पुणे – अंधश्रद्धा निर्मूलन लढ्याचे नेते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी ‘प्लॅंचेट‘ करण्यात आल्याचे वृत्त तद्दन बेजबाबदार असल्याची भूमिका घेत, हा गंभीर आरोप पुण्याचे माजी पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी आज (सोमवार) पत्रकार परिषद घेऊन फेटाळून लावला. याचबरोबर पोळ यांनी असे वृत्त प्रसिद्ध करणाऱ्या आऊटलूक मासिकाविरोधात व लेखक-पत्रकार आशिष खेतान यांना अब्रुनुकसानीची नोटिस पाठविली आहे. आपल्यावर करण्यात आलेले हे धादांत खोटे असल्याचे पोळ यांनी यावेळी सांगितले.
‘‘दाभोलकर यांच्या हत्येच्या शोधासाठी प्लॅंचेट करण्यात आल्याचा आरोप हा घाऊक प्रसिद्धीसाठी लिहिण्यात आलेला लेख आहे. निव्वळ स्वत:च्या मासिकाचा खप वाढविण्यासाठी लिहिण्यात आलेला हा लेख बेजबाबदार पत्रकारितेचे उदाहरण आहे व अशा खोट्या लेखामुळे माझ्या अशिलास मानसिक धक्का बसला आहे. खेतान यांचा हा लेख माझ्या अशिलाचे चारित्र्यहनन करणारा आहे,‘‘ अशा आशयाची नोटिस पोळ यांच्या वकिलाने पत्रकार खेतान व आऊटलूकचे संपादक कृष्ण प्रकाश यांना बजाविली आहे.
आयुष्यभर अंधश्रद्धेविरोधात लढा देणाऱ्या दाभोलकरांच्या हत्येच्या तपासासाठी प्लॅंचेट करण्यात आल्याच्या वृत्ताने राज्यामध्ये खळबळ उडाली होती. दरम्यान, ही बातमी देणारे पत्रकार खेतान यांनी या प्रकरणाचा तपास झाल्यास सर्व पुरावे देण्यास तयार असल्याचे सांगितले आहे. यामुळे आता याप्रकरणावरील मळभ दूर होईल, अशी आशा निर्माण झाली आहे.