तंटा आणि मनोमीलनाचा अन्वयार्थ 

0
1014

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या घरातील तंटा मिटला आहे.शरद पवार यांच्या साक्षीनं ‘भरत भेटी’चा प्रसंग साजरा झाला.त्याच्या बातम्यांना ठळक आणि सचित्र प्रसिध्दी मिळाली.तटकरे यांचं कुटुंबीय राजकारणी असल्यानं  या मनोमीलनाच्या बातमीला नक्कीच बातमीमूल्य आहे.परंतू ज्या पध्दतीनं या मनोमीलनाचा प्रचार सुरू आहे ते बघता मनोमिलनाची घटना देखील प्रचाराचा भाग बनवली गेली आहे असं म्हणायला जागा आहे .नगरपालिका निवडणुकीत रायगडमध्ये पक्षाची मोठी पडझड झाली.खुद्द रोह्यात सुनील तटकरेंचे उमेदवार संतोष पोटफोडे केवळ सहा मतांच्या फरकानं विजयी झाले.दोन नगरपालिका पक्षाला गमवाव्या लागल्या.राज्यभर ज्या पध्दतीनं पक्षाचा डोलारा ढासळतो आहे त्याच पध्दतीनं रायगडातही पक्षाला फटका बसलेला आहे.मात्र जिल्हयात  भास असा निर्माण केला जातो आहे की,’दोन भाऊ विभक्त झाल्यानं पक्षाचं नुकसान झालं तसं घडलं नसतं तर दोन नगरपालिकाही गेल्या नसत्या अथवा रोह्यासाठीही झुंज करावी लागली नसती’.जिल्हा परिषद निवडणुकांच्या तोंडावर आम्ही एकत्र आलोत आता इतरांची खैर नाही असाही आभास या प्रचारातून केला जात आहे.रायगडच्या बाहेरच्या वाचकांचा या प्रचारतंत्रावर विश्‍वासही बसू शकतो.मात्र तशी खरंच स्थिती आहे काय ? नक्कीच नाही.रायगडवासियांनाही त्याची कल्पना आहे.सुनील तटकरे आणि अनिल तटकरे एकत्र असते किंवा रोहयात सुनील तटकरे यांचे पुतणे उभे नसते तरी  सारं सुरळीत घडलं असतं काय ? या प्रश्‍नाचं उत्तरही  नकारार्थी द्यावं लागेल.तटकरे कुटुंबात अनेक मुद्यांवर जरूर मतभेद आहेत पण सारेच राजकारणी असल्यानं मतभेदही कोणत्या टोकापर्यंत ताणायचे हे सार्‍यांनाच माहिती असल्याने नगरपालिकेच्या वेळेस जे काही घडले ती तटकरे कुटुंबाची एक राजकीय खेळी होती असं तेव्हा आणि आजही रायगडात बोललं जातंय.रोहयाच्या नगराध्यक्षपदासाठी तटकरे कुटुंबातील कोणतीही व्यक्ती उभी राहिली असती  तरी पराभव नक्की होता हे तटकरे कुटुंबीय जाणून होते.समीर शेडगे यांना डावलणे तटकरे यांना परवडणारे नव्हते.त्यामुळं आपल्या घरातीलच एक व्यक्ती शिवसेनेत पाठवायचा,त्याला सेनेचे उमेदवारी मिळवून द्यायची आणि समीर शेंडगेच्या मतांना सुरूंग लावायचा अशी व्यूहरचा ठरली होती असं बोललं जातंय.या चर्चेला आधार आहे तो लोकसभा निवडणुकांचा.लोकसभा निवडणुकीत शेकापची मतं कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांच्याकडं जाता कामा नयेत,ती शेकापलाच पडावीत आणि वाया जावीत यासाठी सुनील तटकरेंचे रत्नागिरी जिल्हयातील कट्टर समर्थक रमेश कदम यांना शेकापमध्ये पाठविले गेले.ते रायगडची निवडणूक शेकापच्या तिकिटावर लढले.जवळपास सव्वालाख मतं तेव्हा त्यांनी घेतली.त्यामुळं अगदीच निसटत्या म्हणजे जेमतेम दोन हजार मतांनी तटकरे यांचा पराभव झाला.निवडणुका होताच काही दिवसात रमेश कदम परत राष्ट्रवादीत गेले.त्यांनी केलेल्या या ‘त्यागाचं’ फळ म्हणून जनाधार नसलेल्या रमेश कदम याचं महत्व रत्नागिरीत वाढविलं गेलं.भास्कर जाधव यांना शह देण्यासाठी त्यांचा वापर केला गेला.आता हे रमेश कदम भाजपमध्ये गेले आहेत.लोकसभेतला हाच प्रयोग तटकरे यांनी नगरपालिकेत केला असा दढ समज रायगडमध्ये लोकांचा आहे.  समीर शेडगे  यांच्या मतांचं विभाजन व्हावं यासाठी संदीप तटकरे यांना सेनेत पाठविले गेले,त्यांनी समीर शेंडगेचे  मते सहज ढापली  आणि सुनील तटकरेंचे उमेदवार संतोष पोटफोडे सहा मतांनी का होईना विजयी झाले.असं राजकारण तटकरे खेळले नसते तर संतोष पोटफोडे यांचा पराभव काळ्या दगडावरची रेघ होती .कारण सार्‍या क्लुप्त्या लढवूनही तटकरेंच्या उमेदवाराचा निसटता विजय झालेला आहे याकडं राजकीय निरिक्षकांना तरी दुर्लक्ष करता येणार नाही.नगराध्यक्षपद जिंकायचं होतं ते तटकरे यानी  या ना त्या मार्गानं जिंकलं.त्याबद्दल  सुनील तटकरे नक्कीच अभिनंदनास पात्र आहेत.मात्र आम्ही एकत्र आल्यानं जिल्हयात पक्षाची ताकद वाढली म्हणून जे ढोल पिटले जात आहेत ते काही खरं नाही.कारण मुळात सुनील तटकरे म्हणजेच जिल्हयातील राष्ट्रवादी आहे.सुनील तटकरे जर वगळले तर राष्ट्रवादी शून्य आहे.अनिल तटकरे असतील किंवा आ.अवधूत तटकरे असतील यांच्या स्वभावामुळं बहुतेकजण त्यांच्यापासून फटकुन असतात.त्यामुळं अनिल तटकरे किंवा त्यांचे पुत्र अवधुत तटकरे यांचा जिल्हयात स्वतंत्र गट नाही.तसा तो त्यांना निर्माणही करता आलेला नाही.एक ा अपक्ष उमदेवाराच्या विरोधात संदीप तटकरे तिसर्‍या स्थानावर फेकले गेले यावरून हे स्पष्ट दिसते.त्यामुळं सारे तटकरे एकत्र झाल्यानं पक्षाची ताकद वगैरे वाढली हे असत्य आहे.

