मराठी पत्रकार परिषदेचा अध्यक्ष झालो तेव्हा 2000 मध्ये भोर तालुका पत्रकार संघानं माझ्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता.तेव्हा भोरला जाण्याचा योग आला होता.त्यानंतर काल पुन्हा पंधरा वर्षांनी एका सत्काराच्या निमित्तानंच भोरला जायचा योग आला. मधल्या काळात अलिबागला असताना अनेकदा भोर मार्गे महाडला जाणं -येणं झालेलं आहे.हा सारा परिसर मला नेहमीच आवडतो.निसर्गाचा वरदहस्त लाभलेला,विविध ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेला आणि परिसरातील विविध किल्ल्यांमुळे वैभवशाली बनलेला हा परिसर पर्यटक आणि अभ्यसकांना नेहमीच खुणावत असतो.सहयाद्रीच्या रांगा,त्यातून उगम पावणार्या निरेसह विविध नद्या,वेळवंडी नदीवरचं भाटघर धरण यामुळं दुर्गम असला तरी हवाहवासा वाटणारा हा इलाखा आहे.कधी काळी पंतसचिवांच्या अधिपत्याखाली असलेला भोर आज स्वतंत्र भारतातला एक भाग असला तरी अन्य दुर्गम भागाची ज्या पध्दतीनं उपेक्षा झाली त्याचचं दर्शन इकडंही दिसतं.स्थानिक आमदार संग्राम थोपटे सांगत होते,”रस्ते चांगले झालेत पण अजूनही काही वाड्या वस्त्यावर दिवे लागले नाहीत.दुर्गम भागात नेटवर्कही नसते”.ही सारी परिस्थिती कधी बदलेल माहिती नाही.मात्र भोरचा आमचा पत्रकार संघ मात्र बदलतो आहे,एकसंघपणे नव्या आव्हानांना सामोरं जात आहे.भाग दुर्गम असला म्हणून काय झालं? पत्रकारांना बसण्यासाठी जागा तर हवीय ना?.त्यासाठी मध्यवस्तीत एक छानसं पत्रकार भवन घेतलं गेलंय.ती जागा केवळ शोभेची नाही तर तेथे क्रियाशील पत्रकारांचा रोज राबता असतो.मात्र भोरचे तरूण पत्रकार त्यावर समाधानी नाहीत.त्यांना हवीय पत्रकार भवनाची स्वतंत्र इमारत.मुळशीत पत्रकारांनी एकत्र येत तालुका स्तरावरील महाराष्ट्रातील पहिली सुसज्ज अशी पत्रकार भवनाची इमारत उभारली आहे.तो आदर्श डोळ्यासमोर ठेऊन भोरच्या पत्रकारांनी त्यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे.तालुका पत्रकार भवनासाठी सरकार जागा देत नाही.त्यामुळं जागा एखादया दानशुर व्यक्तीकडूनच मिळवावी लागते.मुळशी असेल,आमची वडवणी असेल किंवा अन्य तालुक्यात याच मार्गाने जागा उपलब्ध झाल्या आहेत.भोरला आमदार संग्राम थोपटे यांनी पत्रकार भवनासाठी जागा देण्याचा वादा केला आहे.भोरचे आमचे पत्रकार मित्र सांगत होते,दादा शब्द पाळणारे आमदार असल्यानं चिंता नाही.मी काल माझ्या भाषणात जागा त्वरित पत्रकार संघाकडं हस्तांतरीत करण्याची आणि येत्या दिवाळीच्या पाडव्याला पत्रकार भवनाची कुदळ मारण्याची विनंती आमदार थोपटे यांनी केली आहे.त्यांनीही ते मान्य केल्याने आता भोरमध्ये पत्रकार भवन उभे राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.मुळशीच्या पत्रकार भवनासाठी आमदार थोपटे यांनी आर्थिक मदतही केली आहे.आता त्यांच्या गावातच पत्रकार भवन उभं राहतंय म्हटल्यावर ते हात आखडता घेणार नाहीत हे नक्की.मला वाटतं भोरमधील पत्रकारांच्या एकजुटीचं हे यश आहे.तरूण पत्रकारांची फळी आणि त्यांना ज्येष्ठाचं होणारं मार्गदर्शन असा चांगला मिलाफ भोरमध्ये दिसला.ज्येष्टांबद्दलच्या आदराची भावनाही तरूण पत्रकारांमध्ये दिसली.ज्या उमेदीनं ही सारी मंडळी काम करताना दिसते आहे ते बघता पत्रकार भवन तर उभं राहिलंच पण पत्रकारांचे अन्य प्रश्न देखील परस्पर सहकार्यातून सुटणार आहेत याबद्दल मला शका वाटत नाही.या सर्व तरूण पत्रकारांचा मला अभिमान आहे..भोर- वेल्हे पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि त्यांच्या सर्व टिमचं मनापासून अभिनंदन.
