तालुका-तालुक्यात पत्रकार भवनं असावीत

0
904

महाराष्ट्रात अनेक जिल्हा ठिकाणी पत्रकार भवनच्या इमारती आहेत.मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न जिल्हा संघांकडं हे पत्रकार भवन आहेत.ज्या ठिकाणी इमारती नाहीत तेथे भूखंड आणि वीस लाख रूपयांचे अनुदान सरकार जिल्हा संघांना देते.मात्र आता सर्वच तालुक्यात पत्रकारांची संख्या वाढली आहे.त्यामुळं तालुक्याच्या ठिकाणीही पत्रकार भवन असले पाहिजे अशी परिषदेची मागणी आहे.ती रास्त आहे.354 तालुक्यांत अशा इमारती देणं शक्य आहे काय असा प्रश्न उपस्थित केला जातो.तो चुकीचाही नाही.सुरूवात म्हणून प्रत्येक जिल्हयातील काही तालुक्यात तरी अशी तालका पत्रकार भवन झालं पाहिजेत.त्यासाठी आता पाठपुरावा करावा लागेल.
हे सारं आठवलं ते पुणे जिल्हयातील मुळशी येथे बांधण्यात आलेल्या पत्रकार भवनाच्या इमारतीवरून.राज्यात काही तालुक्यात पत्रकार भवनं जरूर आहेत पण मुळशी एवढी सुसज्ज ,अत्याधुनिक पध्दतीनं बांधलेली आणि पत्रकारांना लागणाऱ्या सर्व सुविधांनी युक्त अशी पत्रकार भवनाची इमारत राज्यात अन्यत्र नक्कीच नाही.त्यामुळ राज्यातील पहिलं अत्याधुनिक पत्रकार भवन असं आम्ही मुळशीच्या पत्रकार भवनाचं वर्णन करतो.यात महत्वाचा भाग म्हणजे या इमारतीसाठी सरकारनं एक पैसा ही दिलेला नाही.खासदार निधी,आमदार निधी,जिल्हा परिषद आणि अन्य दानशूर व्यक्तींकडून निधी उभारून ही इमारत पूर्ण झालीय.जागाही एका दानशूर व्यक्तीनं दिलीय.मुळशी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र मारणे देशमुख आणि जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष दत्तात्रय सुर्वे यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यासाठी जे प्रय़त्न केले त्याला तोड नाही.6 जून 2013 ला माझ्या उपस्थितीत पायाभरणीची कुदळ मारली.त्यानंतर दोन वर्षाच्या आत तीन मजली इमारत उभी राहिली आहे.मुळशीतील तमाम पत्रकारांचा आम्हाला नक्कीच अभिमान वाटतो.सर्वांचे अभिनंदन.
काल या वास्तूचं उद्‌घाटन सांसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट आणि महादेव जाऩकर यांच्या हस्ते कऱण्यात आलं.मी देखील यावेळी उपस्थित होतो.यावेळी बोलताना मी सर्व तालुक्यात पत्रकार भवन उभारली जावीत अशी मागणी केली.तसंच पत्रकार संरक्षण कायदा आणि पत्रकार पेन्शनबद्दल अच्छे दिनवाल्या सरकारनं केलेल्या घोषणांचीही गिरीश बापट यांना आठवण करून दिली.त्यावर त्यांनी आणि महादेव जानकर यांनी आम्ही मुख्यमंत्र्यांशी बोलून एक बैठक लावतो आणि पत्रकारांचे प्रश्न मार्गी लावतो असं आश्वासन दिलं.अशा आश्वासनाची आता सवय लागली असली तरी नव्या सरकारला एक संधी दिली पाहिजे या कल्पनेनं मी देखील टाळ्या वाजविल्या.गिरीश बापट आणि जानकर या दोघांचेही पत्रकारांशी चांगले संबंध राहिलेले आहेत.दोघेही हाडाचे कार्यकर्ते असल्यानं प्रश्नांची त्यांना चांगली जाणीव आहे.पत्रकारांच्या प्रश्नांच्याबद्दल उभयतांना तळमळ आहे.ती त्यांच्या बोलण्यातूूनही दिसली.बापट आणि जानकर ज्या पध्दतीनं बोलले ते बघता मुख्यमंत्री फडणवीस परिषदेच्या 6 आणि 7 जून रोजी पिंपरीत होणाऱ्या अधिवेशनात पत्रकार पेन्शनची घोषणा करतील ही अपेक्षा आम्हाला नक्कीच आहे.भाजपनं आपल्या जाहिरनाम्यात पत्रकार पेन्शनचं आश्वासन दिलं होतं.त्याचंही स्मरण करून देत मी लवकरात लवकर आश्वासन पूर्ती करावी अशीही विनंती पालकमंत्र्यांना केली आहे.मुळशी पत्रकार संघानं ही चर्चा पुन्हा एकदा घडवून आणल्याबद्दल त्यांनाही धन्यवाद द्यावेच लागतील.
शेवटी कार्यक्रम चांगलाच रंगला.देणगीदार आणि पत्रकारांच्या हितचिंतकांचा यावेळी सत्कार कऱण्यात आला.ते योग्यच झालं.उत्कृष्ट नियोजन हे मुळशीतल्या कार्यक्रमाचं वैशिष्टय असतं ते यावेळीही दिसलं.राजेंद्र माऱणे एक शिस्तप्रिय पत्रकार आहेत.त्यांनी आणि दत्ता सुर्वे यांनी कार्यक्रमाची काटेकोर आखणी केली होती.त्यामुळं कार्यक्रमात कोणतीच उणीव जाणवली नाही.इमारतीसारखाच कार्यक्रमही सुंंदर झाला.पुण्यातल्या आणि पुण्याला येणाऱ्या पत्रकारांनी मुळशी पत्रकार संघाची इमारत आवर्जुन बघावी अशी देखणी आणि सुसज्ज अशी ही वास्तू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here