मृत्यूनंतरही शरद जोशी यांची शेतकऱ्यांनाच दिलदार साथ!

  0
  952

  इच्छापत्रात शेतकरी आणि सेवेकऱ्यांसाठी लाखोंचे दान

  इच्छापत्रात शेतकरी आणि सेवेकऱ्यांसाठी लाखोंचे दान; मुलींच्या नावे फक्त पुण्यातील एक सदनिका शेतकरी संघटनेचे प्रणेते दिवंगत शरद जोशी यांनी त्यांचे आयुष्य शेतकऱ्यांच्या हितासाठीच वेचले आणि या हयातभरातील स्वकष्टार्जित कमाईची विल्हेवाट लावतानाही त्यांनी शेतकऱ्यांच्याच हिताचा कळकळीने विचार केला, हे मनाला भिडणारे वास्तव त्यांच्या इच्छापत्रातून व्यक्त झाले आहे. या इच्छापत्रात शेतकऱ्यांचा, सहकाऱ्यांचा, सेवेकऱ्यांचा आणि अगदी आपल्या वाहनचालकाचाही विचार असून त्यांना काही लाखोंची रक्कम त्यांनी देऊ केली आहे. सार्वजनिक जीवनात अनेक तपांपासून काम करणाऱ्या नेत्यांच्या पश्चात त्यांच्या संपत्तीबाबत फोरशी वाच्यता होत नाही. किंबहुना, आपल्या कौटुंबिक वारसदारांपुरतेच हे इच्छापत्र मर्यादित असते. या पाश्र्वभूमीवर शरद जोशी यांच्या संपत्तीचा लेखाजोखा त्यांच्याच इच्छेनुसार पुढे आला आहे. गुरुवारी पवनारच्या नदीकाठी मोजक्या हितचिंतकांच्या उपस्थितीत प्रार्थनासभा झाली. याप्रसंगी त्यांचे अत्यंत विश्वासू सहकारी रवी काशीकर यांनी त्यांच्या इच्छापत्राबद्दल माहिती दिली. पुणे जिल्ह्य़ात आंबेठाण येथे जोशींची शेती व अंगारमळा आहे. येथील एकूण २१ एकर शेतजमिनीपैकी १५ एकर जमीन त्यांनी गतवर्षी विकली. यातून आलेल्या पैशाचे वाटप त्यांनी यात नमूद केलेले आहे. गत ४० वर्षांपासून त्यांच्यासोबत सावलीसारखे वावरणारे सहकारी व शेतकरी संघटकचे संपादक प्रा. सुरेशचंद्र म्हात्रे यांच्यासाठी २० लाख रुपये, त्यांची देखभाल करणारे अनंत देशपांडे यांच्या नावे २० लाख रुपये, गेल्या १५ वर्षांपासून जोशींच्या गाडीचे वाहनचालक राहिलेले बबनराव गायकवाड यांना १० लाख रुपये देण्याची सूचना त्यांनी केली आहे. या व्यक्तिगत वाटय़ाशिवाय हिंगणघाटच्या बुडीत शेतकरी सॉल्वंट या कारखान्याच्या भागधारक शेतकऱ्यांसाठी २५ लाख रुपयांचा वाटा दिला आहे. यवतमाळ जिल्ह्य़ातील रावेर येथील सीता मंदिरासाठी १३ लाख रुपये आहेत. स्त्री त्यागाचे प्रतीक म्हणून या मंदिरावर त्यांची विशेष श्रद्धा होती. २१ एकरपैकी उर्वरित ६ एकरासह या जागेवरील सभागृहाचा उपयोग शेतकरी संघटना प्रतिष्ठानसाठी करण्याची सूचना त्यांनी केली आहे. त्याची तूर्तास जबाबदारी रवी काशीकर यांना सांभाळायची आहे. पुण्यातील बोपोडी परिसरातील सदनिका त्यांच्या मुली गौरी व श्रेया यांच्या नावे संयुक्तपणे आहे. त्या दोघीही सध्या विदेशात वास्तव्यास आहेत. आपल्या संपत्तीची विल्हेवाट लावताना जोशी यांनी वारसदार मुली, सेवेकरी, तसेच संघटना व भागधारक शेतकरी या सर्वाचे स्मरण ठेवले, पण प्रामुख्याने बुडीत ठरलेल्या शेतकरी सॉल्वंट कारखान्याच्या भागधारक शेतकऱ्यांचे ऋण काही प्रमाणात चुकविण्याची त्यांची इच्छा संघटनाप्रेमींचे मन हेलावणारी ठरत आहे. शेतकऱ्यांच्या मालकीचा कारखाना असावा म्हणून सोयाबीन तेल उत्पादनाचा हा कारखाना जोशींच्या प्रेरणेसह व त्यांच्या १० हजार रुपयांच्या समभागासह पुढे आला. त्यांच्यावरील विश्वासापोटी शेकडो सर्वसाधारण शेतकऱ्यांनीही समभाग घेतले. तत्कालीन आमदार डॉ. वसंत बोडे व संघटना हा कारखाना चालवीत असे. भरभराटीस आलेला हा कारखाना पुढे मोडकळीस आला. शेतकऱ्यांचे पैसे बुडाले. अगदीच घायकुतीस आलेल्या काही शेतकऱ्यांनी पैशासाठी संघटना नेत्यांकडे तगादा सुरू केला. काहींनी थेट शरद जोशींकडे पत्राद्वारे व्यथा मांडली. या व्यथेची रुखरुख त्यांना लागून राहिली होती. त्यापोटीच घेणेकरी शेतकऱ्यांसाठी व्यक्तिगत हिश्शातून २५ लाख रुपये त्यांनी दिले असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली. संघटनेचे कार्य पुढे सुरू ठेवण्याच्या त्यांच्या इच्छेपोटी शेतकरी संघटना प्रतिष्ठानची भूमिका त्यांनी मांडून ठेवली. या सर्व बाबी व्यवस्थित हाताळल्या जातील. बँक व अन्य कायदेशीर तरतुदी पूर्ण झाल्यानंतर पैशाबाबत अंमलबजावणी होईल, अशी माहिती रवी काशीकर यांनी दिली. – (लोकसत्तावरून साभार)

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here