आणखी एका तरूण पत्रकाराचे आज निधन झाले.अलिबाग येथील पत्रकार रूपेश हुद्दार याचे पहाटे निधन झाले.जेमतेम 30-35 वर्षाचं वय असलेल्या रूपेशला गेली दोन तीन दिवस ताप होता.त्यानंतर काल रात्री ह्रदयाविकाराचा झटका येऊन त्याचे निधन झाले.काही दिवसांपुर्वीच रूपेशचे वडिल वारले.त्यानंतर घरगुती अडचणी होत्या शिवाय गेले काही दिवस तो बेकारच होता.एका पाठोपाठ एक आघात होत गेल्याने तो अगोदरच खचला होता.त्यातच शारीरिक व्याधी सुरू झाल्या.आज त्याची अखेर झाली.विविध विभागीय दैनिकात काम केलेल्या रूपेशची लेखणी धारदार होती.विशेषतः क्राईम बिटमध्ये त्याचा हातखंडा होता.त्यामुळे त्याने रायगडच्या पत्रकारितेत एक वेगळं स्थान मिळविलेलं होतं.मात्र असंख्य पत्रकारांच्या वाट्याला येणारे भोग रूपेशच्याही वाट्याला आले आणि तो अचानक आपणास सोडून गेला.अलिबागमधील सर्वच पत्रकारांशी माझे स्नेहाचे ,जिव्हाळ्याचे,आपुलकीचे नाते आहे.रूपेशही त्यापैकीच एक होता.त्यामुळे त्याच्या निधनाच्या बातमीनं धक्का बसला. रूपेशला अशी श्रध्दांजली वाहण्याची वेळ येईल असे वाटले नव्हते. पत्रकारांनी आपल्या प्रकृत्तीची काळजी घेणे किती गरजेचे आहे हे वारंवार दिसून येत आहे.गेल्या तीन दिवसात पुण्यातील दोन आणि आता रूपेश असे तीन तरूण पत्रकार अकाली गेले.हे सारं चिंताजनक आहे.