मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे कराड मतदारसंघाचे उमेदवार सध्या चर्चेत आहेत ते विविध वाहिन्यांवर झळकणाऱ्या एका जाहीरातीमुळे… याच जाहिरातचं प्रसारण थांबवण्याचे आदेश निवडणूक आयोगानं दिलेत.
या जाहिरातीत काँग्रेसनं केलेल्या कामांची माहिती सांगून काँग्रेसलाच मतदान करण्याचं आवाहन करताना पृथ्वीराज चव्हाण दिसत होते. त्यानंतर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून ते एका कागदावर सही करतानाही या जाहिरातीत दिसत होते… याच जाहिरातीवर औरंगाबाद इथल्या ‘जिज्ञासा प्रतिष्ठान’नं आक्षेप घेत तक्रार दाखल केली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा काढून घेतल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी राजीनामा दिला. त्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आलीय. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर पृथ्वीराज चव्हाणांची ही जाहिरात मतदारांची फसवणूक करत असल्याचं या तक्रारीत म्हटलं गेलं होतं. या तक्रारीची दखल घेत निवडणूक आयोगाने या जाहिरातीचं प्रसारण थांबवण्याचे आदेश दिलेत.
याबद्दल स्पष्टीकरण देताना काँग्रेसनं पृथ्वीराज चव्हाणांची पाठराखण केलीय. या संपूर्ण जाहिरातीत चव्हाण यांनी आपण सद्य मुख्यमंत्री असल्याचा दावा कुठेही केलेला नाही, त्यामुळे याबाबत आक्षेप घेण्याचं काही कारणच नाही, असं काँग्रेसनं म्हटलंय.