लोकसभा निवडणुकीत उध्दव ठाकरे याच्या शिवसेनेनं दैदीप्यमान यश संपादन केलं.त्याबद्दल त्याचं राज ठाकरे यांनी अभिनंदन केलंय.एक बुकेही त्यांनी मातोश्रीवर पाठविला आहे.मातोश्रीवर आदेश बांदेकर यांनी हा बुके स्वीकारला.याचा अर्थ शिवसेनेच्या दृष्टीनं या बुकेला फारसा अर्थ नाही.
या बुकेमागंदोन उद्देश संभवतात.पहिला म्हणजे काल पासून माध्यमांनी राज यांच्याकडं दुर्लक्ष केलेलं आहे.अशा स्थितीत माध्यमाचं लक्ष वेधून घेण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून या घटनेकडं बघता येईल.जनतेची शहानुभूती मिळविण्याच्या प्रय़त्नांचा एक भागही राज ठाकरे याच्या या खेळी मागं असावा.असं नसतं तर केवळ राज ठाकरे यांनाच त्यांनी बुके पाठविला नसता.निवडणुकीच्या काळात राज ठाकरे हे नरेंद्र मोदी याचं तोंडभरून कौतूक करीत होते.आता ते निवडणून आलेत तर पहिला बुके त्यांनाच जायला हवा होता.राज्यातील काही भाजप नेतेही राज यांच्याबद्दल सहानुभूती बाळगून होते.त्यामुळं दुसरा बुके भाजपच्या राज्यातील नेत्यांना जायला हवा होता आणि नंतर तिसरा बुके मातोश्रीवर गेला असता तर हा सभ्यतेचा आणि सुसंस्कृतपणाचा भाग म्हणून साऱ्यांनीच याकडं पाहिलं असतं.असं झालं नाही.झालं असेल म्हणजे मोदी आणि भाजपच्या अन्य नेत्यांना बुके गेला असेल तर त्याची बातमी किमान माध्यमांपर्यत तरी पोहोचविली गेलेली नाही.त्यामुळं बुके प्रकरण निखळ आणि शुध्द हेतूतून घडलेलं आहे असं अनेकांना वाटत नाही.
.निवडणुकीच्या अगोदर उध्दव यांनी वर्तमानपत्रातून टाळी साठी हात पुढं केला होता.त्याची राज ठाकरे यांनी यथेच्छ टिंगल टवाळी केली होती.आता राज यांनी बुके पाठवून टाळीसाठी हात पुढं केलाय असा निष्कर्ष काही राजकीय पंडितांनी काढलाय.मला यात तथ्य वाटत नाही.राजकारणात केव्हाही काहीही होऊ शकतं हे खरं असलं तरी उध्दव आणि राज केवळ राजकारणी नाहीत.ते आप्तेष्टही आहेत.त्यामुळं भाऊबंदकीची एक किनार त्यांच्या संबंधांना आहे.राजकारण बदलू शक ते,मात्र भाऊबंदकीचे पिळ एक बुके पाठवून दूर होतील असे नक्कीच नसतात. राज ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या पाठित खंजीर खुपसला अशी उध्दवची भावना आहे.त्यातच प्रचार काळात राज यांनी उध्दव यांचीओौकात तर काढलीच त्याचबरोबर बाळासाहेबांना पाठविलेले मटणसूप आणि तेलकट वडेही काढले.यामुळं उध्दव ठाकरे कमालीची दुखावले गेले.आम जनतेलाही त्यांची ती भाषा आवडली नाही.केवळ शिवसेनेच्या विरोधात उमेदवार उभे कऱणे आणि ते उमेदवार पाडून उध्दव यांना राजकारणातूनच हद्दपार कऱण्याचा बेत आखणे हेही जनतेला भावले नाही म्हणूनच मतदारांनी मनसेला आस्मान दाखविले.सेनेच्या विरोधात जे दहा उमेदवार मनसेनं उभे केले होते त्या सर्वांची डिपॉझिट जप्त झाली.एवढं सारं झाल्यानंतर जर आता मनसे प्रमुख पुप्षगुच्छ पाठवत असतील तर तो केवळ उपचाराचा भाग नसून त्यामागं जनतेची सहानुभूती मिळविण्याचा आणि आपण मनाने किती उमदे आहोत हे दाखविण्याचाही प्रयत्न आहे हे उघड आहे.मात्र निवडणुकीच्या अगोदर राज यांनी उध्दव यांना असे काही बुक्के लगावले आहेत की आता हा बुके त्यावरचा उतारा ठरू शकणार नाही.आगामी विधानसभा निवडणुकीत या बुकेने काही फरक पडेल किंवा मनसे आणि शिवसेना जवळ येतील किंवा मनसेला महायुतीत घेतले जाईल असे नाही.याचं कारण भाजपलाही आता मनसेची गरज राहिलेली नाही.त्यांच्या सर्वच्या सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झालेले आहे.अशा पराभूत पक्षाला बरोबर घेतलेच पाहिजे असे भाजपला वाटणार नाही आणि ते त्यासाठी सेनेकडं आग्रही धरणार नाही.त्यामुळं बुके पाठविला ही घटना क्षणभर ब्रकिंग न्यूज होऊ शकते पण ती दीर्घकालीन राजकीय परिणाम करणारी घटना नक्कीच ठरणार नाही.राज यांनी काढलेले वडे आणि सुप हे साऱ्यांच्याच लक्षात राहिल,सेनेच्या विजयानंतर पाठविलेला बुके कोणीच लक्षात ठेवणार नाही.