पत्रकार राम खटकेला मिळणार मदत

0
817

 भेट ..लोकाचे अश्रू पुसणार्‍या एका अधिकार्‍याची…

 सोलापूर येथील एका रूग्णालयात मृत्यूशी झुंज देत असलेला उमदा पत्रकार राम खटके यांला  मदत मिळवून देता येते का ते पाहण्यासाठी काल मी , किरण नाईक आणि तरूण अणि धडपडया पत्रकार मंगेश चिवटे मंत्रालयात गेलो.गरजू रूग्णांना मदत देण्यासाठी सरकारनं मुख्यमंत्री आरोग्य कक्ष वगैरे  स्थापन केलाय हे मला तरी ठाऊक नव्हतं.मंगेशनं दिलेल्या माहितीन्वये आम्ही तिघं त्या कक्षात गेलो.तेथील प्रमुख ओमप्रकाश शेटे यांच्याशी चर्चा करताना त्यांनी जी माहिती दिली ती ऐकून या कक्षाबद्दल आपल्याला यापुर्वीच कसं समजलं नाही याची खंत वाटली.मुख्यमंत्री आरोग्य कक्षाच्यावतीने गरजू रूग्णांना तातडीने दोन लाख रूपयांपर्यत मदत दिली जाते.निधी मिळविण्याची पध्दतही अगदीच सोपी आहे.एक अर्ज भरायचा.सोबत तहसिलदारांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र,आधार कार्ड,राशन कार्ड,संबंधित रूग्णालायाचे खर्चाचे अंदाजपत्रक असले की, बस्स. फार त्रास न होता दोन लाखांची मदत मिळते.चेक थेट रूग्णालयाच्या नावानेच निघतो.ही योजना गेली सात महिने सुरू असून शेकडो लोकांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे.

मुऴात ओमप्रकाश शेटे हे सामाजिक बांधिलकी जपणारे अधिकारी आहेत.ग्रामीण भागाची पार्श्‍वभूमी असल्यानं लोकांची दुःख,अडचणींशी ते चांगले अवगत आहेत.स्वतः दुष्काळी भागातून आलेले असल्यानं गरिबीचे चटके कश्याला म्हणतात याची चागली कल्पना त्यांना आहे.मुळातच माणूस संवेदनशील असल्यानं सामांन्यांची काम लवकरात लवकर झाली पाहिजे असा त्यांचा आग्रह असतो.त्यातूनच त्यांनी अनकांचेे अश्रू पुसण्याचे  काम केले आहे..ते आणि त्यांचा विभाग रूग्ंणांच्या मदतीला वेळेत धाऊन गेल्यांनं  अनेकांना जीवदान मिळाले आहे.ज्यांना मदत मिळाली त्याचे कृतज्ञतेने ओतप्रोत भरलेली अनेक पत्रं ही शेटे यांच्या कार्याची पावती आहे.बरे झाल्यानंतर रूगणांनी शेटेंना लिहिलेली पत्रं वाचली की आपल्याही डोळ्याच्या कडा आपोआप पाणवतात.”सरकारी काम आणि सहा महिने थांब” असा अनुभव असतो मात्र शेटे सांगतात “इथं सहा महिने काय सहा दिवस थांबायलाही कुणाला वेळ नसतो.रूग्ण बेडवर असतो आणि त्याला तातडीनं मदत मिळणं अत्यंत गरजेचं असतं.अशा स्थितीत त्याचा अर्ज लालफितीत अडकून भागणारं नसतं.त्यामुळं अर्ज प्राप्त झाल्यानंतर सारे सोपस्कार पूर्ण करून आम्ही दोन-तीन दिवसात विषय मार्गी लावतो”.त्यामुळंच असेल स्वतः मुख्यमंत्री या कक्षाच्या कामावर खुष आहेत. . मी विचारले,”या योजनेत पत्रकारांना कसे सामावून घेता येईल.त्यावर शेटे सांगत होते.”योजना सर्वांसाठीच असल्याने या योजनेचा लाभ पत्रकारांनाही घेता येऊ शकतो.तुम्ही तुमच्या संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांना याची माहिती द्या,ज्या पत्रकारांना गरज आहे अशा पत्रकारांनाही दोन लाखांपर्यत मदत मिळू शकेल”.ते ज्या आपुलकीनं हे सारं सांगत होते ते एकून खरोखरच मनस्वी आनंद झाला.एक अधिकारी एखादा विषय एवढ्या तळमळीनं बोलू शकतो,मदतीचा हात पुढं करू शकतो,गरजूंना मदत करण्याची भाषा बोलतो आणि थेट लाभार्थींना फोन करून मदत देण्याची तयारी दर्शवतो हा अनुभव माझ्यासाठी तरी नवा होता.ओमप्रकाश शेटे हे एवढं करूनच थांबलेत असं नाही तर त्यांनी  गरीब रूग्णांना वार्‍यावर सोडणार्‍या मुंबईतील पंचतारांकीत रूग्णलयांना वठणीवर आणण्याचंही काम केलं आहे.सामाजिक उत्तरादीयीत्व मानणारा,सामाजिक बांधिलकीच्या भावनेनं मंत्रालायत बसून सामांन्यांचे अश्रू पुसणारा अधिकारी म्हणून मला नक्कीच ओमप्रकाश शेटेंबद्दल आपलेपणा वाटला.

अर्थात आम्ही ज्या कामासाठी गेलो होतो त्या राम खटके चा विषय कधी निघतो याची मी वाट पाहात होतो.मात्र  मंगेशनं रामचा विषय अगोदरच त्यांच्या कानी घातला होता.त्यानंतर राम खटके ज्या रूग्णालयात उपचार घेतोय त्या रूग्णालायाशी आणि रामच्या भावाशीही स्वतः शेटे बोलले होते.कागदपत्रे घेऊन लगेच या असा निरोपही त्यांनी दिलेला होता.आम्हीही रामच्या नातेवाईकांशी बोललोत.आता रामचे बंधू मंगळवारी उत्पन्नाचं सर्टिफिकेट आणि अन्य कागदपत्रे घेऊन येत आहेत.शेटे म्हणाले,”काळजी करू नका,कागदपत्रे मिळाली की ,लगेच निधीचा प्रश्‍न मार्गी लावतो”.या सार्‍या आपलेपणानं मी भारावून गेलो होतो.मंगेश चिवटे सांगत होते,”आपण पत्रकार आहोत म्हणून नव्हे तर सामांन्य माणसालाही येथे हीच आपलेपणाची,सन्मानाची वागणूक मिळते.”राम खटकेला आता मदत मिळण्याबद्दल मी निश्‍चिंत आहे.जनतेच्या प्रश्‍नांबद्दल प्रामाणिक तळमळ असलेल्या अधिकार्‍याने रामची जबाबदारी घेतली आहे..काम नक्की होणार आहे.त्यामुळे आता चिंता नाही.

जाता जाता- सर्व पत्रकार मित्रांना विनंतीय की,ज्यांना मदतीची गरज असेल त्यांनी मराठी पत्रकार परिषदेशी किंवा थेट शेटे यांच्याशी संपर्क साधावा.त्यांच्या कार्यालयाचा नंबर आहे,022- 22026948 ( एस एंम ) 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here