नवी दिल्ली – “सतरा वर्षांपूर्वी पोखरण अणुचाचणी झाल्याची बातमी ऑल इंडिया रेडिओने प्रसारित केली आणि मला ती हिमाचल प्रदेशमधील एका चहावाल्याने त्याच्याजवळील रेडिओवर ऐकून मला सांगितली. त्याने मला याबद्दल लाडूही दिला. त्यामुळे प्रसार भारतीची सामान्य लोकांपर्यंत पोचण्याची क्षमता आणि प्रभाव दिसून आला….‘ ही प्रतिक्रिया दिली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. संत तुलसीदास यांच्या रामचरितमानसच्या प्रसार भारतीने तयार केलेल्या डिजिटल व्हर्जनचे उद्घाटन मोदींच्या हस्ते झाले. त्या वेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
मोदी म्हणाले, 1998 ला हिमाचल प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षासाठी काम करत असताना एकदा दिवसभराच्या कामामुळे थकून मी चहा घेण्यासाठी थांबलो होतो. या वेळी त्या चहावाल्याने लाडू देऊन ही बातमी सांगितली. त्याला बातमी कशी समजली, असे विचारले असता त्याने रेडिओवरून समजल्याचे सांगितले. त्या चहावाल्याला सरकारने काही तरी मोठे काम केले एवढेच समजले होते. अणुचाचणी घेऊन देशाने केलेल्या कामगिरीची त्याला निश्चित कल्पना नव्हती. तरीही त्याने आनंद व्यक्त केला होता. पर्वतीय प्रदेशातील दुर्गम भागात राहणाऱ्या या चहावाल्यापर्यंतही ही बातमी पोचवण्याच्या प्रसार भारतीच्या कामाचे मला आश्चर्य आणि आनंद वाटला.
प्रसार भारतीने भोपाळ घराण्याच्या दिग्गज गायकांनी गायलेल्या रामचरितमानसच्या सीडींचे प्रकाशन केले. या उपक्रमाबद्दल पंतप्रधान मोदींनी प्रसार भारतीचे कौतुक केले. लोकांच्या हृदयात स्थान मिळविले असल्याने आकाशवाणीला कोणत्याही स्पर्धेत उतरण्याची गरज नसल्याचे मोदींनी या वेळी सांगितले. तरीही डिजिटलायजेशन सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापरही करणे आवश्यक असल्याची पुस्ती त्यांनी जोडली. देशातील घटनांची माहिती सामान्यांपर्यंत पोचवित असल्याबद्दल आणि विविध गोष्टींबाबतची जागृती करत असल्याबद्दल मोदींनी प्रसारभारतीचे अभिनंदन केले. प्रसार भारतीकडे तब्बल 9 लाख तासांचे रेकॉर्डिंग असून, ते अमूल्य असल्याची प्रतिक्रिया मोदींनी व्यक्त केली.(सकाळवरून साभार )