केंद्रात आणि राज्यात दीर्घकाळ कॉग्रेसची सत्ता असतानाही कोकणात मात्र कॉग्रेसला आपला एकछत्री अंमल कधीच निर्माण करता आला नाही.तळ कोकणात नाथ पै आणि मधु दंडवते यांच्या रूपानं प्रजा समाजवादी पक्ष आणि रायगडात शेतकरी कामगार पक्षानं सर्व प्रतिकूल परिस्थितीतही कॉग्रेसची नाकेबंदी केलेली होती.सत्तेमुळं होणारी नैसर्गिक वाढ देखील होत नव्हती.राजापूर लोकसभा मतदार संघात सातत्यानं विरोधकांना कौल मिळत होता तर रायगडात कधी कॉग्रेस तर कधी विरोधक असा पाठशिवणीचा खेळ सुरू होता..विधानसभेतही अनेक मतदार संघ असे होते की,तिथं विरोधकांसमोर कॉग्रेसची डाळ कधीच शिजली नाही.अ.र.अंतुले असतील किंवा तळ कोकणात भाई सावंत,केशवराव राणे,शिवाजीराव जठ्यार ,भाईसाहेब हातणकर हे नेते आप-आपल्या इलाख्यात प्रभाव राखून जरूर होते मात्र त्यांनी कोकणात कॉग्रेस वाढविण्याचा व्यापक विचार कधी केलाय असं दिसत नाही . .परिणामतः कोकणाला एकमुखी नेतृत्व असं कधी मिळालंच नाही.नेते आपआपल्या जहागिरीतच मश्गुल राहिल्यानं दिल्ली आणि मुंबईतील सत्तेचा वापर करून कोकणाच्या विकासातही त्यांनी कधी रस दाखविला नाही.त्यामुळं रस्ते असतील,खाड्या किंवा नद्यांवरील पूल असतील,शिक्षण आणि आरोग्याच्या सुविधा असतील,पिण्याच्या पाण्याचे प्रश्न असतील किंवा मच्छिमारांसाठी बंदरं असतील अशा नितांत आवश्यक गरजा भागविण्याचाही प्रयत्न कॉग्रेस नेर्तृत्वानं केला नाही हे वास्तव आहे. अ.र.अंतुले यांना तर राज्याचं नेर्तृत्व करण्याची संधी मिळाली होती.मात्र त्यांनी सातत्यानं भावनेचं राजकारण करीत कधी .हुतात्मा स्मारकं,कधी भवानी तलवार तर कधी रायगडचं नामंातर हेच विषय जीवन मरणाचे समजून तेच नेटानं मार्गी लावण्यात वेेळ घालविला.परिणामतः कोकणी जनतेचे अूनेक बुनियादी प्रश्न तुंबून राहिलेे. ओजगाराची साधनं नसल्यानं गावा-गावातून लोकांचे लोंढे मुंबईच्या दिशेनं वाहत होते .ते रोखण्याचा प्रय़त्न कऱण्याऐवजी “मुंबईला जातोस ना जा,तिकडंच मोठा हो ” म्हणत त्याना शुभेच्छा देण्यातच नेतृत्व धन्यता मानत राहिले .तरूणांना स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कॉग्रेस नेर्तृत्वानं जाणीवपूर्वक प्रयत्न केलाच नाही.त्याचा परिणाम असा झाला की ,कोकणाची अर्थव्यवस्था मुंबईवरून येणाऱ्या मनिऑर्डर्सवरच दिर्घकाळ अवलंबून राहिली. हे पुन्हा मानावर करून सांगितलं जायचं.त्याची लाज कोणाला वाटायची नाही. एका बाजुला अशा प्रकारे लोकांच्या मुलभूत प्रश्नांची उपेक्षा केली जात असतानंाच तत्कालिन नेते सत्तेची सारी सूत्रे कायम स्वरूपी आपल्याच हाती राहतील याचा जाणीवर्पूक काळजी घेत राहिले.स्पर्धक नको म्हणून नवं नेर्तृत्वही त्यांनी विकसित होऊ दिलं नाही किंवा पुढं येऊ दिलं नाही. तेच नेते,तीच भाषणं आणि “आपणच कोकणचे भाग्यविधाते” आहोत अशी शेखी मिरविणाऱ्या नेत्यांमुळं पक्षात आणि एकूणच कोकणात एक साचलेपणा निर्माण झाला होता.या स्थितीला शिवसेनेने 1990च्या दशकात वाट मोकळी करून दिली.1991 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकात कोकणचं वारं कोणत्या दिशेनं वाहतंय याची चुणूक शिवसेनं दाखवून दिली होती,.