अनुत्तरीत प्रश्‍न

सुनील तटकरे यांच्या कुटुंबात झालेला कथित तंटा आणि नंतर झालेलं मनोमीलन या दोनच बातम्या लोकांपर्यंत पोहोचल्या.तंटा झालाच असेल तर तो कश्यामुळं झाला ? हे जसं लोकांना कळलेलं नाही तव्दतच मनोमीलन झालं असेल तर त्यासाठी तडजोडीचं कोणतं सूत्र वापरलं गेलं ? हे देखील पल्बिकला कळलेलं नाही.त्यामुळं अनेक प्रश्‍नांची चर्चा जिल्हयात आहे.श्रीवर्धनची उमेदवारी अवधूत तटकरेंना परत मिळणार आहे की नाही?,स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून पुन्हा अनिल तटकरेंना उमेदवारी दिली जाणार आहे की नाही?,श्रीवर्धन मधून जर पुन्हा अवधूत तटकरे उभे राहणार असतील तर मग सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे याचं काय ? त्यांना जिल्हा परिषदेसाठी उभं करून जिल्हा परिषद अध्यक्ष केलं जाणार असेल तर मग शुभदा तटकरे यांना कोणतं पद मिळणार आहे ? नगरपालिका निवडणूक लढवून पराभूत झालेले संदीप तटकरे यांचं राजकीय पुनर्वसन कसं केलं जाणार आहे ? हे सारे प्रश्‍न अनुत्तरीतच आहेत.स्वतः तटकरे यांनी असं सांगितलंय की,कुटुंबातील राजकीय निर्णय मीच घेणार आहे.ते खरं असेल तर मग ते जे निर्णय घेतील ते अनिल तटकरे यांना मान्य होणारे असतील काय ? हा देखील प्रश्‍न आहे.अन ते मान्य नसतील तर मग अनिल तटकरेंसमोर दुसरा कोणता मार्ग शिल्लक राहणार आहे? .अनिल तटकरेंनी एकदा शिवसेनेला ठेंगा दाखविल्याने पुन्हा पक्षात त्यांच्यावर अन्याय झाला तरी त्यांच्यावर दुसरा कोणताही पक्ष पुन्हा विश्‍वास ठेवणार नाही,त्यामुळं त्यांच्या राजकीय प्रवासाचाच मार्ग अधिक अडचणीचा ठरू शकणार आहे.या सार्‍या प्रश्‍नांची उत्तरं कोणतेच तटकरे देत नसले तरी येता काळच त्याची उत्तरं देणार आहे.

