कालचा दिवस सार्थकी लागला..

0
827

कालचा दिवस प्रचंड दगदगीचा गेला.मुख्यमंत्र्यांची विधान भवनात भेट घेतली.पेन्शनचा विषय याच अधिवेशनात मार्गी लावण्याचं अभिवचन मुख्यमंत्र्यांनी दिलंय.राज्यात दर चार दिवसाला एका पत्रकारावर हल्ला होत आहे त्यामुळं पत्रकार संरक्षण कायद्याचा विषय देखील तेवढाच महत्वाचा असून कायदा देखील याच अधिवेशनात झाला पाहिजे असं आग्रही प्रतिपादन मी केलं.त्यावरही मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतली.ज्या पत्रकारांचं वय पन्नास आहे आणि ज्यांचा अनुभव वीस वर्षाचा आहे अशा पत्रकारांना तातडीने ज्येष्ठ पत्रकार म्हणून अधिस्वीकृती पत्रिका मिळाली पाहिजे हा मुद्दाही मांडला.तो देखील मुख्यमंत्र्यांनी मान्य केला.शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधीत एकीकडं लाखो रूपये पडून आहेत आणि दुसरीकडे त्याचा लाभ केवळ साडेतीन टक्के पत्रकारांनाच होता हा दुजाभाव मुख्यमंत्र्यांच्या नजरेस आणून देत सर्वच पत्रकारांना या योजनेचा लाभ मिळावा अशी विनंती केली.त्याच बरोबर सरकारी यादीत असलेल्या 22 आजारांपैकी जर एखादा आजार असेल तर अशाच पत्रकाराला मदत मिळते हे बंद करून सर्वच आजारांना मदत मिळाली पाहिजे ही मागणी देखील आम्ही केली आणि तसा बदल करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.येत्या काही दिवसात या संबंधीचे जीआर निघतली अशी अपेक्षा आहे.नाहीच निघाले तर आपली लढाई चालूच राहणार आहे.अधिवेशन काळात पेन्शनचा विषय सुटला नाही तर हिमाचल प्रदेशच्या धर्तीवर आपण न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे.

मुख्यमंत्र्यांची भेट झाल्यानंतर आम्ही विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना भेटलो.त्यांनी सांगितले ,तुमच्या एसएमएसनं माझा फोन हँग झाला आहे.(  तुमच्या एस एम एसमुळं माझा फोन बंद पडला हे मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं) तुमच्या मागण्या रास्त असून विधानसभेत मी हा प्रश्‍न उपस्थित करणार आहे.एकनाथ शिंदे आणि डावखरे यांचीही भेट घेऊन आपणही पत्रकारांच्या मागण्यांसाठी सहकार्य करावे अशी विनंती त्यांना केली.त्यानंतर आम्ही महासंचालक श्री .चंद्रशेखर ओक यांना भेटलो.माहिती आणि जनसंपर्क विभागाला बद्दल आमचे अनेक आक्षेप आहेत.हा विभाग पत्रकार आणि सरकार मधील दुवा असतो मात्र विभाग ती भूमिका प्रामाणिकपणे पार पाडत नाही अशी राज्यातील पत्रकारींची तक्रार आहे .पत्रकारांचे अनेक प्रश्‍न विभागातच लटकविले जातात.त्याला पुढं जाऊ दिलं जात नाही.पत्रकार हल्ला कायद्याचा जो मसुदा तयार करण्यात आला आहे त्याला हरकती आणि दुरुस्त्या आम्ही सुचविल्या.त्या मिळाल्याचे निरोपही आम्हाला मिळाले पण काल आम्हाला असं सांगितलं गेलं की,तुमच्या हरकती मिळाल्याच नाहीत.हे सारं नजरचुकीनं होतंय असं दिसत नाही.जाणीवपूर्वक हे होतंय असंच म्हणावं लागेल.कायद्याचा जो मसुदा मराठीत तयार केला गेलाय तो देखील समिती किंवा परिषदेला पाठविला गेला नाही.काल एक अधिकारी सांगत होते मसुदा पाठविलाय दुसरे सांगत होते पाठविला नाही आता पाठवितो.पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती असेल किंवा मराठी पत्रकार परिषद असेल पत्रकारांच्या हक्कासाठी आपलं सर्वस्व पणाला लाऊन लढत आहे.त्यामुळं हे राजकारण अथवा आमच्याबाबतीत केला जाणारा हा दुजाभाव यापुढे खपवून घेतला जाणार नाही.आम्ही सभ्यपणान वागतो म्हणजे कुणाला तरी भितो अशा भ्रमात कुणी राहू नये ही विनंती आम्ही संबंधित अधिकार्‍यांना करीत आहोत.तुम्हाला राजकारण करायचंय तुमचं तुम्ही आपसात करीत राहा आमच्या वाटेला जाऊ नका हे पुन्हा एकदा आम्ही निक्षूण सांगू इच्छितो.

अधिस्वीकृती समितीनं एखादा ठराव घेतल्यानंतर त्याचा जीआर निघेल हे पाहण्याची जबाबदारी समितीची नाही तर या विभागाची आहे.मात्र पाहिजे तसा फॉलोअप घेतला जात नाही.या सर्व बाबी आम्ही श्री.ओक यांच्या नजरेस आणून दिल्या.त्यातील अनेक विषय त्यांच्यापर्यतंही  पोहचूच दिले जात नाहीत हे त्यांच्याशी चर्चा करताना लक्षात आले.मात्र ते स्वतः पत्रकारांच्या प्रश्‍नांबद्दल सकारात्मक दिसले.एक चांगला आणि सकारात्मक भूमिका घेणारा अधिकारी अशी आमच्या मनातील त्यांची प्रतिमा आहे.मात्र माहिती आणि जनसंपर्कमधील दलदलीत ते अडकून पडले आहेत.विभागातील घाणेरड्या राजकारणात ते अडकले आहेत .  विभाग प्रमुख म्हणून सारी जबाबदारी त्यांना स्वीकारावी लागते. आपले विषय मार्गी लावण्याचे आश्‍वासन त्यांनीही दिले.

