दोनशेंवर पत्रकारांशी साधला सुसंवाद 

चार-पाच दिवस मराठवाडयात होतो.या प्रवासात बीड जिल्हयातील दोनशेंवर पत्रकारांना भेटलो.कडा,आष्टी,पाटोदा,बीड,केज,धारूर,अंबाजोगाई,वडवणी आदि तालुक्यातील पत्रकारांशी संवाद साधला.मराठवाडयातील या दुष्काळी जिल्हयातील पत्रकारांचे वास्तव भीषण आहे.अनेक प्रश्‍नांना सामोरं जात हे पत्रकार आपले कर्तव्य निष्ठेनं पार पाडताना दिसले.आर्थिक विवंचना,आरोग्याचे प्रश्‍न,दैनिकांकडून मिळणारे तुटपुंजे मानधन,गुंडांची दहशत अशा विविध प्रश्‍नांनी त्रस्त या पत्रकार मित्रांच्या आपल्या व्यवसायांबद्दलच्या निष्ठा मात्र अविचल आहेत.लेखणीच्या माध्यमातून ही सारी मंडळी लोकांवरील अन्यायाला,लोकांच्या प्रश्‍नांना वाचा फोडण्याचं काम तर करीत आहेच त्याचबरोबर विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून थेट वंचित,उपेक्षित आणि दुर्लक्षित भागाच्या विकासात आपलं मोलाचं योगदान देत आहे.आष्टीत गेलो तर तेथील मित्रांनी गावासाठी त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याचा अहवालच माझ्यासमोर ठेवला.तेथे युवा आणि ज्येष्ठ असे दोन भिन्न पत्रकार संघ असले तरी दोन्ही संघांचं आष्टीच्या विकासात मोठं योगदान असल्याचं उपलब्ध कागदपत्रांवरून दिसून आलं.पाटोदयातही हीच स्थिती.धारूरमध्ये तर पत्रकारांनी मध्यंतरी तळ्यातील गाळ उपसण्यापासून शिक्षण संस्था चालवून गावाला ज्ञानामृत देण्यापर्यंत विविध उपक्रमांच्या माध्मयातून जनमानसात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.अंबाजोगाई हा तुलनेत मोठा तालुका.अंबाजोगाई जिल्हा होणार असल्याची चर्चा आहे.त्यामुळं पत्रकारांची संख्याही मोठी आहे.प्रवासात अनेकांच्या भेटी-गोठी घेत गेल्यानं अंबाजोगाईच्या पत्रकारांना दीड-दोन तास माझी प्रतिक्षा करावी लागली.तेथेही पत्रकारांमध्ये विविध तट-गट आहेत पण ही सारी मंडळी पत्रकारिता एक व्रत समजून कार्य करीत असल्याचे त्यांच्याशी चर्चा करताना दिसून आलं.चळवळीबद्दल कमालीची आस्था असलेल्या अंबाजोगाईकर पत्रकारांचं देखील अंबाजोगाईच्या विकासात मोठं योगदान आहे.पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीची सुरूवात अंबाजोगाई येथील दत्ता अंबेकर यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतरच झाली.ते अंबेकरही भेटले.जीवघेणा हल्ला झाल्यानंतरही ते पहिल्याच तडफेने,धैर्यानं पत्रकारिता करीत आहेत.आपल्यावर हल्ला झाला तेव्हा सारा महाराष्ट्र माझ्या पाठिशी उभा राहिला त्यामुळंच मी खंबीरपणे पुन्हा उभा राहिलो हे त्यांनी आवर्जुन स्पष्ट केलं.पत्रकारांवर हल्ले करून,धमक्या देऊन अथवा खोटे गुन्हे दाखल करून माध्यमांचा आवाज बंद करणार्‍यांनी हे लक्षात घ्यावं की,तुमच्या अशा कोणत्याही दबावाला पत्रकार बळी पडत नाहीत.हल्लेे झाल्यानंतरही पत्रकार पुन्हा नव्या जोमानं उभे राहतात आपलं काम निष्ठेनं करीत राहतात,हे अंबेकर यांच्या रूपानं दिसून आलं.अंबाजोगाईत पत्रकारांशी दोन तास मस्त गप्पा मारल्या.जुने पत्रकार माझ्या परिचयाचेच आहेत.काही तरूण पत्रकारांशी नव्यानं ओळख झाली त्याचा आनंद नक्कीच झाला.केजची मंडळी भेटली.त्यांच्याकडं पुन्हा एका कार्यक्रमाच्या निमित्तानं जायचं आहे.

माझ्या या प्रवासानं सारा बीड जिल्हा ढवळून निघाला.बीड जिल्हा पत्रकार संघ अधिक सक्रीय व्हावा अशी अपेक्षा सर्वच ठिकाणी व्यक्त झाल्या.त्यादृष्टीने देखील मराठी पत्रकार परिषदेने काही ठोस पाऊले उचलायला सुरूवात केली आहे.जिल्हयातील पत्रकार एका झेड्याखाली एकत्र आले पाहिजेत अशीच सर्वांची इच्छा दिसली.आपण एक असलो तर हल्ले होणार नाहीत आणि कोणी पत्रकार जर अडचणीत आला तर त्यालाही मदत मिळू शकेल ही भावना आता सर्वच ठिकाणी व्यक्त होऊ लागली आहे.ही भावना वृध्दींगत होणं हे आपल्या चळवळीचं यश आहे असं मला वाटतं.सर्वच ठिकाणी आम्ही आपल्यासोबत आहोत असं आश्‍वासन मला दिलं गेलं.नांदेडच्या 25 डिसेंबरच्या मेळाव्यासही मोठ्या संख्येनं आम्ही येऊ असंही सर्वच तालुक्यातील पत्रकारांनी आवर्जुन सांगितलं.ग्रामीण भागातील पत्रकारांबद्दल अनेकजण नाकं मुरडत असतात मात्र ग्रामीण पत्रकारचं खर्‍या अर्थानं माध्यमांचा कणा आहेत हे माझं मत आहे.ही सारी मंडळी घरा-दाराचा,कुटुंबाचा विचार न करता झोकून देऊन पत्रकारिता करीत असते हे मी अनुभवले आहे.तथाकथित बडया पत्रकारांना ‘सामाजिक बांधिलकीशी पत्रकारितेचा काही संबंध नाही,नसावा  असं वाटत असतं पण ग्रामीण पत्रकारितेचा पायाच मुळी सामाजिक बांधिलकी आहे आणि ही मंडळी आजही त्याच ध्येयानं काम करताना दिसतात.निश्‍चितपणे त्याचं कौतूक केलं पाहिजे.

बीड जिल्हयातील तमाम पत्रकार आता अधिक जोमाने चळवळीशी जोडले जात आहेत त्याचं मनःपूर्वक स्वागत .खरं तर मीच कमी पडलो.बीड माझा जिल्हा असताना बीडकडं थोडं दुर्लक्षच झालं.बीड जिल्हयातील तालुक्यात असलेल्या पत्रकारांशी माझा संपर्क राहिला नाही.भविष्यात ही चूक होणार नाही.मी व्यक्तीशः प्रत्येकांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करील.परिषदेचे विभागीय सचिव अनिल महाजन तसेच अधिस्वीकृती समितीचे सदस्य अनिल वाघमारे ही तरूण जोडी जिल्हयात नव्यानं बांधणी करीत आहे.त्यामुळं पुढील काळात जिल्हयातील पत्रकारांचं एक भक्कम संघटन उभं राहिलं याबद्दल मला शंका नाही.( एस.एम.) 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here