माणिकराव देशमुख : एका संघर्षाची अखेर

गावचा विकास हा त्यांचा ध्यास होता,
गाव राळेगण किंवा हिवरे बाजार सारखं व्हावं हे त्यांचं स्वप्न होतं.. वयाची साथ नव्हती पण जिद्द, चिकाटी, उत्साह तरूणांना लाजवेल असा.. कल्पनांची कमतरता नव्हती.. आणि पाठपुराव्यातही ते कमी पडत नसत..त्यातून माणिकराव देशमुख तथा भाऊंनी गावात अनेक प्रकल्प राबविले होते.. २००० च्या सुमारास सरपंच असताना आदर्श गाव योजनेत गावाची निवड झाली होती.. त्यासाठी भाऊंनी मुंबईला अनेक फेरया मारल्या .. आदर्शगाव योजने अंतर्गत डीपीडीसीनं ४५ लाख रूपये मंजूर केले होते.. यातून गावाचा कायापालट होणार होता.. मात्र पुढं काही विघ्नसंतोषी लोकांमुळे आदर्श गावचं त्याचं स्वप्न साकार झालं नाही.. सरपंचपद गेल्यानंतर देखील गावाच्या विकासाची त्यांची तळमळ कमी झाली नाही.. काही वर्षांपूर्वी गावात तीव्र पाणी टंचाई होती.. बोअरवेल्स , विहिरी कोरड्या पडल्या होत्या.. अशा स्थितीत दोन नद्यांचा संगम ज्या ठिकाणी होतो तेथे एक बंधारा उभारावा अशी भाऊंची तीव्र इच्छा होती.. ते त्यांच्या परीनं प्रयत्न करीतही होते.. ते एवढं सोपं नव्हतं.. त्यामुळं ते आम्हाला वैतागून म्हणायचे, “तुमचे एवढे वशिले असून काय उपयोग? गावात तुम्ही बंधारा बाधू शकत नाही” ..भाऊंच्या इच्छेखातर सरकारच्या माध्यमातून काही होतंय का? याचा प्रयत्न मी करीत होतो आणि एखाद्या एनजीओच्या माध्यमातून काही होतंय का? याचा तपास पुण्यात तेव्हा सहाय्यक धर्मदाय आयुक्त असलेले आमचे बंधू दिलीप देशमुख करीत होते.. अखेर यश आलं.. सकाळच्या माध्यमातून ७० लाख रुपये खर्च करून बंधारा उभारण्यात आला.. कोरोना मुळं बंधारयाचं जलपूजनाचा कार्यक्रम करता आला नाही… पण ज्या दिवशी बंधारा ओसंडून वाहू लागला तो दिवस भाऊंच्या आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा क्षण होता.. भरलेला बंधारा पाहून त्यांचे डोळेही डबडबले होते.. बंधारयाचं आपली उपयुक्तता दाखवायला सुरूवात केली होती.. दहा दहा वर्षांपासून कोरड्या पडलेल्या विहिरी, बोअरवेल पाण्यानं डबडबल्या होत्या.. दुष्काळी देवडी, पाणीदार देवडी झाली होती.. हे परिवर्तन केवळ भाऊंमुळं घडलं होतं.. ध्यास आणि गावच्या विकासाची तळमळ असेल तर एक सामांन्य व्यक्ती गावात कसं परिवर्तन घडवून आणू शकते हे माणिकराव देशमुख यांनी दाखवून दिले होते..जेव्हा गावात पाणी टंचाई होती तेव्हा त्यांनी स्वतः चं पाण्याचं बोअर गावासाठी खुलं केलं होतं..
