डॉ. राजू पाटोदेकर याचं अभिनंदन

0
957

रायगडचे जिल्हा माहिती अधिकारी आणि आमचे मित्र राजू पाटोदेकर डॉक्टर झाले आहेत. “अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातील सामाजिक वास्तवाचा संवाद,एक चिकित्सा”  या विषयावरील प्रबंध त्यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाला सादर केला.तो स्वीकारून विद्यापीठानं त्यांनी पीएचडी ही सन्माननिय पदवी प्रदान केली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वृत्तपत्र विद्या विभागाचे प्रपाठक डॉ.वि.ल.धारूरकर त्यांचे गाईड होते.राजू पाटोदेकरांचं मनःपूर्वक अभिनंदन.

 राजू पाटोदेकर मुळचे बीड जिल्हयातील पाटोदा या सदैव दुष्काळी तालुक्यातले.शैक्षणिक किंवा पत्रकारितेची कोणतीही पार्श्वभूमी नाही,कोणी गॉडफादर नाही किंवा आर्थिक स्थितीही फार चांगली नाही अशा प्रतिकुल परिस्थितीतली मुलं साधारणतः रूळलेल्या वाटेनंच जाण्याचा प्रयत्न करतात.पदवी मिळाली की,कुठं तरी नोकरी मिळवायची आणि तिथंच आयुष्यभर चिकटून राहायचं हा रिवाज आहे.विशेषत्वानं मराठवाड्यात तरी हेच दिसतं.राजूनं वेगळी वाट चोखळली.साधारणतः तो काळ असा होता की,पत्रकारिता करायची म्हणजे भिकेचे डोहाळे आ ठवले असंच समजलं जायचं.पत्रकारांना पगार एवढे कमी होते की, हाता तोंडाशी गाठही पडायची मारामार.त्यामुळं जगण्याचं साधन म्हणून नव्हे तर खऱ्या अर्थानं ज्यांना आवड आहे अशीच मुलं पत्रकारितेत यायची.अशा आवडीतूनच राजूनं पत्रकारितेचा मार्ग चोखळला. राजूनं फ्रिलान्स पत्रकारिता केली.म्हणजे आणखीनच वांधे.सिनेमा हा विषय घेऊन राजू पाटोदेकर लिखाण करीत होते.या लिखाणाचं मानधन मिळविण्यासाठी त्याना कोठे, कोठे आणि ेकिती खेटे घालावे लागायचे हे मी पाहिलेलं आहे.मात्र त्यांनी परिस्थितीशी कधी तडजोड केली नाही.किंवा पत्रकारितेतली किंवा चित्रपट या विषयातली आवडही कमी होऊ दिली नाही.ते लिहित राहिले.नंतर त्यांनी वृत्तपत्र विद्या अभ्यासक्रमातली पदव्युत्तर पदवी मिळविली आणि चित्रपटाच्या आवडीमुळं नाट्यशास्त्र विषयातलीही पदव्युत्तर पदवी संपादन केली.हा साधारणतः 1990-92 चा काळ असावा.या काळात माझा औरंगाबाद -नांदेड असा प्रवास सुरू होता. सिनेमातलं फारसं काही कळत नसलं तरी राजूचा लेख आहे म्हणून सिनेमा वाचायचो.नंतर राजूचा संपर्क राहिला नाही.एक दिवस मंत्रालयात अचानक राजूची भेट झाली.माहिती विभागात मी सहाय्यक संचालक म्हणून जॉईन झाल्याचं त्यांनी सांगितलं.त्यानंतर राजूशी वारंवार भेट व्हायची. छाटोदेकर नंतर जिल्हा माहिती अधिकारी झाले,अगोदर रत्नागिरी,मंत्रालय आणि आता रायगडात जिल्हा माहिती अधिकारी म्हणून ते काम करीत आहेत.या सर्वच ठिकाणी काम करताना त्यांनी आपल्या कामाचा ठसा नक्कीच उमटविला आहे.शासकीय सेवेत आणि जबाबदारीच्या पदावर असतानाही त्यांनी सिनेमाची आवडही कमी होऊ दिली नाही.अमिताभ बच्चन हा विषय त्यांनी अभ्यासासाठी निवडला आणि दुसरीकडं सिनेमातही छोटे-मोठे रोल ते करीत राहिले.या सा़ऱ्या कष्टाचं फळ त्यांना आज मिळालं आहे याचा नक्कीच आनंद आहे.आपण कोणत्याही क्षेत्रात असा ति थं जर आपल्याला यश संपादन करायचं तर “घराची साथ”  हवी असते.राजू पाटोदकर या अर्थानं सुदैवी राहिले.राजूच्या प्रत्येक ऍक्टीव्हिटीमध्ये त्यांच्या पत्नी मयुरी देशपांडे-पाटोदेकर यांचंही मोलाचं सहकार्य त्याना लाभलेलं आहे.मयुरी पाटोदेकर या देखील माहिती विभागात वरच्या पदावर आहेत.

मृदू आणि लाघवी स्वभाव,मराठवाड्याच्या स्वभावात क्वचितच दिसणारी नम्रता,कोणाच्या भानगडीत डोकं न खुपसण्याची माहिती विभागात अभावानचं दिसणारी वृत्ती या गुणांच्या बळावर राजू पाटोदेकर यांनी महाराष्ट्रात मोठा मित्र परिवार जमविलेला आहे.अनेकदा गोष्टी मनाविरूध्द होत असतानाही राजू पाटोदेकर चिडले आहेत,संतापले आहेत असं कधी दिसलं नाही.न आवडलेल्या विषयातली नाराजीही संयमानं व्यक्त कऱण्याची पाटोदेकर यांची हातोटी त्यांना मोठा मित्र परिवार जमविण्यात उपयोगी पडलेली आहे. – म्हणूनच पाटोदेकर डॉक्टर झाल्याची बातमी कळली तेव्हा त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला.प्रतिकूल परिस्थितीशी तडजोड न करता चार हात करीत राजू पाटोदेकर यांनी मिळविलेले हे यश त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांना नक्कीच आनंद देणारे आहे.पाटोदेकर याचं पुनश्च अभिनंदन.

जाता जाता आणखी एका गोष्टीचा उल्लख करावा लागेल.माहिती आणि जनसंपर्क विभागात पूर्वी पत्रकारितेशी संबंध नसलेल्या अधिकाऱ्यांचाच भरणा असायचा..बातमीही लिहिता न येणारे काही अधिकारी मी पाहिले आहेत.सुदैवानं आता तशी स्थिती नाही. पत्रकारितेची पार्श्वभूमी असलेले,पत्रकारितेतील पदवी,पदव्युत्तर शिक्षण घेतलेले अनेक अधिकारी माहिती विभागात कार्यरत आहेत.डॉक्टरेट झालेलेही अनेक जण आहेत.त्यात माझ्या माहितीतले,डॉ.सुरेखा मुळे,डॉ.संभाजी खराट,डॉ.किऱण मोघे,डॉ.गणेश मुळे आणि आता डॉ.राजू पाटोदेकर यांचा उल्लेख करता येईल.मह्तवाचं म्हणजे ही सारी मंडळी मराठवाड्यातून आलेली किंवा मराठवाड्‌यात शिकलेली आहे.हे सारे अधिकारी नक्कीच चोखपणे आपली जबाबदारी पार पाडताना दिसतात. ( एस.एम.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here