खरं तर कॉग्रेस नेर्तृत्वानं परिस्थितीचं गाभीर्य ओळखून लगेच सावध होणं अपेक्षित होतं.तसं झालं नाही.त्याचा फटका 1995च्या लोकसभा आणि नंतरच्या विधानसभेत कॉग्रेसला बसलाच बसला.शिवसेनेच्या या झंझावातात कॉग्रेसची जशी दाणादाण उडाली तशीच ती प्रजा समाजवादी पक्षाचीही झाली.बदल प्रक्रियेवर समाजवादी सहसा विश्वास ठेवत नसल्यानं काळाची पाऊलं ओळखून जो बदल अपेक्षित असतो तो त्यांच्याकडूनही झाला नाही.परिणामतः 1996 मध्ये मधु दंडवते याचा पराभव झाल्यानंतर प्रजा समाजवादी पक्ष कोकणातून जवळपास हद्दपार झाला,रायगडात शेकापही तीन तालुक्यापुरता सीमित झाला.सेनेच्या झंझांवातात अंतुले 1996मध्ये कुलाबा मत दार संघातून विजयी जरूर झाले पण 1989ला त्याचं विजयाचं मार्जिन जे सव्वा लाख होतं ते 1996 ला शिवसेनेच्या अनंत तरे यांनी अवघ्या चार हजारावर आणलं होतं.1998 मध्ये तर ते शेकापच्या रामशेठ ठाकूर यांच्याकडून पराभूत झाले आणि 1999मध्ये विजयाची खात्री नसल्यानं त्यांनी थेट औरंगाबाद गाठलं ं.मुख्यमंत्री,अनेकदा आमदार,खासदार राहिलेल्या नेत्याची ही अवस्था केवीलवाणी आणि पक्षाला चिंतन करायला लावणारी होतीे “मात्र असे अनेक पराभव आम्ही पचवले आहेत” अशी शेखी मिरविण्यात आणि आपल्या चुकावर मंडळी धन्यता मानत राहिली..1995 ते 2005 पर्यतचा क ाळ असा होता की,कोकणात सर्वत्र शिवसेनेच्या वाघाच्या डरकाळ्याच दरी-कपारित घुमत होत्या.याच काळात शिवसेना-भाजप युतीची सत्ताही मुंबईत आलेली होती.शिवसेनेच्या यशाचं शिल्पकार असलेल्या कोकणच्या पुत्रालाच म्हणजे मनोहर जोशी यांना िशवसेनेनं मुख्यमंत्री बनविलं होतं.याचा फायदा कोकणाला नक्कीच झाला.युतीच्या याच काळात कोकणातील अनेक बुनियादी प्रश्न मार्गी लागले.अनेक ठिकाणी रस्ते झाले,पुल झाले,शिक्षणाच्या व्यवस्था झाल्या.पर्यटना विकासालाही चालना दिली गेली.पर्यटन असेल किंवा नव्या प्रकल्पांच्या माध्यमातून रोजगार निर्मिती झाल्यानं कोकणी माणसाचं मनिऑर्डरवरील अवलंबित्व काही प्रमाणात का होईना कमी झालं.शेवटच्या टप्प्यात शिवसेनेनं नारायण राणे यांना मुख्यमंत्री केल्यानं तळ कोकणात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं.कोकणात शिवसेनेच्या कार्यकर्त्याची नवी फौज तयार झाली.सत्तेचं विकेर्दीकऱण झालं आणि सामांन्यातला सामांन्य कार्यकर्ताही जिल्हा परिषद सदस्य,आमदार,खासदार झाला.त्यामुळं शिवसेनेची पाळीमुळे कोकणात घट्ट रोवली गेली. हिरवा कोकण पुरता भगवा झाला.स्थानिक स्वराज्य संस्था असतील,सहकारी बॅका असतील किंवा अन्य संस्थामधूनही कॉग्रेस हद्दपार झाली.शिवसेनेचीची सत्ता सर्वत्र दिसू लागली. कॉग्रेसच्या दुदॅवाचे धशावतार इथंच संपत नव्हते.1999मध्ये शरद पवार कॉग्रेसमधून बाहेर पडले.त्यांनी राष्ट्रवादी कॉग्रेसची निर्मिती केली.जी मंडळी कॉग्रेसमध्ये कंटाळली होती पण त्यांना शिवसेना मानवत नव्हती अशा मंडळींना राष्ट्रवादीच्या निमित्त्तानं नव्ं व्यासपीठ मिळालं होतं.गुरूनाथ कुलकर्णी यांच्यासारखे उपेक्षेचे ध नी ठरलेले कॉग्रेसमधील अनेक कार्यकर्ते मग राष्ट्रवादीत गेले अन अगोदरच तोळामासा झालेल्या कॉग्रेसची अवस्था कोमात गेलेल्या रूग्णासारखी झाली.
