कायदा झालाःपत्रकारांचा आवाज बंद कऱण्याचा नवा फंडा

दोन दिवसांत चार ठिकाणी पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल 

सत्य आणि वस्तुनिष्ठ बातमी देणं हा गुन्हा आहे काय ? ग्रामीण भागातील गुंड,माफिया,बारवाले यांच्या गुंडगिरीच्या विरोधात आवाज उठविणे गुन्हा आहे काय ? नाही ना ? पण महाराष्ट्रात आज तसेच वातावरण आहे.अशी कृत्ये कऱणारे पत्रकार गुन्हेगार असल्याचे समजून त्यांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी गुंड आणि पोलीस संयुक्त मोहिम राबवित आहेत असं वास्तव समोर आलं आहे.कुणाच्याही विरोधात सत्य बातमी दिली की,त्या पत्रकाराचा आवाज बंद कऱण्यासाठी त्याच्यावर गंभीर खोटया केसेस करायच्या आणि त्याला कायमचे आयुष्यातून उठवायचे प्रकार राज्यात सुरू आहेत.हितसंबंधियांच्या या कारस्थानांना स्थानिक पोलिसीची फूस आणि साथ मिळत असल्याने हे प्रकार चिंता वाटावी इतपत वाढले आहेत.कायदा झाल्याने पत्रकारांवर हल्ले करणे आता सोपे राहिले नाही.हल्ला केल्याचे सिध्द झाल्यास तीन वर्षाच्या कैदेची शिक्षा होऊ शकते हे हितसंबंधियांच्या लक्षात आल्यानं त्यांनी पत्रकारांचा आवाज बंद कऱण्याचा नवा फंडा शोधून काढला आहे.गेल्या दोन दिवसात महाराष्ट्रात अशा चार-पाच घटना घडल्यानं राज्यभऱ माध्यमात चिंतेचे वातावरण आहे.हा विषय पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती तसेच मराठी पत्रकार परिषदेने गंभीरपणे घेतला असून ‘तक्रारीची शहानिशा करूनच पत्रकारांवर गुन्हे दाखल व्हावेत’ अशी मागणी एका निवेदनाव्दारे मुख्यमंत्र्यांकडं केली गेली आहे.येत्या 25 तारखेला परिषदेच्या एका कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री नागपुरात आहेत त्यावेळी देखील हे वास्तव मुख्यमंत्र्यांच्या कानी घातले जाणार आहे.राज्यात खोटया गुन्हयांत पत्रकारांना अडकविण्याचे प्रकार वाढत असल्याने तातडीने जिल्हा पातळीवर कायदेविषयक सल्ला आणि सहकार्य असा एखादा वकिलांचा सेल करता येईल काय याचा विचार पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती करीत असून अशा सेलच्या माध्यमातून खोटे गुन्हे दाखल झालेल्या पत्रकारांना मदत करण्याची कल्पना आहे.त्यासाठी लवकरच  समितीची एक बैठक बोलाविली जाणार आहे.

अमरावती

अमरावती येथील एका वाहिनीचा पत्रकार प्रशांत कांबळे आज पोलीस कोठडीत आहे.त्याचा गुन्हा काय तर त्यानं निःपक्ष भूमिका घेत समाजहिताच्या बातम्या दिल्या.चांदूर रेल्वे येथे तो राहतो.जय महाराष्ट्र वाहिनीसाठी काम करतो मुंबईत असताना सफाई कामगारांच्या प्रश्‍नांवर त्यांनी आवाज उठविला आणि अनेकांना अंगावर घेतलं.अमरावतीला बदली झाल्यानंतरही त्यानं बोगस डॉक्टरांच्या विरोधात आवाज उठविला.त्यासाठी स्टींग ऑपरेशन करून व्यवस्थेच्या नाकी दम आणला.अखेर त्याच्या मोहिमेला यश आलं आणि रूग्णांच्या जिविताशी खेळ खेळणारे कित्येक डॉक्टर जेलमध्ये गेले किंवा त्यांना प्रॅक्टीस बंद करावी लागली.त्यामुळं अनेकांचे हितसंबंध दुखावल्याने या सर्व यंत्रणा प्रशांतच्या विरोधात गेल्या .पोलिसांसह सारेच प्रशांत कुठं अडकतो का याची वाट बघत राहिले.अखेर पोलिसांना संधी मिळाली.प्रशांतच्या गावातील एका मुलीनं आत्महत्या केली.ही आत्महत्या मुलीनं कुणामुळं केली याची माहिती गावकर्‍यांना होती.जबाबदार मुलाला अटक करण्याची मागणी गावकरी करीत होते.या बातमीचं वृतसंकलन प्रशांत करीत होता.संवेदनशील घटना आहे मात्र पोलीस काही करीत नाहीत हे चित्र समोर येताच गावकर्‍यांमध्ये संतापाचा भडका उडाला आणि गावात दगडफेक,लाठीचार्ज झाला.त्यात अडकला तो प्रशांत .प्रशांतवर पोलिसांनी विविध गुन्हे दाखल करून त्याला अटक केली.सराईत गुन्हेगारांसारखं त्याला बांधून मारहाण केली गेली.इतरांना न्याय मिळवून देण्यासाठी धडपडणारा प्रशांत आज स्वतःच न्याय मागतो आहे.तो पोलिस कोठडीत आहे.पोलिसांनी कोर्टाकडं आठ दिवसाची पोलिस कोठडी मागितली होती पण कोर्टानं तीन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.पोलिसांच्या विरोधात वास्तववादी बातमी दिल्याची शिक्षा सध्या तो भोगतोय.हा विषय मराठी पत्रकार परिषदेने गंभीरपणे घेतला असून अमरावती जिल्हा पत्रकार संघाला प्रशांत कांबळे यांना पूर्ण सहकार्य करण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत.त्यानुसार अमरावती जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली काल पत्रकारांनी जिल्हाधिकार्‍यांची भेट घेऊन निवेदन दिले .

