कथा एका असहाय्य पत्रकाराची

0
1003

जीवनात दुःखाचे वेगवेगळे रंग अनुभवलेत,पाहिलेत.मात्र दुःखाची जीवघेणी तर्‍हा पाहून आज ज्या पध्दतीनं व्याकुळ झालो तसा अनुभव पुर्वी कधी घेतला नव्हता.एक तीस-पस्तीस वर्षाचा तरूण पत्रकार.अगदी एक महिन्यापर्यत सामांन्य जीवन जगत होता.दैनिकाकडं बातम्यांचा रतीब घालणं,जाहिरातीसाठी भटकणं,पत्रकार परिषदाना उपस्थित राहणं हे सारं काही सुरळीत सुरू  होतं.मग एक दिवस अचानक ताप भरला. सारेच पत्रकार ज्या पध्दतीनं दुखणं अंगावर काढतात त्या पध्दतीनं शिवाजीनंही “व्हायरल'” असेल म्हणून दुर्लक्ष केलं.चार दिवस झाले,गोळ्या खावूनही ताप कमी होत नाही म्हटल्यावर उपचार सुरू झाले.थकवा येत होता,प्लेटलेट कमी झाल्या होत्या.बहुदा परभणीच्या डॉक्टरांना संशय आला असावा.डॉक्टरांनी शिवाजीला अधिक तपासण्यासाठी आरंगाबादला जायला सांगितलं.तिथं गेल्यानंतर आजाराचं निदान झालं.पुढील उपचारासाठी मुंबईला टाटाला जाण्याचा सल्ला औरंगाबादच्या डोॅक्टरांनी दिला.”टाटाला जा” एवढा इशारा  पुरेसां होता.या धक्क्यानं घर कोसळून पडलं .शिवाजीचं कुटुंब परभणी जिल्हयातील सोनपेठ तालुक्यातलं..शिवाजी हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा.घरी अठरविश्‍वे दारिद्रय.गावाकडं आई-वडिल मोल मजुरी करून राहात होते तर शिवाजीचा संसार देशोन्नतीच्या नोकरीवर सुरू होता.त्यातच हे संकट.सारेच हवालदिल झाले,दिशाहिन झाले.फार वेळ नव्हताच.अखेर शनिवारची देवगिरी पकडली.जागा मिळेल तिथं,शिवाजीचे वृध्ध आई-वडिल,मामा आणि मेव्हणा बसले.आणि रविवारी सकाळीच मुंबईत उतरले.मुंबई ऐकून माहिती होती, कधी कोणी पाहिलेली नव्हती.पत्रकार शिवाजीनं देखील. या अक्राळ विक्राळ मुंबईत ओळखीचंही कुणी नव्हतं.कसं तरी  टाटा गाठलं.उपचार सुरू झाले.रक्त तपासणी झाली.रिपोर्ट अजून यायचे आहेत.असहाय्य क्षीरसागर कुटुंबानं रविवार आणि सोमवारची रात्रं रस्त्यावर काढली.मुलांच्या वेदना आणि चाललेली फरफट शिवाजीच्या वडिलांना पाहवेना.त्यामुळं .त्यांना कालच परत पाठविलं गेलं.आता रूग्ण शिवाजी आणि अन्य तिघेजण आहेत.आम्हाला बातमी कळल्यानंतर आज सकाळी मी पुण्याहून मुंबईत पोहोचलो.किरण नाईक आणि मी टाटा गाठलं.शिवाजी आणि आमचीही ओळख नव्हती.फोनवरून ठावठिकाणा शोधला.आम्ही समोर येताच शिवाजीनं अक्षरशः हंबरडा फोडला.मुलाची अवस्था पाहून आईची काय अवस्था झाली असेल कल्पना करा.आई आणि मुलगा किती तरी वेळ हुंदके देत होते.मी निःशब्द होतो.किऱण नाईक शिवाजीच्या पाठीवरून हात फिरवत त्याला धीर देत होते.पण मुळातुच शिवाजी कोसळून पडल्यानं सात्वनाचे शब्द वांझोटे आहेत हे आम्हाला आणि त्यालाही कळत होतं.शिवाजीला दम लागत होता,घामाच्या धारा वाहत होत्या.त्याची केविलवाणी स्थिती पाहून आम्हालाही हुंदके आवरता आले नाहीत.त्याच्यासमोर जास्त वेळ थांबणं शक्य नव्हतं.”निवासाच्या व्यवस्थेचं बघतो” म्हणून आम्ही मेव्हण्याला घेऊन तीन-चार धर्मशाळांमधून पायपीट केली.मृणालिनी नानिवडेकरांनी एक फोन नंबर दिला होता.तिथं संपर्क केला तर तेथील  महाडिक साहेब रजेवर होते.नाना पालकर स्मृती मंदिरात गेलोत तेथे “परभणीवरून कुणाचं तरी पत्र आणावं लागेल” असं सांगितलं.तेव्हा भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांना फोन लावला. नंतर त्यांचा फोन आला.”उद्या सोय होईल”असं त्यांनी सांगितलं.प्रफुल्ल  मारपकवारही प्रयत्न करीत होते.त्यांनी डॉ.प्रकाश खोब्रागडे यांचा ंनंबर दिला.त्यांनी अमोल ठाकूर यांचा नंबर दिला.त्यांचा संपर्क होत नव्हता.दरम्यान चार धर्मशाळा धुंडाळून झाल्या होत्या.