कॉग्रेसला अनपेक्षित जीवदान
पुढील काळात कॉग्रेसला कोमातून बाहेर काढणाऱ्या दोन घटना घडल्या.पहिली म्हणजे युतीचं सरकार जाऊन राज्यात कॉग्रेस-राष्ट्रवादींचं आघाडी सरकार आलं होतं आणि 2005च्या सुमारास कोकणातील दोन प्रमुख नेते कॉग्रेसमध्ये गेलेे होते.त्यात सिंधुदुर्गातील नारायण राणे शिवसेना प्रमुखंाशी झालेल्या मतभेदांमुळं कॉग्रेसमध्ये गेलेे होते तर पनवेलचे माजी खासदार रामशेठ ठाकूर शेकापतून कॉग्रेसवासी झाले होते.सिंधुदुर्गातली जवळपास आख्खी शिवसेना नारायण राणे यांनी कॉगे्रसमध्ये नेली होती.ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यत सिंधुदुर्गातील सारी पदं मग पुन्हा कॉग्रेसकडं गेली. रत्नागिरीतही चिपळूण आणि दपोली तसेच अन्य ठिकाणीही राणेंमुळं कॉग्रेसचं अस्तित्व जाणवायला लागलं होतं. इकडं रायगडातही रामशेठच्या रूपानं कॉग्रेसला जीवदान मिळालं होतं.सलग बारा वेळा शेकापच्या ताब्यात असलेली पनवेलची विधानसभा प्रथमच प्रशांत ठाकूर यांच्या रूपानं कॉग्रेसला जिंकता आली होती.पनवेल नगरपालिका आणि अनेक ग्रामपंचायती शेकापकडून कॉग्रेसकडं हस्तांतरीत झाल्या होत्या.तथापि हे हस्तांतरण मुळच्या कॉग्रेसवाल्यानं फार मानवलं असं तेव्हाही दिसलं नाही किंवा आजही दिसत नाही.कारण कॉग्रेस असेल,शिवसेना असेल किंवा शेकाप या तीनही पक्षांच्या संस्कृतीमध्ये जमिन अस्मानचा फरक आहे.त्यामुळं शिवसेनेचा रांगडेपणा आणि शेकापचा कडवटपणा कॉग्रेसच्या जुन्या कार्यकर्त्यांना मानवणारा नव्हता.निष्ठावान पण निर्ष्कीय असलेल्या जुन्या कार्यकर्त्यांना होणारं हे आक्रमन सहन करण्याशिवाय काही करताही येत नव्हतं.पक्षातील या नव्या अगंतुकांकडं ते तटस्थतेनं आणि काहीसं संशयानंच पाहात होते.जुने निष्ठावान आणि नव्यानं पक्षात आलेले अशा दोन गटात कोकणातील कॉग्रेस विभागली गेली होती..सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतील पक्षाची सूत्र नारायण राणे यांच्याकडं गेली तर रायगडात कॉग्रेसचं केंद्र अलिबागकडून पनवेलकडं सरकलं.दरम्यानच्या काळात रामशेठ ठाकूर यांनी अंतुलेंशी जमवून घेतल्यानं त्यांची पक्षात हुकूमत सुरू झाली.जिल्हा कॉग्रेसचा अध्यक्ष कोण असेल विधानसभेचे उमेदवार कोण असतील हे रामशेठ ठरवू लागले.नव्यानं पक्षात आलेल्यांना मिळत असलेलं महत्व पाहूून जुने कार्यकर्ते आतल्या आत धुमसत होते.दपक्या आवाजात नाराजीही व्यक्त करीत होते .त्याचा नाही म्हटलं तरी मोठा फटका पुन्हा पक्षालाच बसला.इथं एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की,नारायण राणे असोत किंवा रामशेठ ठाकूर असोत ते कॉग्रेसमध्ये आले होते ते कॉग्रेसचे विचार त्यांना आवडले म्हणून नव्हे.