साधारणतः दोन वर्षांपूर्वीची गोष्ट असेल.परभणी येथून पत्रकार धनाजी चव्हाण यांचा फोन आला.’परभणीचा एक पत्रकार शिवाजी क्षीरसागर याला ब्लड कॅन्सर झालाय,तो मुंबईत टाटा समोर गेली तीन दिवस फुटपाथवर आहे..कोणी त्याची दखल घेत नाही..त्याला मदतीची गरज आहे काही करता आला तर बघा’ असं त्यांनी सांगितलं.दुसर्‍याच  दिवशी मुद्दाम  मी पुण्याहून मुंबईला गेलो.किरण नाईक आणि मी थेट टाटा गाठले.शिवाजी क्षीरसागरची ना ओळख-ना पाळख.त्याला कधी पाहिलेलंही नव्हतं.मात्र धनाजी यांनी फोन नंबर दिला होता.त्यावर फोन केला.शिवाजी समोरच होता.तो आणि वृध्द आई-वडिल हॉस्पिटल बाहेरच भेटले.आम्ही आमची ओळख सांगितल्यानंतर तो माझ्या आणि किरण नाईक यांच्या गळ्यातच पडला.30-35 वर्षांचा हा तरूण पत्रकार कॅन्सर झालाय या जाणिवेतूनच अंतर्बाहय खचून गेला होता.ते सारं त्याच्या चेहर्‍यावर दिसत होते.शिवाजीचं सात्वन कसं करावं ते समजत नव्हतं.आजही मराठवाडयातील अनेकांना मुंबईला जायचं म्हटलं तरी पोटात गोळा येतो.शिवाजी पहिल्यांदाच मुंबईला आला होता.एवढ्यामोठ्या महाकाय शहरात शिवाजीच्या ओळखीचं कोणी असण्याची शक्यताच नव्हती.त्यामुळं आम्ही जेव्हा त्याला भेटलो तेव्हा तेव्हा तो ओक्साबोक्सी रडत होता.पैसे नव्हते,राहण्याची सोय नव्हती आणि टाटात कोणी दखलही घेत नव्हतं ..त्यामुळे शिवाजी खचून गेला होता.  मात्र ‘तू काळजी करू नकोस’ असं सात्वन  करून आम्ही त्याचा निरोप घेतला पण आम्हालाही कळत नव्हतं की,मदत कशी करावी ते..तेथून थेट मुख्यमंत्री आरोग्य कक्षाचे प्रमुख ओमप्रकाश शेटे यांच्याकडं गेलोत ..त्यांना सारी माहिती दिली.काहीही करून मदत मिळावी अशी अपेक्षा आणि विनंती त्यांना केली.ते ही संवेदनशील अधिकारी असल्यानं त्यांनी तातडीनं कागदपत्रांची पूर्तता करून जवळपास दोन लाख रूपयांची मदत तर दिलीच शिवाय टाटामध्ये फोन करून शिवाजीवर व्यवस्थित  उपचार होतील याची काळजी घेतली.त्यानंतर धनाजी आणि त्यांच्या काही मित्रांनी परभणीच्या स्थानिक खासदारांचे पत्र घेऊन पंतप्रधान मदत निधीतून मदत मिळविण्यासाठी प्रयत्न केला.आम्ही मुंबईतून पाठपुरावा केला.पंतप्रधान मदत निधीतून शिवाजीला तीन लाख रूपये मिळाले.मंगेश चिवटे,मृणालीनी नानिवडेकर आणि मुख्यमंत्री सहाय्यता कक्षातील नितीन जाधव यांच्या माध्यमातून नाना पालकर स्मृती मंदिरात निवास व्यवस्था करता  आली.

..या मदतीमुळं आणि त्याच्यावर व्यवस्थित उपचार झाल्यामुळं शिवाजी क्षीरसागरला पुनर्जन्म मिळाला.त्याने कॅन्सर सारख्या दुर्धर आजारांवर विजय मिळविला . आज शिवाजी क्षीरसागर आपल्या कुटुंबियांसमवेत आपला वाढदिवस साजरा करीत असल्याचा फोटो फेसबुकवर पाहिल्यानंतर हा सारा घटनाक्रम आठवला आणि परिषदेच्या माध्यमातून शिवाजीला मदत करता आली याचा आनंदही मिळाला.शिवाजी आज पुन्हा नव्या जोमानं,नव्या उमेदीनं काम करतो आहे..याचं नक्कीच मोठं समाधान आहे.शिवाजीसाठी आम्ही ज्यांच्या ज्यांच्याकडं गेलो त्यांनी मोठ्या मनानं मदत केली.अशा सर्वांचे मनापासून आभार .

शिवाजी क्षीरसागर यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.. शिवाजी,तुम जिओ हजारो साल

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here