कोकणातील पत्रकारितेची मोठी हानी

कोकणचा चालता बोलता इन्सायक्लोपिडिया अशी ओळख असणारे पत्रकार भालचंद्र दिवाडकर यांच्या निधनाची बातमी त्यांच्या लेखणीवर प्रेम करणार्‍या माझ्यासारख्यांसाठी धक्कादायक अशीच आहे.कोकणावर मनस्वी प्रेम करणारा,कोकणची संस्कृती,कोकणचे पर्यटन,कोकणचे राजकारण,कोकणचे समाजकारण याचा दिवाडकरांना सखोल अभ्यास असायचा.कोकणातील प्रश्‍न ते एवढया पोटतिडकीने मांडायचे की,लोक पेटून उठायचे.दिवाडकर केवळ प्रश्‍नच मांडायचे नाहीत तर त्यावरच्या उपाययोजनाही सांगायचे.दैनिक सागरचे बहुतेक अग्रलेख दिवाडकरच लिहायचे आणि केवळ अग्रलेखाच्या जिवावर सागर विकला जायचा.मी अलिबागला असताना सागरचा अग्रलेख न विसरता वाचायचो.कारण ठाणे-पालघर पासून तळ कोकणातील सिंधुदुर्ग पर्यंतच्या विविध विषयांची मांडणी सागरच्या अग्रलेखात असायची. त्यामुळं आम्हालाही विषय समजून घ्यायला मदत व्हायची.अनेकदा रत्नागिरी किंवा सिधुंदुर्गचे राजकारण किंवा अन्य विषय माहिती करून घ्यायचे असत तेव्हा दिवाडकरांना फोन करून ती माहिती त्याच्याकडून घ्यायचो.विविध भाषांवर असलेले त्यांचे प्रभूत्व,आणि विविध विषयांचे ज्ञान पाहून अनेकदा असं वाटायचे की,चिपळूणमध्ये राहून हा विद्ववान माणूस सडतोय..खरंच दिवाडकर मुंबई-पुण्यात असते तर त्याना नक्कीच मोठा नावलौकिक प्राप्त झाला असता.काही दिवासांंपुर्वी त्यांच्या पत्नी गेल्या..त्यानंतर ते एकाकी झाले होते.अगोदरच ते अबोल होते.आपलं काम बरं आणि आपण बरे असा त्यांचा स्वभाव होता.त्यातच पत्नीच्या निधनाचे मोठा आघात त्यांच्यावर झाला होता.त्या आघातातून ते अखेरपर्यंत सावरले नाहीत.आज त्यांच्या निधनाची बातमी आली.ती सर्वांनाच शोकविव्हळ करणारी ठरली.भालचंद्र दिवाडकर यांच्या निधनाने केवळ दैनिक सागरचेच नव्हे तर संपूर्ण कोकणातील पत्रकारितेचे मोठे नुकसान झाले आहे.दिवाडकर यांना विनम्र श्रध्दांजली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here