पत्रकार गाडेकर याप्रकरणी चौकशी करणार..
▪️पत्रकारांबाबतीत असे प्रकार घडणार नाही याची काळजी घेऊ
▪️ जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांची ग्वाही
बुलढाणा, दि. 15 :
चिखली येथे पत्रकार समाधान गाडेकर यांच्या संदर्भात झालेल्या प्रकाराबाबत सखोल चौकशी करून यापुढे असे प्रकार घडणार नाहीत, असे आश्वासन जिल्हा पोलिस अधीक्षकांनी पत्रकारांच्या शिष्टमंडळाला दिले.
एलसीबी. च्या कारवाईदरम्यान वृत्तसंकलनासाठी चिखली येथील पत्रकार समाधान गाडेकर घटनास्थळी दाखल झाले होते, त्यांनी मोबाईल मध्ये फोटो काढून प्रकरणाची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी स्थानिक गुन्हे शाखेच्या एका पोलिस अधिकाऱ्याने त्यांना मारहाण करून मोबाईल हिसकावून घेतला. या प्रकरणानंतर जिल्ह्यातील पत्रकारांकडून निषेध व्यक्त होऊ लागलेत. पत्रकारांच्या भावना जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे पोहचविण्यासाठी मराठी पत्रकार परिषदेचे उपाध्यक्ष राजेंद्र काळे, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष अरुण जैन, कार्याध्यक्ष चंद्रकांत बर्दे, राज्य मराठी पत्रकार संघाचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष प्रा. सुभाष लहाने, पत्रकार भानुदास लकडे, सुनील तिजारे, संजय काळे व चिखली येथील पत्रकार विष्णू अवचार यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया यांची भेट घेऊन त्यांना घडलेल्या प्रकाराबाबत माहिती दिली. पत्रकार श्री अवचार यांनी घटनास्थळावरील सर्व हकीकत सांगितली, यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षकांनी असे प्रकार होणे योग्य नाही या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी आढळल्यास कारवाई करू.. असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. जिल्ह्यात अशा घटना वारंवार घडत आहेत,त्यामुळे त्याला पायबंद घातला पाहिजे अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल.. अशी भूमिका पत्रकारांनी विशद केल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी यापुढे अशी घटना घडणार नाही, याची खबरदारी घेऊ असे आश्वासन दिले.