जगाची दुःख वेशिवर टांगणारा,लोकांना न्याय मिळावा यासाठी अहोरात्र धडपडणारा पत्रकार स्वतः जेव्हा अडचणीत येतो तेव्हा त्याच्याबरोबर कोणीच नसते.रत्नागिरीचे झी-24 तास वाहिनीचे पत्रकार प्रणव पोळेकर यांची अवस्था काहीशी अशीच झाली आहे.उपचारामध्ये झालेली दिरंगाई,आणि डॉक्टरांचे  अक्षम्य दुर्लक्ष्य यामुळे प्रणवच्या पत्नी ज्ञानदा पोळेकर याचं दुःखद निधन झालं.प्रसूती झाल्यानंतर त्यांना डॉक्टरांनी डिस्चार्ज दिला होता.मात्र नंतर त्यांना  त्रास सुरू झाला म्हणून  पुन्हा रूग्णालायत दाखल केले गेले.मात्र नंतर तब्बल दहा तास त्यांच्याकडं कोणीच पाहिलं नाही अशी तक्रार प्रणव  पोळेकर यांनी पोलिसात केली आहे.डॉक्टरांच्या निष्काळजीपणाचा हा बळी असल्याचं प्रणव  पोळेकर आणि मराठी पत्रकार परिषद रत्नागिरीने पोलिसांत आणि जिल्हाधिकार्‍यांकडे केलेल्या तक्रारीत नमुद केल आहे..मात्र ज्या डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळं ज्ञानदा पोळेकर यांचं निधन झालं त्या डॉक्टरांच्या विरोधात पंधरा दिवस उलटून गेल्यानंतरही साधा गुन्हाही दाखल झालेला नाही.असं दिसतंय की जिल्हयातील सारी आरोग्य यंत्रणच डॉक्टरांचा बचाव कऱण्यासाठी कामाला लागली आहे.कमिट्यांची नाटकं केली जात आहेत,तक्रार मागे घ्या म्हणून दबाव आणला जात आहे आणि समितीचा अहवाल येईपर्यंत पोलीस गुन्हा दाखल करायलाही तयार नाहीत.ही सारी कैफियत मराठी पत्रकार परिषदेचे विश्‍वस्त किरण नाईक यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्या कानावरही घातली तरी काही होत नसेल तर यंत्रणा किती निगरगट्ट झालीय हे लक्षात येईल.आज स्थिती अशीय की,एवढी मोठी दुर्घटना एका पत्रकाराच्या आयुष्यात घडूनही ना समाज पत्रकाराच्या पाठिशी आहे,ना राजकीय व्यवस्था !इलेक्टॉनिक मिडिया गेली पाच दिवस श्रीदेवी यांच्या निधनाखेरीज जगात काही घडतंय हेच समजून घ्यायला तयार नाही..त्यामुळं त्यांच्याकडूनही प्रणव वरील दुःखाची नोंद घेतली जात नाही.स्थानिक पत्रकार प्रणवच्याबरोबर खंबीरपणे उभे आहेत ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब आहे.स्थानिक पत्रकार आणि प्रणव पोळेकर यांची बलदंड अशा व्यवस्थेच्या विरोधात एकाकी लढाई सुरू आहे.एका डॉक्टराला वाचविण्यासाठी गल्लीपासून मुंबईपर्यंत सारी यंत्रणा कार्यरत असल्याने  हतबल व्हायची वेळ आली आहे.

जिल्हयातील सारे पत्रकार एकत्र येत ही प्रणव पोळेकरला न्याय मिळवून देण्यासाठी लढत असले तरी अजून काहीच होत नसल्याने सारेच अस्वस्थ आहेत.एका पत्रकारालाही न्याय मिळावा यासाठी जिवाच्या आकंताने लढावे लागत असेल तर सामांन्यांची अवस्था काय होत असेल याची आपण कल्पना करू शकतो.थोडया वेळापुर्वीच प्रणवशी माझं बोलणं झालं..नैराश्य,संताप,आणि हतबलता असे भाव त्यांच्या बोलण्यातून दिसत होते.अलीकडेच  लग्न झालं..नवीन पाहुणी घरात आल्याचा आनंदही उपभोगता आलेला नसतानाच केवळ वैद्यकीय व्यवस्थेतील गलथानपणामुळं ज्ञानता पोळेकर यांना गमवावं लागणं हे दुःख  भरून येणारं नाही.तरीही ज्यांच्यामुळं माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळला त्याना शिक्षा झाली पाहिजे ही प्रणवची रास्त मागणी आहे.

त्यासाठी संघटना म्हणून आम्ही तर प्रयत्न करीत आहोतच..त्याचबरोबर पत्रकाराला सदाचाराचे पाठ शिकविणार्‍यांनी देखील अशा कठिण प्रसंगी पत्रकाराच्या बाजुनं उभं राहण्याची हिंमत दाखविली पाहिजे.ज्ञानदा पोळेकर मृत्यू प्रकरणाची निःपक्ष चौकशी व्हावी,निष्काळजी करणार्‍या डॉक्टरावर गुन्हे दाखल करावेत आणि प्रवीण पोळेकरांना न्याय द्यावा अशी मराठी पत्रकार परिषदेची मागणी आहे.त्यासाठी सोमवारी आम्ही परत मुख्यमंत्र्यांना भेटणार  आहोत.हा प्रश्‍न विधिमंडळात उपस्थित करण्यासाठी देखील काही आमदारांच्या भेटी घेणार आहोत..आपल्या सर्वांची साथ प्रणवला हवी आहे.

LEAVE A REPLY