संगा्रम दादा थोपटे यांच्याशी गप्पा मारताना पत्रकार पेन्शनचा प्रलंबित विषय आणि कायद्याची गरज याची उजळणी पुन्हा केली.आगामी अधिवेशनात या दोन्ही विषयावर आपण आवाज उठवू असा शब्द त्यांनी दिलाय.पत्रकारांच्या या मागण्यांना आमचा पाठिंबा आहे अशी पत्रं आता सर्व आमदारांकडून घेण्याची एक मोहिम सुरू करीत आहोत असंही मी आमदार थोपटे यांना सांगितलं.त्यातून आमच्या मागण्याचे समर्थक आणि विरोधक समोर येतीलअसं वाटतंय.त्यांनीही चांगला प्रयत्न आहे असं सांगत स्वागत केलं.
पुणे जिल्हा पत्रकार संघाच्या पदाधिकार्यांचा हवेली तालुक्यात थेऊर इथंही सत्कार करणयात आला.त्यावेळी पत्रकारांशी बोलताना सारेच पत्रकार तळमळीनं आपल्या व्यथा दुःख मांडत होते.व्यवस्थापन ओळख पत्र देत नसल्यापासून “अधिस्वीकृतीचे नियम कार्ड देण्यासाठी असावेत नाकारण्यासाठी नसावेत” असाही सूर व्यक्त केला.पत्रकार पेन्शनसाठी आवाज अधिक जोरात व्यक्त झाला पाहिजे अशी सूचना कऱण्याबरोबरच सरकारनं पत्रकार विमा योजना राबविली पाहिजे अशी सूचनाही काही पत्रकार मित्रांनी केली.या सार्या सूचना एवढ्या क्षुल्लक आहेत की,सरकारनं ठरविलं तर काही क्षणात हे सारे विषय सुटतील .पण त्यासाठी ज्या राजकीय इच्छाशक्तीची गरज असते त्याचा अभाव दिसतो आहे.अन्य अनेक राज्यात पत्रकारांच्या कल्याणासाठी विविध योजना राबविल्या जातात.त्याचा महाराष्ट्रात अभाव दिसतो.शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधीने किती पत्रकारांचे कल्याण केले हा विषय माहितीच्या अधिकारात मागण्यासारखा आहे.अर्थात सरकारची वाट बघत बसायला आता पत्रकारांकडे वेळ नाही.पत्रकार संघटनांनीच एकत्र येत स्व कल्याणासाठी विविध प्रकल्प राबवावे लागतील.त्यानुसार पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष बापुसाहेब गोरे यांनी येत्या एक दीड महिन्यात जिल्हयातील पत्रकारांचा विमा उतरविण्यात येणार असल्याची माहिती दिली.त्याचं सर्वानी स्वागत केलं. “हवेली,भोर,वेल्हे येथील पत्रकारांनी पत्रकारांच्या हक्कासाठी आपण सुरू केलेल्या लढ्यात आम्ही आपल्याबरोबर आहोत” मला शंभर हत्तीचं बळ मिळालं.पत्रकारांची भक्कम एकजूट करण्यासाठी दिवाळीनंतर राज्याच्या वेगवेगळ्या भागात दौरा करणार आहे.नागपूर अधिवेशनात पुन्हा एकदा हल्ला बोल करायचा आहे.थोडक्यात काल दिवसभर धावपळ झाली तरी दिवस सार्थकी लागला.तीन-चार तालुक्यातील पत्रकारांशी निगडीत अनेक विषय मार्गी लागले. ( एस.एम.)