सर्व प्रकारच्या प्रसारमाध्यमांमध्ये योग्य मराठी शब्दांचा उपयोग व्हावा यासाठी प्रथमच इंग्रजी-हिंदी-मराठी असा स्वरूपाचा त्रिभाषिक शब्दकोष तयार होत आहे.
महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ व केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या तांत्रिक शब्दावली आयोगाने हा प्रकल्प हाती घेतला आहे. सध्या मुद्रित, ईलेक्ट्रॉनिक्स, इंटरनेट, रेडिओ या माध्यमांसाठी अधिकृ त असा शब्दकोष नाही. अनेक शब्दांना योग्य पर्यायी शब्द देण्यात गोंधळ झाल्याने वाचकही गोंधळतो. कित्येकदा या शब्दांमुळे आकलन होत नसल्याने अशा त्रिभाषिक शब्दकोषाची गरज होती.
गांधी विद्यापीठाच्या माध्यम अध्ययन केंद्राचे निदेशक प्रा. अनिलकुमार राय याबाबत म्हणाले की, पत्रकारांसाठी मराठीत खासगी पातळीवर शब्दकोष असू शकेल. केंद्रीय स्तरावर अशा कोषाची गरज होती. मराठी नव्या शब्दकोषामागे हिंदी पत्रकारिता शब्दकोषाची पाश्र्वभूमी आहे. पत्रकारिता व मुद्रण क्षेत्रासाठी तीस वर्षांपूर्वी असे काम झाले होते. खास पत्रकारांसाठी असणाऱ्या हिंदी शब्दकोषातून ५०० जुने शब्द वगळून २ हजार नवे शब्द आले आहेत. आता अप्रासंगिक ठरलेले व पूर्वी महत्वपूर्ण ठरलेल्या काही शब्दांना नवे प्रतिशब्द दिले आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर जर्नेलिझमच्या धर्तीवर चनैलिझम या शब्दाचा वापर होतो. त्याचा चिंतनपर पत्रकारिता, असा अर्थ शब्दकोषात आहे. चोवीस बाय सात या शब्दाला हरपल, असा शब्द दिला आहे. ब्रेकिंग न्यूजला ताजा खबर, न्यूजरिडरला समाचार वाचक असा शब्द दिला आहे. इंटरनेटला संजाल संबोधण्याचे ठरले, पण इंटरनेट हाच शब्द प्रचलित असल्याने शब्दकोषात त्याला तेच स्थान मिळाले. या शब्दकोषाची जबाबदारी केंद्रीय शब्दावली आयोगाचे चक्रप्रम विनोदिनी यांच्याकडे आहे.