पुणे, २३ जुलै, (हिं.स.) : ‘कोणत्याही घटनेचे वार्तांकन करताना पत्रकारांनी वास्तवता आणि संवेदनशीलता यांनाच प्राधान्य देणे आवश्यक आहे’, असे मतभारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस राम माधव यांनी आज पुण्यातव्यक्त केले. विश्व संवाद केंद्र आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांनी संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ‘देवर्षी नारद पत्रकारिता गौरव पुरस्कार प्रदान’ सोहळ्यात ते बोलत होते. समाज प्रगल्भ झाला असल्याने पत्रकारांनीही नम्र होत ध्येयनिष्ठ पत्रकारिता करावी, असा सल्ला माधव यांनी दिला. जम्मू – काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचे ठामपणे सांगत माधव यांनी काश्मीरवासियांनाही आपलसे करण्याचे आवाहन यावेळी केले.
भारतीय राज्यघटनेच्या चौकटीत राहून जम्मू काश्मीरला सर्व अधिकार देण्यास पाठिंबा असल्याचेही राम माधव म्हणाले.
या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार दिलीप धारुरकर यांना ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार प्रदान करण्यात आला. पंधरा हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि शाल – श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप होते. याबरोबरच, मुस्तफा आतार यांना युवा पत्रकार पुरस्कार, गणेश कोरे यांना छायाचित्रकार पुरस्कार आणि शेफाली वैद्य यांना सोशल मिडीया पुरस्कार प्रदान करण्यात आला। साडे सात हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि शाल – श्रीफळ असे या पुरस्काराचं स्वरुप होते.