
*मुख्यमंत्र्यांसह लाभणार दिग्गजांची हजेरी; भरगच्च परिसंवाद; एस.एम.देशमुख यांची माहिती*
शेगाव : स्वातंत्र्यपुर्व काळात १९३७ला स्थापन मराठी पत्रकार परिषदेचे ४१वे द्वैवार्षिक अधिवेशनाचा बहुमान हा संत नगरी शेगावला मिळाला असून, येत्या १९ व २० ऑगस्ट रोजी हे अधिवेशन श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात होवू घातले असून, यासाठी देशभरातील अडीच हजारावर मराठी माध्यमांचे पत्रकार उपस्थित राहणार असल्याचा अंदाज.. परिषदेचे अध्यक्ष एस.एम.देशमुख यांनी व्यक्त करुन या अधिवेशनाचे उदघाटन मुख्यमंत्र्यांच्याहस्ते होईल तर या दोन दिवशीय अधिवेशनासाठी पत्रकारीता क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांची उपस्थिती व भरगच्च परिसंवाद आयोजीत करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
या अधिवेशनाच्या पुर्वतयारीसाठी मराठी पत्रकार परिषद व बुलडाणा जिल्हा पत्रकार संघ पदाधिकाऱ्याची पहिली बैठक मंगळवार ११ जुलै रोजी शेगाव येथे विश्रामभवनात पार पडली. त्यावेळी एस.एम.देशमुख बोलत होते. यावेळी परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, कार्याध्यक्ष सिध्दार्थ शर्मा, कोषाध्यक्ष मिलींद अष्टीवकर, *अकोला जिल्हाध्यक्ष शौकत अली मिर साहब,* औंरगाबाद विभागीय सचिव अनिल महाजन ,वाशिमचे माधवराव अंभोरे, समाधान सावळे प्रामुख्याने हजर होते.
प्रथम बुलडाणा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र काळे यांनी हे ४१वे अधिवेशन संतनगरी शेगावला दिल्या बद्दल परिषदेचे आभार मानून सर्वांच्या सहकार्याने हे अधिवेशन यशस्वी करण्याचा प्रयत्न करु, असे सांगितले. समाधान सावळे यांनी या अधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी तन-मन-धनाने सहकार्याचे आश्वासन दिले. परिषदेचे प्रदेश प्रतिनिधी अरुण जैन व माधवराव अंभोरे यांनीही अधिवेशनासंदर्भात भूमिका स्पष्ट केली.
त्यानंतर एस.एम.देशमुख म्हणाले की, मराठी पत्रकार परिषद ही पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढणारी मातृसंस्था असून होणारे अधिवेशन हा केवळ सोहळा राहणार नसून तो एक विचारमंथनाचा उपक्रम ठरेल.. या अधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस करतील तर लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्राताई महाजन, ना.नितीन गडकरी व राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा.शरदचंद्र पवार यांनाही बोलावण्याचा प्रयत्न राहील. दिल्ली व मुंबई येथून अनेक मान्यवर संपादकही या अधिवेशनात विचार मंथन करण्यासाठी हजर राहणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी सिध्दार्थ शर्मा यांनीही त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
आरंभी जिल्हा पत्रकार संघाचे कोषाध्यक्ष संजय सोनुने यांनी सर्वांचे स्वागत केले. यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष सुधीर चेके पाटील, सरचिटणीस अजय बिलारी, चंद्रकांत बर्दे, मुशीरखान कोटकर, श्याम तायडे, प्रसिध्दीप्रमुख अमर राऊत, डॉ.विजय जट्टे, सिध्देश्वर पवार, डॉ.मापारी आदींसह फईम देशमुख, देविदास कळसकर, राजेश चौधरी, अमर बोरसे, धनराज ससाने, संतोष पिंगळे, गोिंवद अंबुसकर, सुर्यकांत भारतीय, श्रीकांत बागळेजा आदी उपस्थित होते.