आकाशवाणीतील वृत्तनिवेदक संपावर

0
816

मुंबई, दि. 24 – आकाशवाणी मुंबई केंद्रातील वृत्त निवेदकांनी संप पुकारला आहे. त्यामुळे बुधवारी (23 ऑगस्ट) सकाळी 8.30वाजताचे मराठी राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित झाले नाही. आकाशवाणीच्या इतिहासात बातमीपत्र प्रसारित न होण्याची पहिलीच वेळ असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान याप्रकरणी वृत्तविभागाने आंदोलनकर्त्या कर्मचा-यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.  तर दुसरीकडे संपामुळे बुधवारी मराठी राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित न झाल्याबाबत आकाशवाणी मुंबई केंद्रातील कर्मचा-यांनी श्रोत्यांना माफी मागणारे पत्र लिहून आपले म्हणणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

का पुकारलाय आकाशवाणी मुंबई केंद्रातील कर्मचा-यांनी संप?
मराठी राष्ट्रीय बातमीपत्र अनेक वर्ष दिल्ली आकाशवाणी केंद्रावरुन प्रसारित होत होत. मात्र खर्च कपातीचे कारण देत दिल्ली वरुन प्रसारित होणारी बातमीपत्र राज्यांच्या राजधानीत हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार  दिल्ली आकाशवाणीच्या मराठी वृत विभागातून प्रसारित होणारी सकाळी साडे आठ, दुपारी दीड आणि रात्री साडे आठ वाजताची तीन राष्ट्रीय बातमीपत्र 4 जूनपासून राजधानी मुंबईतून प्रसारित होत आहेत. दरम्यान मुंबई मधील एकूणच यंत्रणा आणि व्यवस्था यामुळे सकाळी प्रसारित होणारे राष्ट्रीय बातमीपत्र करण्यास केंद्राने असमर्थता दर्शविली होती. कंत्राटी वृत्त निवेदकांनी संपाचा इशाराही दिला होता. अखेर मंगळवारपासून कंत्राटी वृत्तनिवेदकांनी संप पुकारल्याने त्याचा बातमीपत्राला फटका बसला.

आकाशवाणी मुंबई केंद्रातील कर्मचा-यांचं श्रोत्यांना पत्र
श्रोतेहो, क्षमस्व
आकाशवाणी मुंबई केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागात काम करणारे आम्ही नैमित्तिक वृत्तभाषांतरकार, वृत्तनिवेदक,टंकलेखक,निर्मिती सहाय्यक,वृत्तप्रतिनिधी आपल्याकडे मन मोकळं करत आहोत.(काही टवाळखोर आम्हाला “कंत्राटी कामगार” म्हणतात). आपण आकाशवाणीच्या बातम्यांचे नियमित श्रोते आहात.. चाहते आहात.  सकाळी 8:30 वाजता प्रसारित होणारं राष्ट्रीय बातमीपत्र दिनांक 23 ऑगस्ट रोजी प्रसारित झालं नाही म्हणून आपला विरस झाला असेल परंतु श्रोतेहो, त्यात आमचा दोष नाही.