सुनील तटकरे यांच्यासमोरील आव्हानं

सुनील तटकरे यांच्यासमोर आता दुहेरी आव्हानं आहेत.घरातील तरूण पिढीच्या अपेक्षा पूर्ण करणे आणि क्रमशः जिल्हयात आणि कोकणात शक्तीहिन होत असलेल्या पक्षाला सावरणं.हे काम वाटतं तेवढं सोपं राहिलेलं नाही.अगदीच वाताहत व्हायला नको म्हणून त्यांनी शेकापं बरोबर युती केली असली तरी नगरपालिका निवडणुकीत या युतीचा शेकापला किंवा राष्ट्रवादीला फार फायदा झाल्याचं चित्रं दिसत नाही.तसं नसतं तर रोह्यात एका अपक्ष उमेदवारानं राष्ट्रवादीला फेस आणला नसता.दोन नगरपालिकाही ताब्यातून गेल्या नसत्या.काल पर्यंत परस्परांची वस्त्रहरण करणारे सुनील तटकरे आणि शेकापचे जयंत पाटील आज गळ्यात गळे घालताना पाहून एकूण राजकारण्यांवरचाच लोकांचा विश्‍वास उडालेला आहे.त्यामुळं संधीसाधूंच्या या युतीला जिल्हयातील मतदारांनी मोठ्या प्रमाणात नाकारलेलं आहे.शेकापं अलिबाग पुरता राहिला आणि चौथ्या स्थानावर फेकला गेला.शिवसेनेने नंबर एक स्थान पटकावले.तटकरे आणि जयंत पाटील यांच्यासाठी नगरपालिका निकाल अनपेक्षित लागल्यानं ते पुरते धास्तावले आहेत म्हणूनच आपल्या आघाडीत कॉग्रेसनं यावं अशी आर्त हाक जयंत पाटील द्यायला लागले आहेत.गेली पन्नास वर्षे कॉग्रेस आणि शेकापचं जिल्हयात षडाष्टक आहे.ते विसरून जयंत पाटील ‘कॉग्रेससाठी आपण एक पाऊल मागं जायला तयार आहोत’ असं बोलत आहेत त्यातून त्यांची अगतिकताच दिसत आहे.कॉग्रेस मात्र जयंत पाटील याचं आवतणं स्वीकारणयच्या मनःस्थितीत नाही.चर्चा अशी आहे की,मुरूड,अलिबाग ,पेण मध्ये शिवसेना,कॉग्रेस ,भाजप अशी युती होऊ घातली आहे.असं झालं तर सुनील तटकरे आणि जयंत पाटील यांचया स्वप्नाचं सारे इमले धडाधड कोसळणार आहेत.जनमत शिवसेनेच्या बाजुनं आहे.मात्र नेते कमी पडतात हे नगरपालिकेच्या वेळेस दिसून आले.राष्टवादीतून शिवसेनेत आलेल्या काही नेत्यांनी रोहयात जो प्रयोग केला तो शिवसेनेची वैचारिक दिवाळखोरी जाहीर करणारा होता.तटकरेंच्या घरात आपण फूट पाडतोय असा आभास निर्माण करणार्‍यांना लोकसभेच्या वेळेस तटकरे जो गेम खेळले होते त्याचंही स्मरण राहिलं नाही.त्यानी संदीप ऐवजी समीर शेडगे यांना उमेदवारी दिली असती तर आज रोह्यावर भगवा फडकला असता.शिवसेनेच्या चुकीच्या डावपेचाचा फायदा तटकरे याना झाला आहे.तशी चूक आता किमान जिल्हा परिषदेत तरी होणार नाही याची काळजी शिवसेनेने घेणे गरजेेचे आहे.समोर सुनील तटकरे आहेत आणि त्याचे  राजकीय चातुर्य शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांच्या शंभर पटीनं जास्तीचं आहे हे त्यांना विसरून चालणार नाही.थोडी सावधानता बाळगली तर यावेळेस शिवतीर्थावर भगवा फडकविण्याची सेनेला संधी आहे.मग शेकाप राष्ट्रवादी एकत्र आले तरी किंवा तटकरे कुटुंबात मनोमिलन झालं तरी फार फरक पडणार नाही.

एस.एम.देशमुख 

या लेखाची कॉपी आपणास खालील लिंकवर जाऊन करता येईल.ttp://smdeshmukh.blogspot.in/2017/01/blog-post_22.html

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here