रायगड बाजारवर हातोडा

  0
  795

  रायगड बाजारवर हातोडा
  रायगड बाजार हे अलिबागचं वैभव होतं.स्थानिक व्यापाऱ्यांकडून गोर-गरीब जनतेची होणारी अडवणूक,फसवणूक टाळण्यासाठी दत्ता पाटील आणि प्रभाकर पाटील या बंधुंनी अनेत अडथळ्यावर मात करीत रायगड बाजारची मुहूर्तमेढ रोवली.रायगड बाजार सुरू करताना त्यांच्यासमोर वारणा बाजारचा आदर्श होता.मॉल संस्कृती अजून आलेली नसली तरी अत्याधुनिक पध्दतीनं सजविलेला, सुई-दोरी पासून दोरखंडापर्यत साऱ्या वस्तू एकाच इमारतीत उपलब्ध करून देणारी नवी व्यवस्था अलिबागकरांना नक्कीच भावली.पाटील बंधूंचे विरोधकही रायगड बाजारमध्ये जाऊन खरेदी करायचे.रायगड बाजार म्हणजे रास्त भाव,रास्त वजन आणि विश्वासार्हतेचं दुसरं नाव झालेलं होतं.त्यामुळं जिल्हयात रायगड बाजारच्या शाखांचं जाळं विणलं गेलं.तरूणांना रोजगार उपलब्ध झाला आणि रायगड बाजारची फौज शेकापच्या दिमतीलाही आली.दोन्ही बाजूंनी लाभ होता.मात्र ज्यांनी हा बाजार उभा केला ती पाटील बंधूंची पिढी गेली.नव्या पिढीच्या हाती बाजारची सूत्रे आली.नवी पिढी जास्तच कमर्शियल असल्यानं त्यांना सहकार तत्वावर चालणारी आणि सर्वच शहरातील मोक्याच्या जागा अडवून बसलेली रायगड बाजार ही व्यवस्था अडचणीची वाटायली लागली.सहकार तत्वावर चालणारा रायगड बाजार मोडीत काढून त्याठिकाणी व्यक्तिगत स्वरूपाचा मॉल काढता यावा यासाठी बाजारचे विसर्जन करण्याचे मनसुबेही बाजारच्या नव्या कारभाऱ्यांच्या मनात घोळत होते.त्यासाठी रायगड बाजार तोटयात कसा चालेल अशी रजना केली गेली.अगोदर बाजारमधील जे तळमळीचे,निष्टावान आणि कल्पक अधिकारी होते त्यांच्या हाती नारळ दिलं गेलं.मग दुय्यम दर्जाच्या वस्तू ठेवल्या जायला लागल्या.जीवनाश्यक वस्तू मिळणार नाहीत,पर्यायानं ग्रहक नाराज होतील असं नियोजन केलं जाऊ लागलं.व्यवस्थापन त्यात यशश्वी झालं. एका पाठोपाठ एक पध्दतीनं जिल्हयातील शाखांना कुलुपं लागायला लागली.हे सारं अगदीच गुपचूप सुरू होतं.अखेर आता अलिबागच्या मुख्य शाखेवर हातोडाच पडला.रायगड बाजारच्या जागेचा वाद होता.माजी नगरसेवक अमर वार्डे आणि ऍड.सागर पाटील यांनी येथील न्यायालयात दाद मागितली होती.त्यानुसार नगरपालिकेनंं रायगड बाजारची बेकायदा इमारत पाडून नगरपालिकेन आपली जागा ताब्यात द्यावी असा आदेश दिला होता.या विरोधात रायगड बाजार ज्या संस्थेच्यावतीन ं चालविलं जात होतं त्या श्रीबाग सहकारी मध्यवर्ती ग्राहक मंडळानं वरच्या न्यायालयात अपिल केलं.मात्र आता अचानक श्रीबाग आणि रायगड बाजारनं आपलं अपिल मागं घेतल्यानं इमारत पाडण्याची कारवाई सुरू केली गेली.निकाल विरोधात गेल्यानंतर वरच्या न्यायालयात जाण्याची सोय असतानाही व्यवस्थापनानं निकालाप्रमाणं इमारत केवळ मोकळीच केली असं नाही तर पाडून टाकली.व्यवस्थापनानं ठरविलं असतं तर रायगड बाजार वाचलाही असता पण तसं कोणाला वाटत नव्हतं.अखेर बाजारला बुलडोझर लागलं.रायगड बाजारला लागलेलं बुलडोझर पाहून सारं अलिबाग हळहळलं.
  योगायोग असा की,ज्या दिवशी रायगड बाजार पाडला जात होता त्या दिवशी मी अलिबागेतच होतो.रस्त्यावरून जाताना रायगड बाजारची इमारत पाडली जात असल्याचं पाहून मुद्दाम थांबलो.चौकशी केली.वस्तुस्थिती कळली तेव्हा मलाही हळहळ वाटली.तब्बल अठरा वर्षे रायगड बाजार आणि माझंही एक जिव्हाळ्याचं नातं निर्माण झालं होतं.सरव्यवस्थापक सरनाईक आणि व्यवस्थापक नागेश वंजारे यांना भेटण्यासाठी दिवसातूनन एक तरी चक्कर रायगड बाजारात व्हायची.खरेदीही तेथूनच व्हायची.अशी ही वास्तू पाडताना पाहून दुःख तर नक्कीच झालं.कोकणात सहकार रूजत नाही असं म्हटलं जातं.त्यात काही अंशी तथ्यही आहे.रायगडात मात्र तो यशस्वी होताना दिसत होता.मात्र ज्यांनी सहकार यशस्वी करून दाखविला तीच मंडळी आता हा सहकार मोडित काढायला निघाली आहे.रायगड बाजारवर पडलेला हातोडा हा केवळ एका इमारतीवर पडलेला हातोडा नसून तो सहकार चळवळीवरचाच हातोडा आहे असं मला वाटतं.कालौघात बदल अटळ आणि अपरिहार्य असले तरी हे बदल सामांन्यांचा बळी देऊन,त्याचं हित डोळ्याआड करून होता कामा नयेत.तो दिला गेला.अनेक रोजीरोटीला मुकले.
  रायगड बाजारची जागा अलिबागमधील सोन्यासारखी जागा आहे.त्या जागेवर अनेकांचा डोळा आहे.ती जागा आता व्हाया नगरपालिका कोणाच्या घश्यात जाते हे पाहणे रंजक असेल.अर्थात सामांन्यांना त्यात रस नसला तरी अलिबागमधील एक चांगली संस्था संपविली गेली, जवळपास इतिहास जमा झाली याचं दुःख तमाम अलिबागकरांना नक्कीच आहे.

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here