पुणे– स्वतःच्या मालकीचं तीन मजली,सुसज्ज असं तालुका स्तरावरील पहिलंच पत्रकार भवन बांधून तयार होतंय.मुळशी-पौड इथं ही इमारत उभी राहात आहे.येत्या 6 जानेवारीपर्यत पत्रकार भवनाचं काम होईल अशी अपेक्षा आहे.खाली पत्रकार परिषदांसाठी,बैठकांसाठी हॉल.दुसऱ्या मजल्यावर ऑफीस असेल.आनंदाची गोष्ट अशी की,सुसज्ज ग्रंथालयासाठी देखील इथं प्रोव्हिजन केली आहे.माझी आणि मुळशीच्या सर्व पत्रकारांची अशी इच्छा आहे की,या ग्रंथालयात जगातील जर्नालिझमची सारी पुस्तकं,संदर्भ ग्रंथ उपलब्ध असली पाहिजेत.तसं झालं तर मुळशीची पत्रकारांसाठी वेगळी ओळख निर्माण होईल.असं ग्रंथालय महाराष्ट्रत कोणत्याही पत्रकार संघाकडं नाही.
मागच्या 6 जानेवारीला इमारतीचं भूमीपूजन माझ्या हस्तेच झालं होतं.केवळ एकाच वर्षात इमारत बांधून होईल असं कुदळ मारताना मलाही वाटलं नव्हतं.अशक्य वाटणारं हे काम मुळशीच्या पत्रकारांनी करून दाखविलंय.आता येत्या 6 जानेवारीला उद्दघाटन व्हावं असा साऱ्यांचा प्रय़त्न आहे.वर्षभरात अनेक अडथळ्यावर मात करीत ही इमारत उभी राहिली आहे.पत्रकार संघाला एका दानशुरानं जागा दिली.बांधकामासाठी मदत कऱणारे अनेक हात पुढे आले.आता एक चांगली इमारत उभी आहे.आज मी, शरद पाभळे,बापूसाहेब गोरे,राजेद्र कापसे,सुनील वाळूजं यांनी मुळशीला भेट देऊन इमारतीची पाहणी केली.फार बरं वाटलं. यावेळी एका छोटेखानी कार्यक्रमात पत्रकार संघाला वेगवेगळ्या पध्दतीनं मदत कऱणाऱ्या मान्यवरांचा सत्कारही हस्ते करण्यात आला.मुळशीतलं हे पत्रकार भवन आता लोकचळवळीचं केंद्र व्हावं आणि सामांन्यांनाही ही इमारत अखेरचा आधार वाटावी एवढीच अपेक्षा.महत्वाची गोष्ट अशी की,सरकारच्या मदतीशिवाय स्वतःची वास्तू कशी उभी राहू शकते हे मुळशीच्या पत्रकारांना दाखवून दिलंय..तालुका स्तरावर पत्रकार भवनासाठी मदत देत येणार नाही असं मागचं सरकार सांगत होतं.आम्ही आता अशी मागणी केलीय की,प्रत्येक तालुक्यात पत्रकार भवनासाठी जागा मिळावी आणि बाधकामासाठी किमान दहा लाखांचा निधी सरकारनं द्यावा.पाहुया नवं सरकार काय करतंय ते..
मुळशी पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र मारणे आणि दत्तात्रय सुर्वे यांना शुभेच्छा.त्यांनी या वास्तूसाठी भरपूर मेहनत घेतलीय.राज्यातील अन्य तालुका पत्रकार संघानं ही इमारत मुद्दाम पाहावी आणि काही घेता आला तर आदर्शही घ्यावा.( एस.एम.)