गुजरातमधील निवडणूक प्रचार मोहिम संपल्यानंतर काही माध्यमांनी राहूल गांधींची मुलाखत प्रक्षेपित केली त्यामुळं आचारसंहितेचा भंग झालाय असा आरोप करीत गुजरातमधील काही माध्यम संस्थांच्या विरोधात गुन्हे दाखल कऱण्याचे आदेश निवडणूक आयोगानं दिले आहेत.राहूल गांधींनाही नोटिस बजावली गेली आहे.हा निवडणूक आयोगाचा दुरूपयोग आहे असा आरोप कॉग्रेसनं केलाय,पत्रकारांना जेलमध्ये डांबण्याची अप्रत्यक्ष धमकीच या कारवाईमागे असल्याचंही कॉग्रेसंच म्हणणं आहे.भाजपनं केलेल्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगानं मिडियावर कारवाई करण्याचे आदेश दिलेत.ही कारवाई मिडियानं स्वतः होऊन केलेली नाही ही गोष्ट दुर्लक्षिता येणारी नाही.
प्रचार काळात दोन्ही बाजुंनी मिडियाचा जमके वापर केला.आता प्रचार संपत आलाय..मिडियाची गरजही संपलीय..त्यामुळं राग मिडियावर काढला जातोय..मुलाखती देणं आणि दाखविणं हे माध्यमाचं काम आहे.उद्या बातम्याही दाखवू नयेत असे फर्मान आयोग काढेल.याला अर्थ नाही.आपण मुलाखत दिल्यानं आचार संहिता भंग होतेय याची जाणीव नेत्यांना हवीय.ती त्यांनी ठेवली नसेल तर दोष त्यांना द्या,काय कारवाई करायीचय ते त्यांच्यावर करा.मिडियाला सॉफ्ट टार्गेट करू नका असं बजावण्याची वेळ आता आलीय.
लोकसत्ता ऑनलाईनची बातमी
भाजप स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी निवडणूक आयोगाचा वापर करून घेत आहे. गुजरातमधील पत्रकारांना जेलमध्ये धाडण्याच्या अप्रत्यक्ष धमक्या दिल्या जात आहेत, असा आरोप बुधवारी काँग्रेसकडून करण्यात आला. गुजरातमधील स्थानिक वृत्तवाहिनीला राहुल गांधी यांनी नुकतीच एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीवरून भाजप आणि काँग्रेसमध्ये शाब्दिक युद्ध पेटले आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीचा दुसऱ्या टप्प्याचा प्रचार काल संपुष्टात आला. मात्र, तरीही राहुल गांधी यांनी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. हा त्यांच्या प्रचाराचा एक भाग होता. १९५१ च्या लोकप्रतिनिधी कायद्यानुसार मतदानाला ४८ तास उरले असताना कोणतीही राजकीय व्यक्ती अशाप्रकारची मुलाखत देऊ शकत नाही. त्यामुळे निवडणूक आयोग या प्रकाराची दखल घेऊन योग्य ती कारवाई करेल, असा विश्वास केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केला.
मात्र, काँग्रेसने हे सर्व आरोप फेटाळून लावले. उलट भाजपच राजकीय फायद्यासाठी निवडणूक आयोगाचा वापर करून घेत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला. भाजप पत्रकारांना धमकावण्याचा प्रयत्न करत आहे. काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल गांधी यांनी काही गुजराती वृत्तवाहिन्यांना मुलाखत दिल्यानंतर भाजपकडून संबंधित वृत्तवाहिन्यांना निवडणूक आयोगाच्या कारावाईची भीती दाखवली जात आहे. राहुल गांधी यांची मुलाखत प्रसारित करणाऱ्या वृत्तवाहिन्यांच्या पत्रकारांना जेलमध्ये टाकण्याची धमकी दिली जात आहे. आम्ही भाजपच्या या उद्दाम वृत्तीचा निषेध करतो, असे रणदीप सुरजेवाला यांनी म्हटले. दरम्यान, निवडणूक आयोगाने आपल्याकडे यासंबंधीची तक्रार आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. त्यामुळे आता आम्ही या मुलाखतीच्या डीव्हीडी गोळा करत आहोत. त्या पाहून आम्ही कायद्याचे उल्लंघन झाले आहे किंवा नाही, ते ठरवू असे गुजरात विधानसभा निवडणुकीचे मुख्याधिकारी बी बी स्वेन यांनी सांगितले.