रायगडमध्ये अलिबाग आणि पेणमध्ये काल माझे सत्कार झाले.रायगड जिल्हयाचा सत्कार पेणमध्ये झाला.अलिबाग माझी कर्मभूमी असल्यानं तिथल्या पत्रकारांनी हक्कानं अलिबागमध्येच सत्कार घेतला.माझ्या कर्मभूमीतले दोन्ही सत्कार प्रेम,आपलेपणाने ओतप्रोत भरलेले होते..रायगड आणि कोकणच्या पत्रकारांनी नेहमीच मला साथ दिली.मी हाक द्यायची आणि त्यांनी कोणतेही आढेवेढे न घेता रस्तयावर यायचं हे गेली वीस वर्षे सुरू आहे.काही पत्रकार निवृत्त झाले,नव्या दमाचे तरूण पत्रकार आले तरी परस्पर जिव्हाळ्याचं हे नातं कमी झालं नाही.तोच विश्‍वास,तोच आपलेपणा   आजही कायम  आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं आंदोलन असो,सेझ विरूध्दचा लढा असो,शेतकर्‍यांच्या हक्कसाठीची आंदोलनं असोत,की सामाजिक बहिष्काराच्या विरोधातली  लढाई असो या सर्व लढ्यात रायगडमधील पत्रकार उतरले आणि हे लढे त्यांनी यशस्वी करून दाखविले.अभेद्य एकजूट.परस्पर विश्‍वास,एकमेकांप्रती आदर आणि – स्नेहभावामुळं  रायगडच्या पत्रकारांनी हाती घेतलेले प्रत्येक विषय तडीस नेण्यास त्यांना यश आलं.दोन पत्रकार कधी एकत्र येत नाहीत हा राजकारण्यानी निर्माण करून दिलेला समज खोटा ठरविण्याच्या पहिला प्रयत्न रायगडमधील पत्रकारांनी केला आणि नंतर राज्यानं हा रायगड पॅटर्न अंगिकारला.जिल्हयातील पत्रकार एका कुटुंबाच्या भावनेनं वागतात हे अनेक प्रसंगी दिसून आलं.कोणी आजारी असेल,एखादा पत्रकार निधन पावला असेल तर सारा रायगड त्याच्या मदतीला धावून जातोआणि जिल्हयातील कोणताही पत्रकार आता एकटा किंवा एकाकी नाही,आम्ही सारे परस्परांबरोबर आहोत या जाणिवेतून मदत केली जाते. त्याची अनेक उदाहरणं मी देऊ शकेल.पत्रकार संरक्षण कायद्यासाठीच्या लढयात रायगडमधील पत्रकार याच निर्धारानं उतरले.एक-दोन नव्हे तर तब्बल बारा वर्षे त्यांनी मला तन-मन-धनाने साथ दिली.या लढयात केवळ रायगडच नव्हे तर सारा महाराष्ट्र होता हे खरंच पण मुंबईला जवळ असल्यानं मी रायगड मधील पत्रकारांना जास्त त्रास दिला,वारंवार त्रास दिला.हे मला आज येथे मान्य करावंच लागेल.मात्र त्याबद्दल कोणीही कधीही तक्रार केली नाही.कारण ही सारी मंडळी माझ्यावर जिवापाड प्रेम करते.त्यामुळंच मला असं वाटतं की,काल रायगडमध्ये झालेले दोन्ही सत्कार माझ्या घरचे होते.कुटुंबानं आपल्याच घरच्या माणसाचा केलेला हा सत्कार होता.हा सत्कार परस्पर विश्‍वास आणि प्रेमाचं प्रतिक होता या सार्‍या कारणांनीच अलिबाग-पेणच्या सत्काराचं मला विशेष अप्रूप होतं.प्रकाश,राजन,हर्षद,मिलिंद,विजय,संतोष,अभय,विजय मोकल,देवा,संतोष पेरणे,शशी सावंत  या सर्व तरुण पत्रकार मित्रांनी माझ्याबद्दल ज्या भावना व्यक्त केल्या ते ऐकताना  डोळ्याच्या कडा आपोआपा ओलावल्या.  किरण नाईकांची अवस्था यापेक्षा वेगळी नव्हती..वाटलं माझ्यावर आगपाखड करणारे तिथं उपस्थित पाहिजे होते,सारा  माहोल पाहून ते नक्कीच खाक झाले असते,उठून निघून गेले असते. मी भाग्यवान खराच की,राज्यातील पत्रकारांचं प्रचंड प्रेम मिळालं. राज्यातील अनेक पत्रकारांच्या आयुष्याची,करिअरची राखरांगोळी करणार्‍यांना या प्रेमाचा अर्थ नक्कीच कळणार नाही.

रायगड,अलिबागच्या पत्रकार मित्रांंनो,मी तुम्हा सर्वाचा मनापासून आभारी आहे.–SM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here