दुष्काळमुक्तीसाठी देवडीकर सरसावले

0
95261 लाख रूपये खर्चाच्या बंधार्‍याचा शुभारंभ

बीड ः वडवणी तालुक्यातील देवडी येथील नदीवर बांधण्यात येणार्‍या बंधार्‍याच्या कामाचा शुभारंभ बुधवारी गावचे माजी सरपंच माणिकराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला.61 लाख रूपये किंमतीचा हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर गावचा पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीसाठीच्या पाण्याचा प्रश्‍न कायमस्वरूपी संपणार असून गावातून दुष्काळ हद्दपार होणार आहे.पुण्याचे सहधर्मदाय आयुक्त दिलीपराव देशमुख यांच्या प्रयत्नातून सकाळ रिलीफ फंडाच्यावतीने हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.आडी बधारा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर गावाचा चेहरा-मोहरा बदलण्यास मदत होईल असा विश्‍वास गावचे सुपूत्र तथा ज्येष्ठ पत्रकार एस.एम.देशमुख यांनी व्यक्त केला आहे.
वडवणी तालुक्यातील देवडी हे गाव दोन नद्यांच्या तिरावर वसलेले आहे.मात्र नद्यांचे नाले झाले आणि गावाला पाणी टंचाईच्या झळा बसायला सुरूवात झाली.कधी काळी पाण्याची सुबत्ता असलेलं देवडी हे गाव पाण्यासाठी वणवण भटकताना दिसते.विहिरी,बोअरवेल कोरडया पडल्याने शेती पूर्णतः उदव्धस्त झाली आणि पिण्याच्या पाण्याचेही दुर्भिक्ष्य जाणवायला लागले.दोन नद्यांचा संगम जेथे होतो तेथे बंधारा बांधला तर गाव कायमचे दुष्काळमुक्त होईल अशी सूचना ग्रामस्थांनी दिलीप देशमुख यांच्याकडे केल्यानंतर त्यांनी या संदर्भात सकाळ रिलिफ फंड या स्वयंसेवी संस्थेला विनंती केली.सकाळ रिलिफ फंडाने ही विनंती मान्य केली आणि देवडी नदीवर 61 लाख रूपये खर्च करून बंधारा बांधण्याचे मान्य केले.त्याचा शुभारंभ बुधवारी देवडी येथे करण्यात आला.यावेळी ज्येष्ठ पत्रकार एस.एम.देशमुख,सकाळ रिलीफ फंडाच्यावतीने सकाळचे बीडचे प्रतिनिधी दत्ता देशमुख,पत्रकार अनिल वाघमारे ,सरपंच जालंदर झाटे,माजी संरपंच विश्‍वास आगे,पंचायत समितीचे माजी सदस्य मच्छिंद्र झाटे,ज्येष्ठ नागरिक बाबासाहेब झाटे,तुळशीराम राऊत आदि उपस्थित होते.यावेळी बोलताना एस.एम.देशमुख यांनी बंधार्‍यांचे काम पावसाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण होईल आणि यावर्षीपासूनच पाणी साठा होऊन गाव सुजलाम सुफलाम होईल असा विश्‍वास व्यक्त केला.या कार्यात गावकर्‍यांचा देखील मोठा सहभाग असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here