‘१९९९ साली झालेले कारगिल युद्ध भारताला मुसलमान सैनिकांनी जिंकून दिले, हिंदूंनी नव्हे,’ असे भयंकर वादग्रस्त वक्तव्य उत्तर प्रदेशचे अल्पसंख्याक मंत्री आझम खान यांनी केले आहे.
गाझियाबाद लोकसभा मतदारसंघातील प्रचारसभेला संबोधित करताना आझम खान बोलत होते. या मतदारसंघात भाजपने निवृत्त लष्करप्रमुख जनरल व्ही. के. सिंह यांना उमेदवारी दिली आहे. संमिश्र वस्ती असलेल्या या मतदारसंघात निवृत्त सैनिकांचा मोठा भरणा आहे. ही गणिते डोळ्यापुढे ठेवून खान यांनी थेट देशाच्या लष्कराचेच जातिधर्मामध्ये विभागून टाकले. ‘कारगिलच्या टेकड्यांवर विजयाचा झेंडा रोवणारा मुसलमान जवान होता. हिंदू नव्हता, असे वक्तव्य त्यांनी केले.
गाझियाबाद मतदारसंघात भाजपचे व्ही. के. सिंह, काँग्रेसचे राज बब्बर व आम आदमी पक्षाच्या शाजिया इल्मी यांच्यात कडवी लढत होत आहे. हे तिन्ही उमेदवार हायप्रोफाइल असल्यामुळे समाजवादी पक्षाचा उमेदवार झाकोळून गेला आहे. त्याला स्पर्धेत आणण्यासाठी आणि मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण घडवून आणण्यासाठी खान यांनी जाणीवपूर्वक हे वक्तव्य केले असावे, असे बोलले जात आहे.
निवडणूक आयोगाने खान यांच्या वक्तव्याची गंभीर दखल घेतली असून चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्यांच्या भाषणाची सीडी मागवण्यात आली आहे.