———————————————-
कवतूक तर लई झालं , आता तरी थांबा साहेब!
———————————————-
दिल्लीत झालं,अन गल्लीतही झालं
कवतूक तर लई झालं,
हे सारं आता थांबवा साहेब,
अन आमच्या गळ्याभोवती आवळलेल्या
फासाची गाठ जरा सोडवा साहेब!
सत्कार-बित्कार बस झाले,
आता बात थोडी दुष्काळाची काढू
शेतकरी पिचलाय साहेब,
त्याला नका असं वार्यावर सोडू!
सत्ता गेल्याचा राग
आमच्यावर नका काढू साहेब
कवतूक तर लई झालं, आता तरी थांबा साहेब
‘जाणते राजे’ आहात आपण
असा ‘अजाणतेपणा’ करू नका
दुष्काळग्रस्तांच्या दुःखावर
मीठ असं चोळू नका,
पंच्च्याहत्तरीचं काय ? ती तर आमच्या
‘बा’ नं बी गाठली आहे
म्हातार्याची तडफड आता तरी समजून घ्या साहेब
कवतूक तर लई झालं, आता तरी थांबा साहेब
सत्तेवर जरी नसाल आपण,
पण सत्तेपासून दूर ही तर नाहीत,
मोदी,फडणवीस आपल्यासाठी मित्रापेक्षा कमी ही नाहीत
त्यांच्या कानात आमच्यासाठी चार शव्द सांगा साहेब,
अन कवतूक तर लई झालं, आता तरी थांबा साहेब,
आयपीएलनं आपणास
‘खूप काही’ दिलंही असेल
पण आम्हीही आपणासाठी
कमी खपलो नाहीत साहेब
त्या मिठाला तरी जागा साहेब,
अन थोडा मलम आमच्या जखमांवर ही लावा साहेब
कवतूक तर लई झालं, आता तरी थांबा साहेब
आता तरी थांबा साहेब
सूर्या देवडीकर