मेक्सिकोतील माध्यम जगताची एकजूट 

मेक्सिकोसारख्या देशात पत्रकारिता करणे हे एरवीही जीवघेणेच. राजकारणाच्या गुन्हेगारीकरणात फारच वरची मजल गाठलेल्या या देशात अमली पदार्थविरोधी लिखाण करणारे ६० हून अधिक पत्रकार गेल्या ११ वर्षांत जिवे मारले गेले आहेत. जेविएर वाल्डेझ कार्देनास यांची १५ मे रोजी झालेली हत्या ही त्यापैकी सर्वात अलीकडली. अगदी गेल्या दोन महिन्यांत मेक्सिकोमधील ‘ड्रगमाफियां’बद्दल लिहिणाऱ्या सहा पत्रकारांचा बळी गेला आहेच. पण जगभरच्या स्पॅनिश आणि इंग्रजी वृत्तपत्रांनी वाल्डेझ यांच्याच हत्येची बातमी ठळकपणे दिली. असे का झाले?

वाल्डेझ केवळ गुन्हे वार्ताहर म्हणून कार्यरत नव्हते.. खरे तर कोणताही चांगला गुन्हे पत्रकार जसा पोलीस वा अन्य तपास यंत्रणा आणि गुंड यांच्याचपुरता मर्यादित न राहता या गुन्हेविश्वाबाहेरच्या समाजाकडेही पाहत असतो, समाजाबद्दल लिहीत असतो. समाजातल्या प्रवृत्ती आणि गुन्हे यांचे संबंध हेरत असतो, तसेच वाल्डेझ होते. त्यामुळेच, ‘मिस नाकरे’ हे अमली पदार्थ टोळीप्रमुखांच्या मैत्रिणी, प्रेयसी आणि रखेल्या यांच्याविषयीचे पुस्तक, ‘लोस मोरोस डेल नाकरे’ हे अमली पदार्थविक्रीत नकळत ओढल्या जाणाऱ्या लहान मुलांविषयीचे पुस्तक अशी पुस्तके वाल्डेझ यांनी लिहिली आणि ती महत्त्वाची ठरली. याखेरीज, टोळय़ांचा ‘पर्दाफाश’ करण्याचे किंवा टोळय़ांची व्याप्ती किती आहे याचे धागेदोरे बाहेर काढण्याचे शोधकार्यही वाल्डेझ यांनी केलेच. ‘कमिटी फॉर प्रोटेक्शन ऑफ जर्नालिस्ट्स’ या अमेरिकेतील, पण आंतरराष्ट्रीय संस्थेने त्यांना २०११ सालचा ‘प्रेस फ्रीडम अ‍ॅवॉर्ड’ हा पुरस्कार दिला. मेक्सिकोतल्या ड्रगमाफिया टोळय़ांना शस्त्रपुरवठा अमेरिकेमुळे होत राहतो, असे वृत्तान्त त्यांनी दिले होते. या वृत्तान्तांचे कौतुक म्हणून ‘आंतर-अमेरिका खंडीय सामंजस्य’ वाढविण्यासाठीचा एक पुरस्कार अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठाने त्यांना दिला.

या साऱ्यामुळे वयाच्या पन्नासाव्या वर्षी जेविएर वाल्डेझ हे ज्येष्ठ, नामांकित पत्रकार म्हणून ओळखले जात. मेक्सिकोतील अनेक पत्रकारांवर हल्ले झाले असले तरी वाल्डेझ यांची हत्या हे टोक आहे, याची जाणीव ठेवून त्या देशातील दोन प्रमुख गुन्हे वृत्तपत्रांनी बुधवारी ‘वृत्तपत्रे बंद’ची हाक दिली आहे. या दोन पत्रांपैकी ‘ट्रेसेरा व्हिया’चा पुढला अंक हा जेविएर वाल्डेझ हत्या विशेषांक असणार आहे. हा मरणोत्तर मान कोणत्याही पत्रकारासाठी दुखदच, पण मोठा म्हटला पाहिजे.

मेक्सिकोच्या सिनालोआ या राज्यात, कुलिआकान या छोटेखानी शहरात १४ एप्रिल १९६७ रोजी जन्मलेल्या जेविएर वाल्डेझ यांनी समाजशास्त्र या विषयातच सिनालोआ स्वायत्त विद्यापीठाची पदवी घेतली. ‘कानाल (चॅनेल) थ्री’ या देशव्यापी वृत्तवाहिनीचा कुलिआकान येथील प्रतिनिधी म्हणून काम करण्याची मिळालेली संधी, हा त्यांचा पहिला अनुभव. पण वाहिन्यांचे प्रस्थ वाढत असूनही, गंभीर पत्रकारितेकडे वाल्डेझ वळले आणि त्यांनी ‘नोरोएस्ते’ या स्थानिक वृत्तपत्रातील नोकरी स्वीकारली. पुढली नोकरी आणखी मोठय़ा, मेक्सिको सिटीतून प्रकाशित होणाऱ्या ‘ला जोनार्डा’ या वृत्तपत्रात केली. पण कुलिआकान हे गाव सोडले नाही. याच कुलिआकानमध्ये त्यांनी अन्य समविचारी सहकाऱ्यांसह ‘रिओडोस’ हे साप्ताहिक स्थापले. गुन्हेगारी, गुन्हेगारीकरण, भ्रष्टाचार आणि अपप्रवृत्ती हेरणाऱ्या याच साप्ताहिकाच्या कार्यालयातून १५ मे रोजी घरी जात असताना, वाल्डेझ यांची गाडी ड्रग-गुंडांनी अडवली, त्यांना खाली खेचले आणि गोळय़ांनी त्यांचा देह विच्छिन्न केला.

लोकसत्तावरून साभार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here