मे 2017 पासून आम्ही सगळे विनावेतन काम करत आहोत,ते ही अत्यंत चोखपणे. 2013 पासून आम्हाला आमचे मानधन कधीच वेळेवर मिळालं नाही. पूर्वी आमच्या कराराच्या शेवटच्या दिवशी आम्हाला आमचं मानधन धनादेशाने मिळत असे. हळूहळू दोन महिन्यांनी, मग तीन महिन्याआड मानधन मिळू लागले तरीही आम्ही कधी कुरकुर केली नाही की आमच्या कामात हयगय केली नाही.सण-उत्सव असोत की मुसळधार पाऊस असो,पैसे मिळत नसल्याचे दुःख मागे सारून आम्ही सगळी बातमीपत्रे वेळेत प्रसारित करत होतो कारण आकाशवाणीवर आमचे प्रेम आहे, वृत्तविभाग म्हणजे आम्हाला दुसरे घर वाटते,सहकारी म्हणजे आमचे कुटुंब आहे.याच भावनेने आम्ही काम करत राहिलो आणि एकीकडे मानधन मिळण्याचे प्रमाण तीन वरून पाच महिन्यांवर जाऊन पोहोचले. नाईलाजस्तव आम्ही याबाबत आमच्या वरिष्ठांना सांगितले,पार दिल्लीपर्यंत आणि या मंत्रालयापर्यंत पत्र व्यवहार केला. पण उपयोग शून्य झाला. आम्हाला केवळ पोकळ आश्वासने मिळाली. फारच तक्रारी झाल्या की फार फार तर 2 महिन्यांचे पैसे मिळत. एकीकडे फंड आला नाही हे कारण सांगितले जाई तर दुसरीकडे कायम कर्मचाऱ्यांना त्यांची मोबाईल आणि वर्तमानपत्रांची बिले आग्रहाने वसूल करतानाही आम्ही पहिले. जे काम आम्ही आपलेपणाने,कौतुकाने करतो त्याबद्दल वरिष्ठांना काहीही कौतुक नसावे,उलट आपले लाभ पदरात पाडून घेण्यासाठी त्यांनी हक्क गाजवावा हे आमच्यासाठी शिसारी आणणारे, किळसवाणे होते. पण त्याही परिस्थितीत आम्ही काम करत होतो.मर मर मरणाऱ्या आमचा दिवाळी-दसरा कोरडा आणि कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना मलिदा हे वास्तव न पचण्यासारखे होते. शिवाय दुसरीकडे त्यांचा उद्धटपणा ही आम्ही खपवून घेत होतोच.

काही दिवसांपूर्वी आकाशवाणीने राष्ट्रीय बातमीपत्र दिल्लीहून हलवून मुंबईला आणलं पण आम्ही कुरकुर न करता तो ही अतिरिक्त भार उचलला. आमच्यापैकी कित्येक जण आकाशवाणीतून मिळणाऱ्या पैशांवर अवलंबून आहेत.त्यांनीही पैशांकडे न पाहता काम केलं. आधीच तुटपुंजे मानधन आणि ते ही वेळेवर नाही.अखेर 23 तारखेपासून आम्हाला बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करावं लागलं.आमची मागणी एकच होती की आमचे ठरलेलं मानधन वेळेत मिळावं.

परिणाम
श्रोतेहो,पण याचा परिणाम असा झाला की वृत्तविभागाने आम्हाला कारणे दाखवा नोटीस बजावली,तुम्हाला काढून टाकू अशा धमक्या द्यायला सुरुवात केली.आमच्यातल्या काही जणांना धाक दाखवून फोडले आणि आमचे आंदोलन खिळखिळे करण्याचा कसून प्रयत्न सुरु केला आहे. दुसरीकडे काही नतद्रष्टांनी वर्तमानपत्रात आमची बाजू न मांडता राष्ट्रीय बातमीपत्र आपल्या केंद्रात पळवून नेण्याचा घाट घातला आणि आपल्या पोळीवर तूप ओढून घेतले.

प्रिय श्रोतेहो,
हे आंदोलन करतांना आम्हालाही यातना होत आहेत.पण पैशांशिवाय आमचं घर कसं चालावं. आम्ही तर फक्त आमच्या हक्काचे पैसे वेळच्या वेळी द्या इतकीच मागणी करत आहोत.हा काय गुन्हा झाला का? या कठीण समयी आपण आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहाल याची पक्की खात्री वाटते.आपल्या शुभेच्छामुळे आमच्या वरिष्ठांना सद्बुद्धी लाभो ,हीच   श्री गणरायाचरणी प्रार्थना.
कृपया आमची ही भूमिका सर्वदूर पोहोचवा.

आपले विनीत,
नैमित्तिक संपादकीय कर्मचारी,  प्रादेशिक वृत्तविभाग, आकाशवाणी, मुंबई

 

लोकमतवरून साभार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here