रस्ता तेथे एस. टी. हे एस. टी. महामंडळाचे ब्रिद.. पण गावात रस्ता असूनही एस. टी.नाही ही भाऊंची गेल्या दहा वर्षांपासूनची खंत.. अनेकदा त्यांनी मला सांगितलं “जरा प्रयत्न करा” .. परंतू “भाऊ, घरी गाडी आहे, तुम्हाला कुठं एस. टी. नं जायचंय..?” त्यावर ते म्हणायचे, “माझं ठीकय वृद्धांना आपले पगार आणण्यासाठी वडवणीला जावे लागते.. त्यांना शंभर रूपये लागतात.. एस. टी. सुरू झाली तर एवढा खर्च लागणार नाही” ही त्यांची तळमळ होता.. मात्र हा विषय मी कधी गांभीर्याने घेतलाच नाही.. मात्र त्यांचे प्रयत्न सुरूच होते..त्यासाठी ते बीडला जात.. जगदीश पिंगळे, दिलीप खिस्ती यांच्या कार्यालयात जात… त्यांना बातम्या छापायला सांगत.. त्यानंतर एस. टी. सुरू झाली.. पण हा आनंद भाऊंना जास्त काळ उपभोगता आला नाही.. प्रवासी नाहीत म्हणून.. बस काही दिवसातच बंद झाली.. मग पुन्हा भाऊंचा पाठपुरावा सुरू झाला.. अगदी मृत्यूच्या आठ दिवस अगोदर त्यांनी धारूर डेपोला पत्र पाठविले होते… धारूर – देवडी अशी बस सुरू करण्यासाठी.. त्याची प्रत बीडच्या विभागीय कारयालयालाही पाठविली होती.. ९२ वर्षांचं वय, घरी घोडी गाडी असताना देखील सामांन्यांसाठी एस टी. सुरू व्हावी ही त्यांची तळमळ होती.. त्यासाठी अखेरच्या क्षणापर्यंत त्यांची धडपड देखील सुरू होती..
भाऊंना वाचनाची प्रचंड आवड.. पुण्यात माझ्याकडं आले की, दिवसभर टेरेसवर बसून पुस्तक वाचत राहात. माझ्या घरातील दोन तीन हजार पुस्तकांपैकी बहुतेक पुस्तकं त्यांनी वाचली होती.. ते पुस्तक नुसतंच वाचत नसत तर त्याच्या नोट्स देखील काढत .. त्यांच्या या नोट्सच्या ढिगभर वह्या त्यांच्या कपाटात ठेवलेल्या आहेत.. पुस्तकं वाचण्याची आवड लहान मुलांना देखील लागली पाहिजे आणि त्यासाठी गावात वाचनालय असावं असं त्यांना मनोमन वाटायचं.. त्यांनी ही इच्छा अनेकदा माझ्याकडे देखील बोलून दाखवली होती पण नेहमीप्रमाणे आम्ही दुर्लक्ष केलं.. विषय त्यांच्या डोक्यातून मात्र जात नव्हता.. ते २६ फेब्रुवारीला गेले.. २४ फेब्रुवारीला रेणुका देवी मंदिरासमोर गावचे सरपंच त्यांना भेटले, ते त्यांना म्हणाले, “मला गावात वाचनालय सुरू करायचंय, तू मला एखादी खोली उपलब्ध करून दे.. माझ्याकडे दोन – तीन हजार पुस्तकं आहेत.. ती सगळी मी वाचनालयास देणार आहे” .. हा संकल्प सोडल्यानंतर दुसरयाच दिवशी भाऊ आम्हाला सोडून गेले..सरपंच जालिंदर झाटे यांनीच हा किस्सा आम्हाला सांगितला.. वाचनालयाचे त्यांचं स्वप्न अर्धवटच राहिलं.. ते आम्ही पूर्ण करणार आहोत..