मंत्रालयात जाणंंही आवश्यक होतं.कारण तिथं सोलापूरचा पत्रकार राम खटकेचा भाऊ सिध्देश्‍वर खटके आमची वाट बघत होता.त्याचेही फोनवर फोन येत होते. त्यामुळे मंगेश चिवटेला फोन करून मंत्रालयात खटकेला मदत कऱण्याची विनंती केली.त्यानुसार मंगेश चिवटे आणि विनोद जगदाळे हे दोन संवेदनशील मनाचे तरुण  पत्रकार  सिध्देश्‍वरला घेऊन थेट मुख्यमंत्र्यांकडं गेले.मुख्यमंत्र्यांनीही त्याच्या अर्जावर निधी देण्याचें आदेश दिले .पण सिध्देश्‍वरनं काही कागदपत्रे आणलेली नव्हती.त्यामुळं निधीचा चेक आज मिळू शकला नाही.कागदपत्रे आणण्यासाठी सिध्देश्‍वर आज परत सोलापूरला गेलाय.तो गुरूवारी येईल.तेव्हा त्याला चेक मिळेल..सिध्देश्‍वरचा विषय मंगेश,विनोदनं मार्गी लावला होता मात्र शिवाजीचा राहण्याचा विषय संपलेला नव्हता.मग आम्ही पुन्हा आरोग्य कक्षातील ओमप्रकाश शेटे यांच्याकडं गेलो.तेथून त्यांनी मग अमोल ठाकूर यांना फोन लावला.सेंट जॉर्जच्या जवळच्या धर्मशाळेत व्यवस्था होईल असं त्यानी सांगितलं. मी किरण नाईक,मंगशे चिवटे,मिलींद अष्टीवकर  सेंट जॉर्जला पोहोचलो.धर्मशाळा चांगली होती .मात्र तेथून जाणं-येणं अवघड होईल म्हणून ” दादरला व्यवस्था होऊ शकेल काय”? अशी विनंती पुन्हा ठाकूर यांना केली.त्यांनी ते ही मान्य केलं.हे सारं आटोपून शिवाजीच्या मेव्हण्याला फोन केला तर त्यानं सांगितलं,”तुम्ही गेल्यावर शिवाजीची प्रकृत्ती अधिकच बिघडली असून त्याला तातडीनं अ‍ॅडमिट केलं गेलं आहे”.आम्ही आता त्याच्याजवळून हालूच शकत नाहीत..ते आजची रात्र तेथेच काढणार आहेत.उद्या व्यवस्था होईल अशी अपेक्षा आहे.

डेक्कनमधून परत पुण्याला येताना एक विचार सारखा मनात घोळत होता.पत्रकारांना कायद्यापेक्षा अशा मदतीची गरज आहे.त्यासाठी आता काही केलं पाहिजे.मंगेशनं पत्रकार परिषदेच्यावतीनं एक आरोग्य कक्ष उभारण्याची कल्पना मांडली.मलाही ती आवडली.येत्या काळात तसा प्रयत्न आम्ही करणार आहोत.बाहेरगावाहून येणार्‍या आजारी पत्रकारांना हा कक्ष मदत करेल.त्याची निवास व्यवस्था आणि अन्य मदतही मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.खरी गरज त्याची आहे.केवळ सहानुभुतीच्या चार शब्दांनी रूग्णांना काही उपयोग होत नाही.प्रत्यक्ष मदतीची गरज असते,ते देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.

आज दिवसभरात अनेकांनी शिवाजी आणि राम्साठी  धावपळ केली.त्यात आरोग्य विभागातला नितीन जाधवचाही आवर्जुन उल्लेख करावा लागेल.सर्वांचे मनापासून आभार.तिकडे परभणीत धनाजी चव्हाण यांनीही शिवाजीची कागदपत्रे तयार कऱण्यासाठी मदत  केली.आजच्या दोन्ही घटनांनी एक वास्तव समोर आलं,आता  आता पत्रकारांसाठी  पत्रकारांनाच पुढं यावं लागेल.ठोस काही करावं लागेल.(एसेम )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here