गावाकडच्या सत्कारानं …

0
780

मराठवाडयातील धारूर हे तालुक्याचं ठिकाण.माझ्या गावापासून जेमतेम वीस किलो मिटरवर .ऐतिहासिक पार्श्‍वभूमी आणि कर्तृत्वाचा वारसा लाभलेल्या या गावाचं मला नेहमीच आकर्षण वाटत आलेलं आहे.धारूर इथं असलेल्या भुईकोट किल्ल्याला शाळा-कॉलेजात असताना अनेक वेळा भेट देण्याचाही योग आला होता.या धारूरमध्ये बर्‍याच दिवसांनी अनिल महाजन आणि सर्वोत्तम गावस्कर यांच्या आग्रहामुळं पुन्हा जावं लागलं.निमित्त होतं.माझ्या सत्काराचं.परिषदेच्या अध्यक्षपदी माझी निवड झाल्याबद्दल धारूर तालुका पत्रकार संघांनं माझा सत्कार केला.जिल्हयाच्या वेगवेगळ्या भागातून आलेले दोनशेवर पत्रकार आणि स्थानिक नागरिक असे चारशेच्यावर श्रोते उपस्थित होते.तिथं माझं जे आणि ज्या पध्दतीनं कौतुक होत होतं ते पाहून मी भारावून गेलो.आर.टी.देशमुख,अनिल महाजन,सर्वोत्तम आणि निवेदक हे सारेच माझ्याबद्दल भरभरून बोलत होते.त्यांच्या बोलण्यात औपचारिकता नव्हती तर आपलेपणा दिसत होता.पत्रकारांबरोबरच धारूरमधील बुध्दीजिवी भाषण ऐकायला आल्यानं पत्रकारांबरोबरच अन्य ताज्या विषयांवरही बोलावं लागलं.दुष्काळात पत्रकारांची भूमिका,स्वतंत्र विदर्भ,भारत माता की जय हे सारे विषय माझ्या भाषणात होते.तास भर बोललो.समाज आणि राष्ट,राज्य एकसंघ ठेवणे त्याचे तुकडे होणार नाहीत याची काळजी घेणे हे पत्रकारांचे काम असल्याचे माझे मत मी मांडले.पत्रकारांनी सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे आणि जिथं दुःख आहे,जिथं वेदना आणि जिथं अन्याय आहे अशा प्रत्येक ठिकाणी पत्रकारांनी धाऊन गेलं पाहिजे.हे सारे विषय लेखणीच्या माध्यमातून तर मांडले गेलेच पाहिजेत पण त्याच बरोबर या विषयांचा पाठपुरावा करताना रस्त्यावर उतरण्याची वेळ आली तर त्यासाठीही पत्रकारांनी मागे पुढे पाहून चालणार नाही अशी भूमिका मी मांडली.ती उपस्थितांना चांगलीच आवडली असे दिसले.एकूण कार्यक्रम चांगलाच झाला.घरचा कार्यक्रम असल्यामुळं अनिल महाजन आणि त्यांच्या सर्वच सहकार्यामध्ये एकप्रकारी आपुलकी जाणवत होती.माझ्या बरोबरच प्रा.दुबे यांचाही सत्कार करण्यात आला.स्थानिक आमदार आर.टी.देशमुख यांच्या हस्ते आम्हाला सन्मानित केले गेले .कार्यक्रमास संपादक राजेंद्र आगवान,नेरेंद्र कांकरिया,अनिल वाघमारे,जानकीराम उजगरे ,युवा नेते रमेशराव आडसकर आदि आवर्जुन उपस्थित होते.धारूर पत्रकार संघांचा मी मनापासून आभारी आहे.

धारूरमधील पत्रकारांचं मला नेहमीच कौतूक वाटत आलंय.पत्रकारांनी एकत्र येत इथं एक शिक्षण संस्था सुरू केलीय.त्यांनी सुरू केलेली शाळा आज धारूरमधील नंबर एक शाळा आहे.त्यांच्यातील एकोपा कौतुकास्पद आहे.अनुकरणीय देखील आहे.समाज घडविण्याचं काम तर ते करीत आहेतच पण समाजाच्या अडीअडचणीच्या वेळेसही ते धावून जाताना दिसतात.त्यामुळं धारूरमध्ये तरी पत्रकारांबद्दल लोकांच्या मनात आपलेपणा जाणवतो.धारूरकर पत्रकारांचे अभिनंदन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here