मथळ्यांची दुनिया 

0
2203

खादी मोठी घटना जेव्हा घडते तेव्हा वर्तमानपत्रे त्या घटनेची कशी दखल घेतात हा सर्वांच्याच दृष्टीने उत्सुकतेचा विषय असतो.विशेषतः त्या दिवशीच्या अंकांची मांडणी कशी असेल ? ,मथळा काय असेल?  आणि अग्रलेखातून संबंधित दैनिकाच्या संपादकांने काय  भूमिका मांडलेली असेल? हे ‘चाळणे’  हा देखील अनेकांचा छंद असतो.मोठी घटना घडून गेल्यानंतर अंक सजवताना वृत्तसंपादकांचा आणि रात्र पाळीच्या उपसंपादक,मुख्य उपसंपादकाचा कस लागतो.विशेषतः मथळे देताना तारेवरची कसरत करावी लागते.पुर्वीच्या काळात केवळ वर्तमानपत्रेच बातमीचे मुख्य स्त्रोत असल्यानं मथळ्यात बातमीच दिलेली असायची.आज परिस्थिती बदललेली आहे.बातमी वाचकांना कळलेली असते.अशा स्थितीत मथळा हा त्या घटनेचे परिणाम दाखविणारा, सूचक असला पाहिजे अशी वाचकांची अपेक्षा असते.काही दैनिकं तसा प्रयत्न करतातही पण बहुतेक दैनिकं मथळा तटस्थ असावा या पारंपारिक विचारात अडकून पडलेले दिसतात. ‘मथळ्यात बातमी असावी मत नसावे’ अशी पुस्तकी भूमिका घेऊनच अनेक संपादक मथळे देतात.असे मथळे मग पडतात.बातमीची परिणामकारकता दाखवून देण्यात मथळे यशस्वी होत नाहीत.मथळ्यातून बातमी वाचण्यात आता कुणाला रस राहिलेला नाही.घटनेचे  परिणाम त्यातून दिसले पाहिजेत.हे परिणाम दाखविताना संबंधित दैनिकाचं धोरणंही त्यातून दिसलं पाहिजे अशी वाचकांचीही अपेक्षा असते .रेल्वे पटरीसारखी मथळे वाचायला कुणाला वेळ नाही आणि ते वाचकांना आवडतही नाही.मथळा कमी शब्दात पण अंगावर येणारा असावा अशी अपेक्षा असते,त्यात कल्पकता असली पाहिजे. या पार्श्‍वभूमीवर आजच्या  बहुतेक दैनिकांचे मथळे आपणच निकालांची बातमी पहिल्यांदा वाचकांना सांगत आहोत अशा अविर्भावात दिलेले  आहेत.त्यामुळे ते  बेचव झालेले  आहेत.

 आजच्या मराठी दैनिकांच्या तुलनेत इंग्रजी दैनिकांचे मथळे अधिक परिणामकारक ,सुटसुटीत आणि थेट परिणामांवर अचूक बोट ठेवणारे वाटतात.इंग्रजीत जी गोष्ट अगदी एका शब्दात सांगितली जाते त्यासाठी आपण दहा शब्द वापरत असतो हे आजही दिसून आलेलं आहे.जुन्या काळात हे चालायचं आज नाही .  आजच्या  मटा,सकाळ,लोकमतचे मथळे फारच मिळमिळीत वाटतात.काल दुपारी जगाला कळलेली बातमीच त्यांनी 24 तासानंतर लोकांना ‘तटस्थपणे’ सांगितली आहे.पुढारी,दीव्य मराठी, सामनाचे मथळे त्यातल्या त्यात सूचक वाटतात.

‘सामना’ने ‘केरळात डावे,ममता ,जयललिताचे सैराट’ असा मुख्य मथळा देताना ‘आसाम वगळता चार राज्यात भाजपला धक्का’ असा पोटमथळा देऊन भाजपवरील आपला रागही व्यक्त केला आहे.या मथळ्यातून सामनाचे धोरणही अधोरेखित झाले आहे.’लोकसत्ता’नं ‘दीदी ÷अम्माना साथ,डाव्या-उजव्यांचा विकास’ असा मथळा आपल्या बातमीला दिला आहे.’मटा’नं अगदीच साधा मथळा दिला आहे.’आसाममध्ये भाजप’ हे आजच्या महाराष्ट्र टाइम्सचं मुख्य शिर्षक आहे.’सकाळ’नं ‘आसामच्या मळ्यात कमळ’ असं शिर्षक देऊन बातमी वाचकांपर्यत पोहोचविली आहे.पुढारीनं मात्र ‘कॉग्रेस कोमात’ असं मुख्य शिर्षक देऊन निकालांनं राजकीय नकाशा बदलला असं उप शिर्षक  देत निकालाचे काय परिणाम झाले आहेत ते मांडलं आहे.’प्रहार’नं कॉग्रेसची वाजवताना ‘कॉग्रेसनं आसाम केरळ गमावले’ असल्याचे सांगत वस्तुस्थितीवर बोट ठेवलं आहे.दीव्य मराठीनं ‘भाजपला सर्वानंद’ असा मुख्य मथळा देत देशातील 84 टक्के जनता कॉग्रेस मुक्त झाल्याचे जनतेला कळविले आहे.’लोकमत’नं ‘आसामत कमळ,केरळात डावे’ अशी बातमी दिली आहे.

मराठी दैनिकांच्या तुलनेत इंग्रजी दैनिकांनी दिलेले मथळे अधिक प्रभावी आणि परिणामकारक वाटतात. ‘टाइम्स ऑफ इंडियानं’  कालच्या निकालांचं A CONG’LESS’ INDIA, ALMOST अशा शब्दात वर्णन केलं आहे. ‘इंडियन एक्स्प्रेसनं’  BJP SIZZLES,CONGRESS MELTS असा मथळा दिला आहे.तर हिंदुस्थान टाइम्सनं  THE FAB FOUR  असा मथळा देऊन चार राज्यात चार नेत्यांन कसा विजय मिळविला आहे हे दाखवून दिलं आहे.

सर्वच वर्तमानपत्रांनी आज कालच्या निकालावर अग्रलेखही लिहिले आहेत.सामनाची भूमिका जगजाहीर असली तरी सामनाकारांना काय वाटतं हे जाणून घ्यायला सारेच उत्सुक असतात.सामनाने आपल्या अग्रलेखात ‘असेच घडणार होते’ असे म्हणत आपली भूमिका मांडली आहे.महाराष्ट्र टाइम्सनं ‘कॉग्रेसचं पतन’ या शिर्षकाखाली कॉग्रेसची झालेली वाताहत अधोरेखित केली आहे.सकाळनं ‘भाजपला दिलासा ,कॉग्रेसची दाणादाण’ असं  लांबच्या लांब शिर्षक आपल्या अग्रलेखाला दिलं आहे.लोकमतंही तसंच हेडिंग देत ‘भाजपला दिलासा ,कॉग्रसेला धक्का’ बसल्याचं म्हटलं आहे.लोकसत्तानं ‘नायकांची निवडणूक’ असं अग्रलेखाला शिर्षक देत भाष्य केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here