औरंगाबादेत माध्यमांची मुस्कटदाबी

0
2149

औरंगाबादेत माध्यमांची मुस्कटदाबी

कोरोनाच्या बातम्या छापल्या म्हणून

‘दीव्य मराठी’वर गुन्हा दाखल


मुंबईः औरंगाबादेत कोरोनानं नुसतं थैमान घातलं आहे.कोरोना रोखायला जिल्हा प्रशासन पूर्णतः असफल ठरलं आहे.आपल्या अपयशाचं खापर जिल्हा प्रशासन आता माध्यमांवर फोडायला लागलं आहे.त्याचाच एक भाग म्हणून माध्यमांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न औरंगाबाद प्रशासनाकडून होत आहे.याचा निषेध करावा लागेल.दीव्य मराठीमध्ये ‘206 नागरिकांचे मारेकरी कोण” ? “नापासांची फौज: निर्णय घेण्यास कोण कुठे चुकले” ? अशा मथळ्याखाली दोन बातम्या प्रसिध्द झाल्या होत्या.बातम्या चुकीच्या असल्याचं कारण सांगत दीव्य मराठीचे संपादक,प्रकाशक आणि संबंधित वार्ताहराच्या विरोधात पोलिसांनी आज गुन्हा दाखल केला आहे.या बातम्यांमुळे लोकसेवकांच्या मनावर परिणाम झाला असून महामारी विरूध्द चालू असलेल्या उपाययोजनांच्या काळात अडथळा निर्माण झाल्याचा आरोप पोलिसांनी दीव्य मराठीवर ठेवला आङे.कतर्र्व्यावर असलेल्या आणि निष्ठेनं काम करणार्‍या लोकसेवकांची नापासांची फौज अशा शब्दात संभावना करण्यात आली असाही पोलिसांचा आक्षेप आहे.पोलिसांच्या तक्रारीवरून भादवि कलम 117,188,500,501,505 (1) 9(ब) आणि साथीचे रोग अधिनियम 1897च्या कलम 3 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.महामारीच्या काळात वास्तव जगासमोर मांडण्याचं काम माध्यमांनी केलं आहे.अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील माध्यमांचं कौतूक केलेलं आहे.औरंगाबादमध्ये कोरोनाचा प्रसार रोखण्यात जिल्हा प्रशासन अपयशी ठरलं आहे हे सत्य माध्यमांनी मांडायचं नाही का ? हा प्रश्‍न आहे.जिल्हा प्रशासन नापास झालेलं नसेल तर मृतांचा आकडा आणि बाधितांची संख्या सातत्यानं कशी वाढत चालली आहे ? याचाही खुलासा जिल्हा प्रशासनानं केला पाहिजे.माध्यमं जनतेचा आवाज असतात .हा आवाज कोणीही बंद करू शकत नाही.माध्यमांवर गुन्हे दाखल केल्यानं जिल्हा प्रशासनाचे अपयश झाकले जाईल असं कोणाला वाटत असेल तर ते चुकीचे आहे.वास्तवात माध्यमांना बरोबर घेऊन महामारीचा मुकाबला करण्याची भूमिका प्रशासनानं घेणं अपेक्षित असताना माध्यमांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न होत असेल तर त्याचा निषेध झालाच पाहिजे.दीव्य मराठीचा संपादकांवर गुन्हा दाखल करण्याचा जो निर्णय जिल्हा प्रशासनानं घेतलेला आहे त्याचा मराठी पत्रकार परिषद,पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती तीव्र शब्दात धिक्कार करीत आहे.या विषयांवर मुख्यमंत्र्यांकडे दाद मागण्यात येणार असल्याचे परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here