सातार- एक सुखद बातमी आहे.अजित पवार यांनी पत्रकारांवर होत असलेले हल्ले चुकीचे आहेत असे म्हटले आहे.अजितदादा एवढ्यावरच थांबले नाहीत तर पत्रकार संरक्षण कायद्याबाबतचा आपण मुंबईस गेल्यावर तातडीने मुख्यमंत्र्याशी चर्चा करून मंत्रिमंडळ बैठकीत या विषयावर चर्चा घडवून आणू आणि धोरणात्मक आणि सकारात्मक निर्णय घेऊ असा शब्द आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातारा येथे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीनं आयोजित कार्यक्रमात बोलताना दिला.एवढेच नव्हे दादा आज साताऱ्यात पत्रकारांवर एवढे मेहरबान होते की,त्यांनी साताऱ्यात सुसज्ज आणि भव्य पत्रकार भवन उभारण्यासाठी आपण प्रय़त्न करू असेही आश्वासन दिले आहे.
अधिस्वीकृती समिती अस्तित्वात नाही त्याबाबत देखील माहिती आणि जनसंपर्क विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असेही पवार यांनी स्पष्ट केले.हरियाणा तसेच अन्य राज्यातील पत्रकारांसाठी ज्या योजना तेथील सरकारानी राबविल्या आहेत त्या मागवून घेऊ आणि त्यावर चर्चा करू असे आश्वासन त्यांनी दिले.एकूण काय आज साताऱ्यात पत्रकारांनी जे जे मागितले ते ते देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.अजित पवारांनी पत्रकारांच्या मागण्यांबद्दल पहिल्यांदाच एवढी सकारात्मक भूमिका दाखविली आहे.
सातारा जिल्हा मराठी पत्रकार संघाने आज पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार कऱण्याचा अत्यंत स्तुत्य आणि अनुकरणीय कार्यक्रम आयोजित केला होता.विविध परिक्षांमध्ये यशस्वी झालेल्या पत्रकारांच्या 40 गुणवत मुलांचा सत्कार अजित पवार यांंच्या हस्ते करण्यात आला. पत्रकार संघाच्यावतीने असा उपक्रम राज्यात प्रथमच राबविला गेला.
जिल्हा अध्यक्ष हरिष पाटणे यांनी प्रास्ताविक करताना पत्रकारांचे सर्व प्रश्न विस्ताराने मांडून सरकारने हे प्रश्न तातडोीन मार्गी लावावेत अशी विनंती केली.पत्रकारांवरील वाढत्या हल्तयाबाबत चिंता व्यक्त करून पत्रकारांना संरक्षण देणारा कायदा केला जावा अशी विनंतीही पाटणे यांनी केली.त्यावर अजित पवार यांनी वरील प्रमाणे आश्वासन दिले आहे.आता बघायचे अजित पवार आपले आश्वासन पूर्ण करतात का ते..
या कार्यक्रमास पालकमंत्री शशिकांत शिेंदे,आमदार शिवेंद्र राजे भोसले पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष हरिष पाटणे ,कार्याध्यक्ष शरद काटकर,सरचिटणीस दीपक प्रभावळकर,कोषाध्यक्ष सचिन जवळकोटे,विनोद कुळकर्णी,परिषद प्रतिनिधी सुचित अंबेकर आणि जिल्हायतील पत्रकार मोट्या संख्येनं उपस्थित होते.