त्यांची काही गणितं होती.काही उद्देश होते,काही मतलबी डावपेच होते.त्यामुळं त्यांनी पक्षात येताच पक्षाची अवस्था आपल्या दावणीला बांधलेल्या बैलासारखी करून टाकली.हायकमांडची मर्जी संपादन केली असल्यानं या मंडळीमुळं कोकणात पक्ष वाढतोय म्हटल्यावर पक्ष श्रेष्टींनीही दोघांनाही मोकळं रान दिलं. त्यामुळं कॉग्रेस म्हणजे आपली खाजगी मालमत्ता असल्याच्या आवेशातच हे नेते वागत राहिले. आपल्या कुटुंबाच्या बाहेर कोणाच्या हिताचा विचार केला पाहिजे हे या नेत्यांना मान्यच नव्हतं.त्यामुळेच निलेश आणि नि तेश हे जेवढे राणेंसाठी संवेदनशील विषय होते तेवढाच प्रशांत ठाकूर हा विषयही रामशेठ यांच्यासाठी जिव्हाळ्याचा होता.आपल्या मुलांच्या उन्नतीसाठीच या दोन्ही नेत्यांनी कॉग्रेसपक्ष वापरला.डॉ.निलेश राणे यांना 2009मध्ये खासदार कऱण्यात आलं.पुन्हा 2014ची उमेदवारी त्यांनाच दिली गेली.ते विजयी झाले असते तर पुन्हा नि तेश आणि स्वतः नारायण राणे विधानसभा लढविणार होते.म्हणजे जिल्हयातील तीनही पदं स्वतः कडं ठेवण्याची राणेंची योजना होती.रामशेठ यांनी प्रशांत ठाकूर यांनाही आमदार केलं होतं.त्यांना मंत्री करावं ही त्यांची अपेक्षा होती.ती सफल झाली नाही म्हणून त्यांचा त्रागा सुरू होता आणि अंतिमता त्यानी पक्ष सोडला.सामांन्य कार्यकर्ता हे सारं पाहात होता..रामशेठ असतील किंवा नारायण राणे याना आपल्या मुलांशिवाय इ तर काहीच आणि कोणीच दिसत नाही अशा स्थितीत आपलं राजकीय भवितव्य काय या जाणिवेनं राणें किंवा ठाकूर यांच्या बरोबर जे नेते कॉग्रेसमध्ये गेलेे होते ते अस्वस्थ होते.नारायण राणे आपलं राजकीय पुनर्वसन करू शकत नाहीत हे देखील त्यांनी ओळखलं होतं.त्यातचं लोकसभेत निलेश राणे यांचा पराभव झाल्यानं राणेंची जिल्हयातील सद्दी आता संपली आणि राणेंच्या बंडाला पक्ष श्रेष्ठींनी काडीचीही किंमत न दिल्यानं पक्षातील त्याचं वजही घटलं हे देखील राणे संमर्थकांच्या लक्षात आलं आणि मग त्यांनी सुरक्षित जागा शोधायला सुरूवात केली.राजन तेली राष्ट्रवादीत गेले.माजी आ.सुभाष बने,गणपत कदम,काका कुडाळकर तसेच गौरीशंकर खोत,रवींद्र फाटक ही मंडली राणेंना सोडून शिवसेनेत गेली.रायगडमधील कॉग्रेसचे एकमेव आमदार असलेले प्रशांत ठाकूरहीे भाजपच्या आश्रयाला गेले.त्यामुळं पनवेलची एकमेव नगरपालिकाही कॉग्रेसच्या हातची गेली. टसधुदुर्गमध्ये नेतृत्व आणि आहे पण कार्यकर्ते नाहीत अशी स्थिती तर रायगडात कॉग्रेसकडं आता नेर्तृत्वच नाही अशी अवस्था. ं रायगड जिल्हा कॉग्रेसचे अध्यक्ष आर.सी घरत याचं नेतृत्व प्रभावहिन आणि दुबळं असल्यानं अलिबाग,पेण,महाड आणि अन्य ठिकाणचे पक्षातील संस्थानिक निरंकुश झाल्याच चित्र ं दिसतंय.