 या सर्व गडबडीत मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे प्रमुख ओमप्रकाश शेटे यांचीही भेट घेतली.शिवाजी क्षीरसागर आणि अन्य सात-आठ आजारी पत्रकारांना मदत मिळवून देण्यासाठी त्यांनी सहकार्य केलेले आहे.तसेच राज्यातील हजारो गरजू लोकांना सकारात्मक भूमिकेतून त्यांनी आर्थिक मदतीचा हात दिला आहे.सामाजिक बांधिलकी जपणारा,गरिबांबद्दल कणव असणारा अधिकारी ही त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे.आम्ही त्यांच्याकडं असताना एक अपंग तरूण त्यांच्याकडं आला.बहिणीला  कॅन्सर झालाय मदत हवीय.असं तो सांगत होता.हतबलपणे रडतही होता.शेटे म्हणाले,”रडणं थांबव अन्यथा मी रडायला लागेल”त्यांनी लगेच फोनाफोनी करून त्या तरूणाच्या बहिणीच्या उपचाराची व्यवस्था केली.दुसर्‍यांच दुःख पाहून ही संवेदनशीलता जपणारा अधिकारी मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर आहे यावर विश्‍वास बसत नाही.मी मुंबईस गेलो की,मुद्दाम त्यांना भेटतो.त्यांना भेटलो की,नवी उर्जा मिळते,.

रायगड प्रेस क्लबचा कार्यक्रम 2 एप्रिल रोजी पनवेलला आहे.त्यासाठी देखील एकनाथ शिंदे यांना भेटलो.तसेच आचार्य अत्रे युवा संपादक पुरस्कार स्वीकारावा म्हणून जय महाराष्ट्रचे कार्यकारी संपादक प्रसन्न जोशी यांना बोललो 17 एप्रिल रोजी पुणे जिल्हा पत्रकार संघाचं अधिवेशन हडपसरला होत आहे.या कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांनी यावं अशी आग्रही विनंती आम्ही मुख्यमंत्र्यांना केली आणि त्यांनी ती मान्यही केली.त्यामुळं या अधिवेशन  अधिवेशनाचं उद्धघाटन आता मुख्यमंत्री करतील.

मुंबईला जाताना नेहमी घरून डबा घेऊनच जातो.एस.टी.त किंवा परिषदेच्या ऑफीसमध्ये डबा खाऊन पुढील कामाला लागतो.काल डबा घेतला नव्हता.मुबईत गेल्यावर लगेच धावपळ सुरू झाली. सार्‍या गडबडीत दिवसभर जेवायचं विसरून गेलो.रोजची गोळीही घेतली नाही.त्याचा फटका बसला .काल दुपारपासूनच घसा बसलाय.आता बोलायलाही त्रास होतोय. अंगात कणकण आज दिवसभर फोन बंद करून मस्त झोप मारली

अर्थात  हे सारं असलं तरी आपलं कालचं आंदोलन सार्थकी लागल्याचा आनंद नक्कीच आहे.त्याचं सारं श्रेय अर्थातच राज्यातील पत्रकार मित्रांना आहे.आम्ही आवाहन केल्यानंतर पंधरा हजार एसएमएस पाठविले गेले.त्याचा एक दबाव सरकारवर आला.125 आमदारांची पत्रे जमा करणे हे काम वाटते तेवढे सोपे नाही.ते  गावोगावच्या सहकार्‍यांनी केले त्याबद्दल अशा सर्व मित्रांना मनापासून धन्यवाद.आमदारांचेही आभार .किरण नाईक यांचेही मला विशेष आभार मानावे लागतील.त्यानी मुख्यमंत्र्यांच्या भेटीची सारी व्यवस्था केली.त्यामुळं अनेक गोष्टी साध्य झाल्या.काल मिलिंद अष्टीवकर,संतोष पवार,शरद पाबळे,बापूसाहेब गोरे,हरिष पाटणे,सुनील वाळूंज,संजय पितळे,दिलीप शिंदे,विनोद जगदाळे,हेमंत बिर्जे,कमलेश सुतार,राहूल लोंढे,शशिकांत सांडभोर,विकास मिरगणे हे आणि इतर अनेक पत्रकार मित्र माझ्या बरोबर होते.मुख्यमंत्र्यांच्या भेटीच्या वेळेस विधीमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष अरविंद भानुशाली उपस्थित होते.या सर्वामुळे  मला हजार हत्तीचं बळ प्राप्त झालं.या सर्वांचा मी आभारी आहे .

मात्र ऐनवेळी भेटीच्या वेळेत बदल झाल्यानं आणि केवळ चौघांनाच पास देणार अशी आडमुठी भूमिका काही CMO तील अधिकार्‍यांनी घेतल्यानं पालघरचे संजय जोशी,तसेच रायगडचे संतोष पेरणे,दादा दांडकर यांना बरोबर घेता आलं नाही त्याबद्दल मी या सर्वांची क्षमा मागतो.ते अडचण समजून घेतील अशी अपेक्षा आहे.

पुनश्‍च सर्वाचें आभार.

 एस.एम.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here