वैभवसंपन्न, टोलेजंग वाडे ही आमच्या गावची खासियत होती.. या वाडयांमध्ये साक्षाल लक्ष्मी पाणी भरायची.. देशमुखांचा वाडा, पाटलांचा वाडा, शेठजींचा वाडा एकमेकांशी स्पर्धा करत असायचे.. वाडयासारखीच टोलेजंग माणसं होती.. कोणी शंभर एकर जमिनीचा धनी तर कोणी दोनशे.. पोळयाला बैलांची जेव्हा मिरवणूक निघायची तेव्हा रस्ते कमी पडायचे एवढा सारा बैल-बारदाना.. दूध दुभत्याला कमी नसायची.. गाव सुखी – संपन्न आणि पंचक्रोशीत दबदबा ठेऊन होते.. वाद व्हायचे पण ते गावच्या सीमेबाहेर कधी जायचे नाहीत.. मोठयांबददल आदब होता आणि ते सांगतील तो शब्द प्रमाण होता.. गरजा मोजक्याच म्हणजे अन्न, वस्त्र निवारयापुरतया मर्यादित असल्यानं वखवखलेपणा नव्हता.. मी आता जेव्हा गावात जातो तेव्हा गावचं हे वैभव आठवलयाशिवाय राहात नाही.. कधी काळी ज्या वाड्यातून गावगाडा हाकला जायचा, न्यायनिवाडा केला जायचा त्या वाड्यात उगवलेली काटेरी झाडं, भग्न झालेल्या भिंती आणि उद्ध्वस्त झालेले वाडे पाहून प्रचंड कालवाकालव होते.. ज्या वाडयांसमोर सकाळी सकाळी सडे पडायचे, झोकदार रांगोळयांनी ज्या वाडयांची अंगणं सजायची त्या वाड्यावर उगवलेली झाडं नक्कीच अस्वस्थ करून जातात..
आज गावं बदलंलं, कुसाबाहेर विस्तारलं, काही बंगले उभे राहिले.. एेहिक सुखाच्या वस्तू गावात आल्या.. पैसाही आला पण “तीी” सर आज नाही, ती शांतता, तो एकोपा, ते वैभव आज नाही.. प्रत्येकजण वखवखलयासारखा पैश्याच्या मागं धावतोय.. गावातील मान-मरातब संपला, कोणी कोणाला विचारत नाही.. थोडक्यात गाव गाव राहिलं नाही.गाव हरवलंं.. . शहर झालं.. कोणी म्हणेल बदल अपरिहार्य असतात.. बदल व्हावेत ही पण हे बदल होताना माणुसकी शिल्लक राहिली नाही हे अधिक अस्वस्थ करणारं आहे…माझं गाव हरवलं आहे..

LEAVE A REPLY