गावच्या मुलांना आधुनिक शिक्षण मिळालं पाहिजे, गरीब मुलांना वाहतुकीची सोय झाली पाहिजे हे त्यांचं सारखं आम्हाला सांगणं असायचं.. एक दिवस चिडून मला म्हणाले, तुमची मुलं पुण्यात असतात, चांगल्या शाळा, कॉलेजात शिकतात, गावातील मुलांना या सुविधा मिळत नाहीत.. तुम्ही जिल्हा परिषद शाळेला इ लर्निगचं साहित्य उपलब्ध करून द्या.. भाऊंची इच्छा होती म्हणून दिलीपराव यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेला एलसीडी, कॉम्प्युटर, इन्व्हर्टर असं एक लाख रूपयाचं साहित्य उपलब्ध करून दिलं.. त्याचं उद्घाटन आई आणि भाऊंच्या हस्ते करण्यात आले.. गावातील माध्यमिक शाळेला तीस सायकलीचं वाटप करून साईकल बॅंक सुरू करण्यात आली.. राजेवाडी, चिंचवण तसेच अन्य काही ठिकाणी शंभरावर साईकली भाऊंची इच्छा आणि आग्रहाखातर आम्ही वाटल्या..शाळेत दुरून येणारया मुलांची सोय झाली..
म्हणजे, पाणी, वीज, शिक्षण आरोग्य अशा सर्वच बाबतीत ते जागरूक आणि विकासासाठी आग्रही होते.. त्यांच्या परीनं या क्षेत्रात त्यांनी भरीव काम केलं.. त्यांचे सारेच प्रयत्न यशस्वी झाले असं नाही पण शेवटच्या क्षणापर्यंत माझी देवडी इतर गावांपेक्षा वेगळी असली पाहिजे असे त्यांना वाटत होते.. गावांबद्दल प्रचंड पे़म असलेल्या भाऊंनी दोन वेळा आईला सरपंच केले .. तीन आपले तीन सदस्य निवडून आलेले असतानाही सरपंचपद भाऊंनी खेचून आणले होते.. ते पद त्यांनी उपभोगले नाही तर खरया अर्थानं गावच्या विकासाची या पदाचा वापर केला.. त्यामुळेच गावची जनता कायम त्यांच्या श्रुणात आहे..निवडणुक ग्रामपंचायतीची असो अथवा सोसायटीची.. भाऊंचा उत्साह ओसंडून वाहत असे.. गेल्या वेळची ग्राम पंचायत निवडणूक त्यांनी वयाच्या ८७ व्या वर्षी लढविली.. काही दिवसांपूर्वी गावची सोसायटी निवडणूक झाली.. आम्ही त्यांना ती कळू दिली नाही.. त्यांना ती लढवायची होती.. राजकारण हा भाऊंचा विकपॉइंट होता.. राजकारणाचा विषय निघाला की, ते फुलून जात..

भिती हा शब्द भाऊंच्या शब्दकोषात नव्हता..अमावशयेच्या रात्री शेतात आलेल्या चोरांचं मनगट पकडण्याची हिंमत दाखविणारे ते बहादूर होते..शरीरयष्टी जेमतेम.. मात्र जिगर आणि इच्छा शक्तीच्या बळावर त्यांनी आयुष्यात आलेल्या अनेक संकटांशी लिलया सामना केला.. त्यांनी आयुष्यभर एवढा संघर्ष केला की, त्यांना कधीच संकटांचं भय वाटायचं नाही.. पोरांच्या मोठेपणाचा बडेजाव देखील त्यांनी कधी केला नाही.. ते आपल्याच मस्तीत जगले, कोणासमोर कधी लाचार झाले नाहीत, कधी कोणाला भीक घातली नाही.. सतत संघर्षरत असलेल्या, कायम क्रियाशील राहिलेल्या भाऊंची धावपळ मृत्यूनंच शांत केली..

भाऊ गेल्याची बातमी गावाला कळली तेव्हा संपूर्ण गाव हळहळ.. , गावचा पितामह गेला अशी भावना गावकरी व्यक्त करतात.. व्यक्तीगत आणि सार्वजनिक जीवन निषकलंकपणे जगलेल्या भाऊंचा गावात म्हणूनच आदरयुक्त दरारा होता.. त्यांच्या जाण्यानं पोकळी निर्माण झाली आहेच पण त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही देशमुख कुटुंबिय आणि गावकरी प्रयत्न करणार आहोत..

एस.एम देशमुख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here