पिंपरी-चिंचवड – 76 वर्षांची देदीप्यमान परंपरा असलेल्या आणि मराठी पत्रकारांची पहिली संघटना असलेल्या मराठी पत्रकार परिषदेचे 40 वे अखिल भारतीय अधिवेशन 6 आणि 7 जून रोजी पुणे जिल्हयातील पिंपरी-चिंचवड येथे होत आहे.अधिवेशनाचे उद्घघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्याचे तर समारोप शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे याच्या उपस्थितीत करण्याचे नियोजन आहे.अघिवेशनासाठी देशभरातून अडीच ते तीन हजार पत्रकार प्रतिनिधी उपस्थित राहतील असे गृहित धरून व्यवस्था केली जात आहे.
परिषदेचे 39 वे अधिवेशन औरंगाबाद येथे पार पडले होते.त्यानंतर प्रदीर्घ कालावधीनंतर पुणे जिल्हयात हे अधिवेशन होत असल्याने पत्रकारांमध्ये उत्सुकता आहे.
मराठी पत्रकार परिषदेची स्थापन डिसेंबर 1939 मध्ये झाली.पा.वा.गाडगीळ,न.र.फाटक,आचार्य अत्रे ,अनंत भालेराव,रंगाअण्णा वैद्य,अनंतराव पाटील यांच्यासह अनेक दिग्गज पत्रकारांनी परिषदेचे अध्यक्षपद भूषविलेले आहे.राज्यातील 35 जिल्हयात आणि जवळपास 340 तालुक्यात परिषदेच्या शाखा असून साडेसात हजार परिषदेशी जोडले गेलेले आहेत.दिल्ली,पणजी,बेळगाव,हैदराबाद,सुरतसह अन्य राज्यातही परिषदेच्या शाखा आहेत.त्यामुळे देशभरातून मराठी पत्रकार अधिवेशनाला येत असतात.
यंदाच्या अधिवेशऩात विविध कार्यक्रम असणार आहेत.सोशल मिडियावर आणि पत्रकारितेतील बदलते प्रवाह यावर एक परिसंवाद असेल,महिला पत्रकारांच्या संदर्भातही परिसंवाद असणार आहे.पत्रकार संरक्षण कायद्याच्या संदर्भात चर्चासत्र असणार आहे.यामध्ये मुंबई आणि दिल्लीसह राज्यातील मान्यवर संपादक भाग घेणार आहेत.तसेच जनता की आदालत यामध्ये एका मान्यवर नेत्याची मुलाखत घेतली जाणार आहे.6 जून रोजी रात्री मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित कऱण्यात आला आहे.भोसरीतील सभागृहात हे कार्यक्रम होतील.अधिवेशऩाच्या निमित्तानं एक स्मरणिका देखील प्रसिध्द केली जाणर आहे.खुल्या अधिवेशनात पत्रकारांच्या प्रश्नावर चर्चा होणार आहे.
पुणे जिल्हा पत्रकार संघ आणि पिंपरी-चिंचवड पत्रकार संघ हे अधिवेशनाचे आयोजक आहेत.तयारीच्या दृष्टीने नुकतीच पिपरी-चिंचवड येथे परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.