अ.र.अंतुले यांनी लोकसभेच्या वेळेस शेकापला आशीर्वाद दिले होते.त्यामुळं आता पक्षातही त्याचं महत्व केवळ मुनलाईटवर जाऊन आशीर्वाद घेण्यापुरतचं शिल्लक आहे.पिरणामतः रा यगड कॉग्रेस पुन्हा एकदा दिशाहिन झाली आहे. रत्नागिरीत पक्षाच्या हातात काहीच नव्हतं तरीही चिपळूणमध्ये तालुका कॉग्रेस अध्यक्ष संदीप सावंत यांच्या विरोधात जुन्या कॉग्रेस जणांनी बंड पुकारल्यानं ति थंही पक्षात दुफळी निर्माण झाली आहे.ती सांधनं आता जिल्हा अध्यक्ष रमेश कीर याच्या हाताबाहेर गेलं आहे.त्यामुळं नेर्तृत्व नसलेली,अतंर्गत गटबाजीनं पोखरलेली कोकणातील कॉग्रेस पुन्हा एकदा 1995 च्या अवस्थेत पोहोचली आहे.
– विधानसभेला सामोरं जाताना…
म हाराष्ट्रात कॉग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात आघाडी झालीच तर कोकणाच्या तीन जिल्हयातील जवळपास आठ ते नऊ जागा कॉग्रेसच्या वाट्याला येतील.त्यात राजापूर,दापोली,कणकवली,कुडाळ या तळकोकणातील मतुार संघाप्रमाणेच रायगडमधील अलिबाग,पेण,पनवेल,आणि महाडची जागा कॉग्रेसला लढवावी लागेेल .2009 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला केवळ पनवेलची प्रशांत ठाकूर यांची आणि खाली नारायण राणे यांचीच जागा जिंकता आली होती.यावेळी भरवश्याची पनवेलची जागाही शक्य नाही.रायगडमध्ये आघाडी झाली नाही तर कॉग्रेसला एकही जागा मिळण्याची शक्यता नाही.अलिबागमध्ये महेंद्र दळवी राष्ट्रवादीकडून इच्छूक आहेत.त्यांना आमदारकी नाही तर जिल्हा परिषद अध्यक्षपद हवंय.हे दोन्ही मिळालं नाही तर ते मधू ठाकूर यांच्या पायात पाय घालणार हे नक्की.पेणमध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार उभा राहिल्यास तेथे शेकापचा विजय होईल.महाडमध्ये माणिक जगताप विजयी होणार नाहीत याची काळजी स्वतः सुनील तटकरेच घेतील अशी वदंता आहे. दापोलीत शिवसेनेचे सूर्यकांत दळवी कोणाची डाळ शिजू देणार नाहीत. कणकवलीत नि तेश राणे यांच्या विरोधात विद्यमान भाजप आमदार प्रमोद जठार याचं कडवं आव्हान आहे.स्वतः नारायण राणें यांची कुडाळमध्ये वैभव नाईकांशी लढाई आहे.2009 मध्ये सारे शिलेदार सोबतीला असताना देखील नारायण राणेंना एकच जागा जिंकता आली.आता हुकमाचे एक्के निघून गेलेत.एकट्या संदेश पारकरांना घेऊन ते ही लढाई जिंकू शकत नाहीत.कोकणातील अनेकांशी बोलल्यानंतर हे स्पष्ट झाली की,स्वतः नारायण राणे तर निवडून येतील पण नि तेशच काही सांगता येत नाही,कारण जनमत आणि परिस्थिती तर त्यांना प्रतिकूल आहेच त्याचबरोबर ज्येष्ठ कॉ्रगेस नेतेही नारायण राणे याचं कोकणात पुन्हा एकदा होणारं पानिपत पाहायला देव पाण्यात बुडवून बसले आहेत.नारायण राणे आता कॉग्रेसचे प्रचार प्रमुख आहेत.