केरळचा पत्रकार ‘आयसिस’चा दहशतवादी?

0
783

तिरुअनंतरपुरम

केरळमधील स्थानिक मल्याळम दैनिकात वर्षभरापूर्वी काम करणारा एक २४ वर्षीय पत्रकार ‘आयसिस’ या दहशतवादी संघटनेत सहभागी झाल्याचे खळबळजनक वृत्त आहे.

केरळमधील पालाक्कड जिल्ह्यातून प्रकाशित होणाऱ्या दैनिकात हा पत्रकार काम करत होता. ही नोकरी सोडून त्याने आधी आखाती देशात नोकरी केली त्यानंतर आता सीरिया गाठून तो ‘आयसिस’साठी काम करतोय, अशी माहिती पुढे आली आहे. ‘आयसिस’साठी केरळमध्ये भरती होत असल्याची खबर केंद्रीय गुप्तचर विभागाने (आयबी) केरळच्या गृह मंत्रालयाला आधीच दिली होती. त्यातच दिल्लीत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत केंद्रीय गृह मंत्रालयाने केरळच्या पोलीस महासंचालकांना केरळचा पत्रकार आता ‘आयसिस’साठी काम करत आहे, अशी माहिती दिली आहे. केरळमधील ‘मल्याळम मनोरमा’ या दैनिकाच्या वेबसाइटने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.

या पत्रकाराचे नाव अद्याप उघड करण्यात आलेले नाही. गेल्या वर्षभरापासून हा पत्रकार ‘आयसिस’च्या प्रभावाखाली होता. याबाबत तो घरातही सातत्याने बोलायचा. आपला मुलगा आयसिसकडे झुकतोय हे लक्षात आल्याने वडील चिंताग्रस्त होते. त्यांनी अनेकदा त्याचे मन वळवण्याचा प्रयत्न केला मात्र वडलांचं म्हणणं झुगारून या पत्रकाराने ‘आयसिस’ची वाट धरलीच. सर्वात आधी त्याने आखाती देशात आपल्याला नोकरी देण्याची गळ ‘आयसिस’ला घातली. नोकरीच्या निमित्ताने तो आखातात पोहोचला आणि मग तिथून काही महिन्यांनी त्याला सीरियात नेण्याची व्यवस्था करण्यात आली. हा सगळा प्रकार आठ महिन्यांपूर्वीचा आहे. आयबी या प्रकरणात कसोशीने तपास करत आहे, असे ‘वनइंडिया’ने आपल्या वृत्तात म्हटले आहे.

दरम्यान, गेल्यावर्षी किमान १३ भारतीय तरुण ‘आयसिस’मध्ये सहभागी झाले. त्यातील ६ जण मारले गेले असून ७ जण आजही या दहशतवादी संघटनेसाठी काम करत आहेत. कल्याण, तेलंगण आणि बंगळुरू या ठिकाणच्या तरुणांचा यात समावेश आहे. जो केरळचा पत्रकार ‘आयसिस’मध्ये सहभागी झालाय तो जिवंत आहे की नाही, याबाबतही कोणतीही माहिती गुप्तचर यंत्रणांना नाही(
मटा ऑनलाइन वृत्त )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here