अमेरिकन ‘ब्लॉगर’ची हत्या

0
818

इस्लामी कंटरपंथीयांविरोधात ‘मुक्तो-मनो’ (मुक्त मन) या आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून ‘आवाज’ उठवणारे अमेरिकन ब्लॉगर अविजीत रॉय यांची ढाक्यात हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात रॉय यांच्या पत्नी रफिदा अहमद बन्ना याही गंभीररीत्या जखमी आहेत. हल्लेखोरांनी क्रूरपणाचा कळस गाठत त्यांच्या हाताचे बोटही छाटले आहे.

ढाका विद्यापीठीच्या कॅम्पसमजवळ गुरुवारी रात्री रॉय दाम्पत्यावर १० ते १२ जणांच्या सशस्त्र हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला चढवला. कसायाकडे असणाऱ्या सुऱ्याने रॉय व त्यांच्या पत्नीवर सपासप वार करण्यात आले. या हल्ल्यात रॉय दाम्पत्य गंभीररीत्या जखमी झाले. दोघेही रक्ताच्या थारोळ्यात कोसळले होते पण त्यांच्या मदतीला कोणीच आलं नाही. त्यानंतर त्याच अवस्थेत हल्लेखोरांनी दोघांनाही फरफटत फुटपाथवर फेकले. रॉय यांच्या डोक्याची जखम खोलवर असल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर पत्नी बन्ना या बचावल्या असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

‘बांगला अकादमी बुक फेअर’ला उपस्थित राहण्यासाठी रॉय दाम्पत्य काही दिवसांपूर्वीच ढाक्यात आलं होतं. या बुक फेअरवरून परतत असतानाच त्यांना हल्लेखोरांनी टार्गेट केले. याप्रकरणी अद्याप पोलिसांनी कोणालाही अटक केलेली नाही. इस्लाममधील कट्टपंथाचा विरोध करणाऱ्या रॉय यांना कट्टरवाद्यांकडून अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या आलेल्या होत्या. त्यामुळे अशाच शक्तींनी त्यांची हत्या केली असावी, अशी शक्यता असून पोलीस त्या दिशेनेच तपास करत आहेत.

आम्हाला कुणीही संपवू शकत नाही!

रॉय यांचा जन्म बांगलादेशातील होता. त्यांनी नंतर अमेरिकी नागरिकत्व स्वीकारले होते. ‘मुक्तो मोनो’ ब्लॉगची स्थापना त्यांनीच केली. कट्टरतेविरोधातील लिखाणाने हा ब्लॉग अल्पावधीतच चर्चेत आला. विश्वासर व्हायरस (व्हायरस ऑफ फेथ) आणि सुन्यो थेके महाविश्वा (फ्रॉम व्हॅक्क्युम टु दि युनिव्हर्स) ही त्यांची दोन पुस्तके कट्टरवाद्यांना झोंबणारी ठरली. या लिखाणानंतर त्यांना सातत्याने धमक्या येत होत्या. बांगलादेशात आल्यात रॉय जीवंत जाणार नाही, अशा स्वरुपाच्या धमक्या दिल्या जात होत्या, असे रॉय कुटुंबियांकडून सांगण्यात आले. दरम्यान, या घटनेनंतर रॉय यांचा ब्लॉग (http://www.mukto-mona.com/) तात्पुरता बंद करण्यात आला असून ‘आज आम्ही शोकाकुल असलो तरी आम्हाला कुणीही संपवू शकणार नाही’ असा बांगला भाषेतील संदेश या ब्लॉगपेजवर लिहिण्यात आला आहे. रॉय यांचे सहकारी हा ब्लॉग सुरू ठेवणार आहेत.(मटा )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here