त्यामुळं राज्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे.अशा स्थितीत त्यांना कुडाळ आणि कणकवलीसाठी किती वेळ मिळतो हे ही महत्वाचं आहे.अर्ज भरला आणि निघून गेले अशी पूवीर्र् सारखी स्थिती आता नक्कीच नाही.त्यांना दोन्हीकडं तळ ठोकून बसावं लागणार आहे.काऱण ही लढाई त्यांच्या आणि कॉग्रेस पक्षासाठीही अस्तित्वाची लढाई आहे.नारायण राणेंना दगाफटका झाला तर ते पुन्हा आकांडताडव करतील.कदाचित पक्षही सोडतील.सिंधुदुर्गातील कॉग्रेस ही “राणे कॉग्रेसच” असल्यानं ते जोपर्यत कॉग्रेसमध्ये आहेत तोपर्यत तेथे कॉग्रेस आहे ते नसतील तर सिंधुदुर्गात आणि रत्नागिरीतही कॉग्रेस नावालाही शिल्लक असणार नाही.रायगडात थोडी परिस्थिती वेगळी आहे.रायगडात अशी काही घराणी आहेत की,ती तीन-तीन,चार-चार पिढ्या कॉग्रेसशी जोडली गेलेली आहेत.नेते आले गेले पण ही घराणी निष्ठेनं कॉग्रेसला मतदान करीत राहिली.म्हणूनच अंतुले जेव्हा रायगडचं मैदान सोडून औरंगाबादला गेले तेव्हा खोपोलीच्या नगरसेविका असलेल्या पुष्पा साबळे या नवख्या कार्य
कर्तीला 1 लाख 48 हजार मतं मिळाली होती.ही मतं पुप्पा साबळेची नव्हती, कॉग्रेस पक्षाची होती.मात्र ही सुप्त मतं विजयात परावर्तीत करण्यासाठी जे सक्षम नेतृत्व लागतं ते रायगड आणि रत्नागिरी कॉग्रेसकडं नसल्यानं नारायण राणे सोडले तर कोकणातील एकही जागा कॉग्रेसला मिळण्याची शक्यता आज तरी दिसत नाही समजा कॉग्रेस-राष्ट्रवादी आघाडी झालीच नाही तर कोकणातील सर्व मतदार संघात जागा लढविण्यासाठी कॉग्रेसला उमेदवारांची देखील शोधाशोध करावी लागणार आहे.सव्वाशे वर्षांची परंपरा सांगणाऱ्या कॉग्रेससाठी ही नक्कीच लाजीरवाणी स्थिती आहे.अर्थात याला कोकणी माणूस नाही तर पक्ष नेतृत्वच जबाबदार आहे.अंतुलेंसह अनेक नेत्यांनी कोकणातील कॉग्रेसशी दगाफटका केला,हायकमांडनंही सच्च्या आणि निष्टावान कार्यकर्त्यांची उपेक्षा कऱण्याचं व्रत कायम ठेवत रामशेठ साऱख्या बाहेरून येणाऱ्यांना मोठं केलं, कोकणी कार्यकर्त्याला कायम गृहित धरून त्याची सातत्यानं अवहेलना केली गेली , सत्ता असतानाही कॉग्रेसनं कोकणाला विकासाच्या बाबतीत न्याय देण्याची भूमिका पार पाडली नाही त्यामुळंच कोकणच्या या समृध्द भूमित अगोदर डावा आणि समाजवादी विचार रूजला आणि नंतर शिवसेनेच्या रूपानं कोकणानं दुसऱ्या टोकाच्या विचाराची कास धरली.विचारांची मधली जी स्पेश होती ती कॉग्रेसला कधी भरूनच काढता आली नाही.त्याची फळं कॉग्रेसला भोगावी लागली आहेत आणि यापुढंही भोगावी लागतील हे नक्की.
(या लेखाची कॉपी आपणास http://smdeshmukh.blogspot.in/2014/09/blog-post_19.html येथून करता येईल.)
एस.एम.देशमुख