळत असतो. काहींना इसाकभाईंची लोकप्रियताही डोळ्यात खुपत असते.त्यातून ही बडी माणसं लांब असली तरी पंचक्रोशितली सामांन्य माणसं इसाकभाईंवर प्रेम करतात आणि त्यांच्या सार्या उपक्रमात त्यांच्या पाठिशी असतात.
इसाकभाईंची ही चळवळ पाच-सात वर्षे बिनबोभाट सुरू आहे.यंदा मात्र वृत्तपत्रांनी आणि इलेक्टॉनिक मिडियानं त्यांची दखल घेतली.त्यांचा उपक्रम राज्यभर पोहोचला.मलाही हे सारं पाहण्याची उत्सुकता होती.ेपरंपरेनुसार यंदाही फराळ,साड्या आणि वह्या पुस्तकांनी भरलेला ट्रक घेऊन इसाकभाई आणि नितीन जाधव गडचिरोलीला मार्गस्थ झाले.त्यांना निरोप देण्याचा जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचा योग मला आला.माझ्याबरोबर पुणे जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष विनायक कांबळे तसेच माजी उपाध्यक्ष सुनील वाळुंजही होते.करमाळा तालुक्यातील आयएएस अधिकारी बालाजी मंजुळे ( सध्या यांची पोस्टींग हैदराबादला आहे ) ,मंत्रालयातील मुख्यमंत्री आरोग्य कक्षाचे प्रमुख ओमप्रकाश शेटे ,त्यांचे ज्येष्ठ बंधू डॉक्टर शेटे, मुंबईतील साम टीव्हीचे मंगेश चिवटे आदिं उपस्थित होते.या सर्वांची भाषणं ह्रदयस्पर्शी झाली.एका चांगल्या कार्यक्रमास आपणास उपस्थित राहाता आलं याचा आनंद मी घेतला.
निघताना इसाकभाईंनी मानधनाचं पाकीट समोर केलं.मला लाजल्याहून लाजल्यासारखं झालं. काय इसाकभाई ? एवढंच म्हणालो आणि खालीमान घालून निघालो. आपण छोटं काही केलं तरी बेंडबाजा वाजवत राहतो.अनेकजण तर न केलेल्या कामाचंही श्रेय लाटण्यासाठी धडपड करीत असतात.मात्र इसाकभाई नावाचा कमी शिकलेला एका साधा सरळ माणूस या सार्यांपासून कोसो मैल दूर आहे.अशी अवलिया माणसं ही आहेत याची पुन्हा एकदा प्रचिती आली. ( एस.एम.)