उदगीर (ज़िल्हा लातूर )

दुसरी घटना लातूर जिल्हयातील उदगीरची..शहरातील एका शाळेत प्रवेशासाठी बेकायदेशीर डोनेशन घेतले जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पत्रकार निवृत्ती जवळे आणि त्यांचे अन्य एक सहकारी शाळेत चौकशी कऱण्यासाठी गेले असता त्यांना शाळेच्या मुख्याध्यापकांनी शिविगाळ ,धक्काबुक्की तर केलीच मात्र शिवाजी चौकात तुम्हाला बदडून काढतो अशी भाषाही वापरली.हा सारा घटनाक्रम कॅमेर्‍यात कैद झाला असून तो वाहिन्यांवरूनही महाराष्ट्रानं पाहिला आहे.या दमदाटीची तक्रार पोलिसांत दिली गेल्यानंतर मुख्याध्यापकांनीही मग जातीय वाचक शिविगाळ केल्याची तक्रार पोलिसात दिली आहे.जी क्लीप समोर आली आहे त्यात जवळे मुख्याध्यापकांशी आदरानं बोलतानाच दिसत आहेत.असं असतानाही त्यांच्यावर अ‍ॅट्रा्रसिटी कलमाअंतर्गत तक्रार दाखल झाली आहे.आपली पापं लपविण्यासाठी माध्यमांवर गुन्हे दाखल करून त्यांचा आवाज बंद करण्याच्या हा प्रयत्न संतापजनक आहे.उदगीर येथील पत्रकारांनी यासंदर्भात तहसिलदारांना निवेदन दिले आहे.

आष्टी ( जिल्हा बीड )

बीड जिल्हयातील आष्टी येथे देखील असाच प्रकार घडला.आष्टी येथील बारमालकाच्या विरोधात बातमी दिल्यानं संतापलेल्या बारमालकाने पोलिसांशी संगनमत करून दादासाहेब बन आणि शरद रेडेकर यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला गेला आहे.हा खोटा गुन्हा मागे घ्यावा या मागणीसाठी आष्टी येथील पत्रकारांनी तहसिलदार रामेश्‍वर गोरे यांची भेट घेऊन त्याना निवेदन दिले आहे.आष्टी तालुका पत्रकार संघ तसेच मराठी पत्रकार परिषद,बीडने या घटनेचा निषेध केला असून बीडमध्ये पत्रकार जिल्हाधिकार्‍यांची भेट घेऊन पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांचा आवाज बंद करण्याच्या प्रकारांना आळा घालण्याची मागणी करणार आहेत.

सातारा
सातार्‍यात 22 महिन्यांपासून काही जण आंदोलन करीत आहेत.या आंदोलनाबद्दल अनेक प्रवाद निर्माण झालेले आहेत.त्याबाबतची एक बातमी बेळगाव तरूण भारतमध्ये विशाल कदम यांनी प्रसिध्द केली होती.या बातमीमुळं हितसंबंध दुखावलेल्या लोकांनी विशाल कदमच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.विशाल कदम हा अपंग पत्रकार आहे.

जालनाः मधुकर सहाने यांच्यावर ह्ल्ला

भोकरदन येथील पत्रकार मधुकर सहाने यांच्यावर जीवघेणा हल्ला केला गेला आहे.बातमी दिल्याच्या रागातून हा प्रकार घडल्याचे समोर आले असून जिल्हयातील पत्रकारांनी एकत्र येत या घटनेचा निषेध केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here