अध्यक्षपदी एस.एम.देशमुख  

0
1093

मुंबई दिनांक 3 (प्रतिनिधी ) 76 वर्षांची देदीप्यमान परंपरा लाभलेल्या आणि मराठी पत्रकारांची मातृसंस्था म्हणून ओळखल्या जाणार्‍या मराठी पत्रकार परिषदेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार एस.एम.देशमुख यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.पुढील दोन वर्षासाठी एस.एम.देशमुख अध्यक्ष असणार आहेत.

मराठी पत्रकार परिषदेच्या विस्तारित कार्यकारिणीची सभा काल मुंबईत झाली.बैठकीस परिषदेचे  किरण नाईक,कार्याध्यक्ष सिध्दार्थ शर्मा,सरचिटणीस यशवंत पवार,कोषाध्यक्ष मिलिंद अष्टीवकर यांच्यासह 32 जिल्हयातून आलेले जिल्हा पत्रकार संघांचे अध्यक्ष तसेच परिषद प्रतिनिधी उपस्थित होते .एस.एम.देशमुख याच्या नावाचा प्रस्ताव आल्यानंतर सर्व सदस्यांनी टाळ्यांच्या कडकडाटासह देशमुख यांच्या नावाला संमती दिली.परिषदेच्या घटनेनुसार कार्याध्यक्ष हाच दोन वर्षांनी अध्यक्ष होतो मात्र यापुर्वीच्या कार्याध्यक्षांनी राजीनामा दिलेला असल्याने गेली चार महिने अध्यक्षपद रिक्त होते.त्यांमुळे रिक्त जागेवर एस.एम.देशमुख यांची निवड कऱण्यात आली आहे.एस.एम.देशमुख 2000 ते 2002 या काळात परिषदेचे अध्यक्ष होते.ते दुसर्‍यांदा अध्यक्ष  होत  आहेत.

एस.एम.देशमुख गेली तीस वर्षे पत्रकारितेत सक्रीय असून तब्बल 23 वर्षे संपादक म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडलेली आहे.पत्रकारांवरील हल्ल्याना प्रतिबंध बसावा यासाठी स्थापन झालेल्या पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे ते निमंत्रक आहेत .  राज्य अधिस्वीकृती समितीचे ही ते सदस्य आहेत.विविध सामाजिक चळवळीत ते  सक्रीय असतात.पत्रकारांना पेन्शन मिळावी आणि पत्रकार हल्ला विरोधी कायदा करावा यामागणीसाठी गेली दहा वर्षे त्यांचा संघर्ष सुरू आहे.

महाराष्टातील 35 जिल्हा संघ आणि 342 तालुके मराठी पत्रकार परिषदेशी जोडले गेलेले असून साडेआठ हजार पत्रकार परिषदेचे सदस्य आहेत .3 डिसेंबर 1939 रोजी स्थापन झालेल्या या संघटनेचे काकासाहेब लिमये हे संस्थापक अध्यक्ष होते.न.र.फाटक,ज.सी.करंदीकर,दा.वि.गोखले ,आचार्य अत्रे,प्रभाकर पाध्ये,ह.रा.महाजनी,नारायण आठवले,अंनंतराव भालेराव,रंगा अण्णा वैद्य,बाळासाहेब भारदे,अनंतराव पाटील,ब्रिजलाल पाटील यांच्यासारख्या चाळीस दिग्गज पत्रकारांनी संस्थेचे अध्यक्षपद भूषविलेले आहे.संस्थेचे दर दोन वर्षांनी अधिवेशनं होतात.संस्थेची आतापर्यंत चाळीस अधिवेसऩं झाली आहेत.एस.एम.देशमुख हे परिषदेचे 41 वे अध्यक्ष आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here