रायगड वार्तापत्र

  0
  754

  रायगडमध्ये जलयुक्त शिवारची 351 कामे पूर्ण

  रायगड जिल्हयात जलयुक्त शिवार योजनेतून 1 हजार 350 कामे सुचविण्यात आली असून त्यापैकी 351 कामे पूर्ण झाली आहेत तर 14 कामे प्रगती पथावर आहेत.या कामांसाठी आतापर्यत 7 कोटी 35 लाख 578 रूपयांचा निधी खर्च झाला असला तरी उर्वरित कामांसाठी आणखी 12 कोटी रूपयाच्या निधीची आवश्यकता आहे. आवश्यक निधी प्राप्त झाल्यानंतर उर्वरित कामं मार्गी लागतील असं जिल्हा कृषी अधीक्षक के.बी.तरकसे यांनी सांगितलं.रायगड जिल्हयात भरपूर पाऊस पडत असला तरी पाण्याच्या नियोजनाच्या अभावामुळे पावसाचे पाणी समुद्राला जाऊन मिळते आणि डिसेंबरपासूनच जिल्हयात पाणी टंचाई जाणवायला लागते.या स्थितीवर मात करण्यासाठी जानेवारीपासून जलयुक्त शिवार अभियान जिल्हयात हाती घेतले गेले आहे.पावसाळ्यात कामांची गती मंदावली होती मात्र पुन्हा एकदा आता कामांना वेग येताना दिसतो आहे.या अभियानांतर्गत सलग समतल बंधारा,माती नाला बंधारा,दगडी बंधारा,गॅबियन बंधारा,शेततळे,बंधारा दुरूस्ती,वळण बंधारे ,सिमेंट बंधारे उभारण्यात आले आहेत.या योजनेंअतर्गत पोलादपूरमध्ये सर्वाधिक 43 कामे झाली असून अलिबाग तालुय्ता 15 कामे मार्गी लागली आहेत.– रायगडमध्ये जलयुक्त शिवारची 351 कामे पूर्ण

   रायगडमध्ये पाणी पुरवठ्याच्या 480 योजनांना मंजुरी

  एकीकडे जलयुक्त शिवार अभियान रायगडमध्ये जोरात सुरू असतानाच जिल्हयात पाणीपुरवठा कऱणार्‍या 480 योजना हाती घेण्यात आल्या असून रायगड जिल्हा परिषद त्यावर 80 कोटी रूपये खर्च कऱणार आहे.जिल्हयातील बंद पडलेल्या किंवा अर्धवट अवस्थेत असलेल्या योजना नव्याने कार्यान्वित करण्याचा प्रयत्न या माध्यमातून होत आहे.जिल्हयात पावसाळ्यात लघु पाटंबंधारे प्रकल्पाची 28 धरणं दुथडी भरून वाहात असली तरी नंतर पाणी टंचाई जाणवायला लागते.अनेक गावांना टँकरने,बैलगाडीतून किंवा होडीतून पाणी पुरवठा करावा लागतो.त्यासाठी जिल्हा प्रशासन दरवर्षी कोट्यवधी रूपये खर्च करते.मात्र अशा तात्पुरत्या उपाययोजनांमुळे पाणी टंचाईचा कायमस्वरूपी प्रश्‍न मिटविता येत नाही.मात्र आता 480 योजना पूर्णत्वास गेल्यास अनेक गावातील ग्रामस्थांची तहान भागणार असल्याने जिल्हयाच्या ग्रामीण भागातील जनतेत समाधान व्यक्त होत आहे.या प्रकल्पांतर्गत जुन्या योजनांबरोबरच काही ठिकाणी नव्या योजनाही हाती घेण्यात आल्या आङेत..

   रायगड जिल्हा परिषद तयार करणार स्वतःची वीज

  अपारंपारीक उर्जास्त्रोतांचा वापर करून वीज निर्मिती करण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प रायगड जिल्हा परिषदेने हाती घेतला असून या सौर उर्जा प्रकल्पातून रायगड जिल्हा परिषदेला दर तासाला 10 युनिट वीज मिळणार आहे.अशा पध्दतीने वीज निर्मिती करून आपली गरज भागविणारी रायगड जिल्हा परिषद ही राज्यातील पहिली जिल्हा परिषद ठरणार आहे.सौर उर्जा प्रकल्पातून मिळणार्‍या विजेचा पुरवठा अंतर्गत वरहांडे,जिने आणि स्वच्छतागृहे प्रकाशमान करण्यासाठी होणार आहे.जिल्हा परिषदेचे मुख्यालय अलिबागेत आहे.या कार्यालासाठी दर महा सव्वा लाख ते एक लाख चाळीस हजार रूपयांपर्यत वीज बिल येते.हा खर्च कमी करण्यासाठी स्वतःची वीज निर्मिती करण्याचा विचार जिल्हा परिषदेने केला आहे.त्याचा सविस्तर अहवाल बांधकाम विभागाने तयार केला असून हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर दरमहा जिल्हा परिषदेची जवळपास वीस हजार रूपयांची बचत होणार आहे.सौर उर्जा निर्मिती प्रकल्पांतर्गत जिल्हा परिषदेच्या इमारतीवर 10 केव्ही क्षमतेची सौर उर्जा निर्मिती करणारा संच बसविण्यात येणार आहेत.त्यासाठी 27 लाख रूपयांचा खर्च अपेक्षित आहे.या प्रकल्पामुळे 2हजार 400 युनिटची बचत होणार आहे.-

   नगरपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजले.

  रायगड जिल्हयात नव्यानेच निर्माण झालेल्या पाच नगरपंचायतीच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाल्याने आता या नगरपंचायतीच्या निवडणुकांची लगबग सुरू होणार आहे.जिल्हयातील माणगाव,तळा,म्हसळा,पोलादपूर,खालापूर,आणि पाली येथील ग्रामपचांयतींचे रूपांतर आता नगरपंचायतीत होणार आहे.यापैकी पाली नगरपंचायत करण्यास हरकत घेण्यात आली असून हा वाद सध्या मुंबई उच्च न्यायालयात पोहोचला आहे.त्यामुळे पाली वगळून इतर नगरपंचायतीचे आरक्षण जाहीर झाले आहे.त्यानुसार म्हसळा नगर पंचायत मागास प्रवर्गासाठी राखीव असणार असून तळा,खालापूर,पोलादपूर मध्ये महिलांचा खुलाप्रवर्गासाठी राखीव असणार आहे.तर माणगाव नगरपंचायत खुल्या प्रवर्गासाठी रीखीव असेल. जिल्हा परिषद निवडणुकांच्या अगोदर नगरपंचायतीच्या निवडणुका होत असल्याने त्यांच्या माध्यमातून ग्रामीण रायगडवर आपले वर्चस्व आहे हे  सिध्द करण्यासाठी सारेच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.शिवसेना,कॉग्रेस,राष्ट्रवादी,भाजप,शेकाप या पाचही पक्षांनी उमेदवारांची चाचपणी सुरू केली असून  आघाडी करण्यापेक्षा स्वबळावर निवडणुका लढवून आपली ताकद आजमाविण्याचा प्रत्येक पक्षाचा प्रयत्न असणार आहे.सध्या नगरपंचायत हद्दीतील याद्या अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे.निवडणुकाच्या तारखा जाहीर झाल्यानंतर सारा रायगड ढवळून निघणार आहे.—

  – शोभना देशमुख 

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here