“वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्‍स‘मध्ये भारत 133 वा

0
575

“माध्यम स्वातंत्र्याची मोदींना फारशी पर्वा नाही’ !”

स्वातंत्र्यासंदर्भातील नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या जागतिक स्तरावरील यादीमध्ये भारताचा क्रमांक 180 पैकी 133 वा असल्याचे निष्पन्न झाले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रकारांना असलेल्या धोक्‍यांची फारशी पर्वा नसल्याची टीकाही या अहवालामधून करण्यात आली आहे.

“रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स‘ या संघटनेने प्रसिद्ध केलेल्या या वर्षीच्या (2016) “वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्‍स‘मध्ये फिनलंड या देशाने सलग सहाव्या वर्षी अग्रस्थान मिळविले आहे. यानंतर नेदरलॅंड्‌स आणि नॉर्वे या देशांचा क्रमांक आहे. भारताच्या स्थानामध्ये तीन क्रमांकांनी सुधारणा झाली असून गेल्या वर्षी (2015) 136 वा क्रमांक असलेल्या भारताचा आता 133 वा क्रमांक आहे.

“”भारतात पत्रकार आणि ब्लॉगर यांच्यावर विविध धार्मिक गटांकडून हल्ले होत आहेत. त्याचबरोबर, तत्काळ संतापणाऱ्या या गटांकडून पत्रकारांकडून कडवट टीका करण्यात येत आहे. देशातील काश्‍मीरसारख्या सरकारकडून संवेदनशील समजल्या जाणाऱ्या भागांमधील वार्तांकन करणे पत्रकारांसाठी अवघड आहे. अशा स्वरुपाच्या धोके आणि समस्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फारशी पर्वा असल्याचे दिसत नाही. देशातील पत्रकारांचे संरक्षण करण्यासाठी कोणतीही व्यवस्था नाही. किंबहुना माध्यमांवर नियंत्रण मिळविण्याचाच प्रयत्न केला जात असून मोदी पत्रकारितेचे शिक्षण देणारे एक विद्यापीठ स्थापन करण्यासाठी प्रयत्नशील आहेत,‘‘ असा आरोप या अहवालामधून करण्यात आला आहे.

या यादीमध्ये अमेरिकेचे 44 वे; तर पाकिस्तानचे 147 वे स्थान आहे. रशियाला या यादीमध्ये 148 वा क्रमांक देण्यात आला आहे. एकंदरच जागतिक व प्रादेशिक स्तरावर माध्यम स्वातंत्र्याविषयी असलेला आदर झपाट्याने कमी झाल्याचे दिसून येत असल्याची प्रतिक्रिया या अहवालामधून व्यक्त करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here