इंडिया टीव्हीचे पत्रकार सुधीर शुक्ला यांच्यावर धावत्या लोकलमध्ये प्राणघातक हल्ला करून त्यांना लोकलबाहेर फेकण्याचा प्रयत्न करणाऱया टोळीच्या अंधेरी रेल्वे पोलिसांनी अखेर मुसक्या आवळल्या. सर्व आरोपी नालासोपारा येथील राहणारे असून सर्वांना आज अटक करण्यात आली.
बुधवारी सकाळी सात वाजता सुधीर शुक्ला यांनी मीरा रोड येथे चर्चगेट फास्ट लोकल पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना पाच जणांच्या टोळक्याने लोकलमध्ये घुसण्यास मज्जाव केला. मात्र तरीदेखील सुधीर डब्ब्यात चढले. नाही बोलत असतानाही सुधीर डब्यात आल्याने त्या पाच जणांचा राग अनावर झाला. त्यांनी शिवीगाळ करीत सुधीर यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे सुधीर यांनी त्यांच्या मोबाईलवर आरोपींचा फोटो काढण्याचा प्रयत्न केल्याने ते सर्व आणखीनच संतापले. आरोपींनी सुधीर यांचा मोबाईल हिसकावून घेत त्यांना धावत्या लोकलमधून फेकण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी सुधीर यांनी अंधेरी रेल्वे पालीस ठाण्यात तक्रार दिली होती.
वॉच ठेवून झडप घातली
गुन्हा दाखल झाल्यानंतर अंधेरी रेल्वे पोलिसांनी ७ पथके तयार करून आरोपींचा शोध सुरू केला. पोलिसांनी मीरा रोडसह इतर स्थानकांवर वॉच ठेवला. अखेर नालासोपारा येथे राहणारे विशाल डोंगरे (२८), विवेक धुमाळ (३२), रवींद्र राणावडे (२८), संजय आंबावले (३२), राजेश गोठल (२३) या पाच जणांच्या टोळीला जेरबंद केले.